Breaking News

महात्मा गांधी जागतिक प्रभाव आणि समज-गैरसमज

महात्मा गांधी जागतिक प्रभाव आणि समज-गैरसमज

शाळेत असेपर्यंत मी गांधीजींचा तिरस्कार करत असे, देशाचे तुकडे करणारा, अहिंसेचा अतिरेक करणारे,५५ कोटी देणारे असे अनेक गैरसमज मनात होते, त्यांच्या खुन्याची पुस्तके आणि नाटके पाहिली होती त्यामुळे त्याचा थोडा चाहता होतो. पण सत्य वेगळेच आहे हे मला दोन्ही बाजू वाचल्यावर लक्षात आले, जसजसा गांधी वाचू लागलो तस-तसे सत्य उमजत गेले, स्वतःत सकारात्मक बदल घडवण्याचीही प्रेरणा मिळाली आणि आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडू लागले. निर्भयता, संवेदनशिलता आणि प्रेम या गोष्टी वाढल्या..

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अँप्पल चे संस्थापक स्टिव्ह जॉब्स, विनोदाचा बादशहा चार्ली चॅप्लिन, दक्षिण आफ्रिकेचे राष्टाध्यक्ष नेल्सन मंडेला आणि जगातल्या कितीतरी लोकांनी त्यांच्या आयुष्यात गांधीविचारांची प्रेरणा असल्याचे कबूल केले आणि जागतिक परिवर्तन घडवून दाखवले. अल्बर्ट आईन्स्टाईन या थोर वैज्ञानिकांने म्हटलेच आहे की "येणाऱ्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत कि गांधी नावाचा कोणी हाडामांसाचा माणूस या पृथ्वीतलावर वावरत होता’’ आणि होय आईन्स्टाईनच्या इतर सिद्धांताप्रमाणे हाही सिद्धांत खरा ठरतो की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आज आहे.

स्वातंत्र्य फक्त गांधींमुळे मिळालं का?

असं कोणीही म्हणत नाही की, स्वातंत्र्य फक्त गांधींमुळे मिळाले. पण हे राष्ट्र घडवण्यात, सर्व जाती-पाती, धर्म च्या लोकांना एकत्र आणण्यात, कोट्यवधी सामान्य माणसांना इंग्रजांविरुद्ध निर्भयपणे लढण्यास प्रेरणा देणारे ते होते. त्यामुळे ते स्वातंत्र्य लढ्याचे नायक ठरतात. आणि हे त्याकाळचे सर्वच नेते मान्य करतात. नेताजी सुभाषचंद्र बोस त्यामुळेच त्यांना राष्ट्रपिता म्हणतात. आणि आझाद हिंद सेनेत ही बहुतेक कार्यक्रमानंतर 'महात्मा गांधी की जय' म्हटले जाते.
जसे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की सगळे मावळे त्यात येतात. त्यात वेगवेगळ्या मावळ्यांची वेगळी नावे घेऊन जय म्हणण्याची गरज पडत नाही तसेच 'महात्मा गांधी की जय' म्हटलं की त्याकाळचे सगळेच स्वातंत्र्यसैनिक येतात.

पूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याचे पंतप्रधान चर्चिल म्हणाले होते कि "या गांधीला जर जनरल स्मट्स ने आफ्रिकेतील तुरुंगातच संपवले असते तर ब्रिटिशांचे फक्त भारतावरच नव्हे तर जगावर राज्य अजून काही दशके टिकले असते" शिवाय "भारताला स्वातंत्र्य दिले तर १० वर्षात भारताचे तुकडे-तुकडे होऊन हा देश बेचिराख होईल" असेही त्यांचे म्हणणे होते. पण स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरी आपण आजही एकत्र आहोत आणि लोकशाही टिकून आहे ती या गांधींविचारांमुळेच.

गांधीजी - जात आणि धर्म

गांधीजींनी कोणत्याही जातीचे वा धर्माचे अतिरेकी समर्थन केले नाही म्हणून सर्व जातीतील कट्टरवादी लोक त्यांचा द्वेष करतात.
एका जातीतील कट्टर लोकांना पुणे करारामुळे गांधीजी ब्राम्हणधार्जिणे आणि दलितद्वेष्टे (मनुवादी) वाटतात.
एका जातीतील काही कट्टर लोकांना गांधी ब्राम्हणद्वेष्टे, दलित धार्जिणे वाटतात. कारण जिथे एका जातीचे वर्चस्व होते अशी सर्व ठिकाणे राजकारण, समाजकारण व इतर अनेक गांधीजींनी अस्पृश्यता निवारण चळवळीद्वारे त्या जातीचे वर्चस्व संपवून सर्वांना त्यात पुढे आणले.
पाकिस्तानमधील काही कट्टर मुस्लिमांनाही आम्हाला छोटा पाकिस्तान दिला, काश्मीर दिला नाही वगैरे कारणावरून गांधी मुस्लिमद्वेष्टे व हिंदुधार्जिणे वाटतात.

त्यामुळे गांधीजींच्या मागे त्यांचा उदो-उदो वा देव करणारा कोणताही जातसमूह नाही. जेवढी टिंगल गांधीजींची उडवली जाते, त्याच्या १०% जरी इतर कोणत्या महामानवाची झाली असती तर दंगली झाल्या असत्या, पण कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा आधार न घेता ते जगभर पोहचले हेही विशेष.

भगतसिंह, सुखदेव व राजगुरू या तीन देशभक्त क्रांतिकारक तरुणांना ब्रिटिशांनी फाशी दिली. त्यावेळी गांधीजी काय करत होते? हा प्रश्न विचारला जातो चित्रपटात तर गांधींजींनीच ब्रिटिशांना लवकर फाशी द्या म्हणून सांगितले असे काही दाखवले आहे.

सत्य -

भगतसिंग आणि क्रांतिकारकांचे प्राण वाचावे यासाठी गांधी गव्हर्नर जनरल आयर्विन यास भेटले व फाशीची शिक्षा अमलात न आणण्याची विनंती केली. शिक्षेच्या एक दिवस आधी त्यांनी आपले सर्व भाषिक कौशल्य पणाला लावून पत्र लिहून अगदी येशू ख्रिस्ताच्या क्षमेचा दाखला देऊनही शिक्षा माफ करण्याची विनंती केली, पण त्यास न जुमानता ब्रिटिशांनी फाशी अंमलात आणली गेली. ब्रिटिश गांधीजींचे सहज ऐकणारे असते तर गांधी म्हटले असते "चले जाव" आणि ब्रिटिश निघून गेले असते. तसे मग ब्रिटिशांनी कस्तुरबांच्या आरोग्याची मुद्दामहून गैरसोय ही केली नसती, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
शिवाय भगतसिंगचे आई-वडील जेव्हा ब्रिटिशांची माफी मागून सुटका करू असे म्हटले तर भगतसिंगने माफी मागण्यास नकार दिला आणि माझ्या हौतात्म्यातून शेकडो तरुण जागे होतील असे म्हटले.

भारताची फाळणी -

भारताची फाळणी करण्याचा निर्णय ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचा होता. पण शेवटपर्यंत तिला विरोध करण्याचा प्रयत्न गांधींनी केला. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांची अनुकूल भूमिका, मुस्लिम आणि हिंदुंमधील काही कट्टरवादी संघटना यांनी घडवून आणलेला हिंसाचार, मनामनात पेरलेले विष, देशात वाढत चाललेली जातीय हिंसा व त्यातून निर्माण होऊ शकणारे अराजक याचा विचार करून गांधीजींना, वल्लभभाई पटेल, नेहरू, मौलाना आझाद यांनी फाळणीचा निर्णय स्वीकारला. पण गांधींनी त्याला शेवटपर्यंत विरोध केला.

गांधीहत्येचे कारण -

गांधीहत्येबद्दल ५५ कोटी, फाळणी आदी काही खोटी कारणे सांगितली जातात पण हे सत्य नाही. फाळणीला शेवटपर्यत विरोध करणारे एकमेव गांधीजीचं होते. त्यांचे उपोषण हे ५५ कोटी देण्यासाठी नसून दंगली थांबाव्यात यासाठी होते. सरकारने ५५ कोटी देण्याचे कबूल केले तरी ते उपोषण थांबले नव्हते. दंगली थांबल्या, तेव्हा त्यांनी उपोषण मागे घेतले.

गांधीहत्येचे मुख्य कारण होते त्यांचे सर्वसमावेशक धोरण. जे कार्य हजारो वर्षांपूर्वी महावीर व बुद्धांनी केले तेच काम थोडे आणखी पुढे जाऊन गांधीजींनी तेव्हा केले ते म्हणजे धर्म, राजकारण , शिक्षण, अर्थकारण , समाजकारण आदी सगळीकडे कुठल्या एका वर्गाची मक्तेदारी, वर्चस्व मोडून काढून ते सामान्य माणसासाठी खुले केले. शिवाय त्या वर्गातही आपण आत्तापर्यंत चुकीचे केले ही पश्चातापाची भावना निर्माण केली.

गांधीजींवर पहिला हल्ला पुण्यात

जून १९३४ मध्ये ते अस्पृश्यता निवारण चळवळीचे कार्य करत असतांना झाला. जेव्हा ५५ कोटी, फाळणी इ. गोष्टी ही अस्तित्वात नव्हत्या. गांधीजींच्या अस्पृश्यांना मंदिरे खुली करा या मोहिमेला विरोध करण्यासाठी तो हल्ला घडवला होता. त्यानंतरही अनेक हल्ले झाले.

नेहरू की पटेल पंतप्रधान -

पं. नेहरू हे काँग्रेसचे तरुण आणि आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरचे सर्वांत लोकप्रिय नेते होते. १९३० च्या निवडणुकीत हे सिद्ध झाले होते. नेहरूंनी पंतप्रधान व्हावे हे पटेलांनीही मान्य केले होते व काँग्रेस संसदीय पक्षाने त्यांची एकमताने निवड केली होती. पटेल जास्त आजारी असत ज्यामुळे गांधी स्वतः त्यांची काळजी घेत.
आज जे लोक नेहरू नव्हे पटेल असे सांगतात जर पटेल पंतप्रधान असते तर तेच लोक पटेल नव्हे नेहरूंना पंतप्रधान करायला हवे होते असे म्हणाले असते.

स्त्रियांचे सक्षमीकरण -

जीवनाच्या ज्या-ज्या क्षेत्रात पुरुष कार्य करतात त्या-त्या क्षेत्रात स्त्रिया कार्य करू शकतात; स्त्रियांना कार्य करता आले पाहिजे आणि स्त्रियांनी कार्य केले पाहिजे हा गांधीजींचा आग्रह होता. त्यामुळेच त्यांनी स्त्रियांसाठी खास असे काही कार्यक्रम राबवले नसले तरी त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांची योजनाच अशी असायची की, त्यात स्त्रियांचा सहभाग आवश्यक असे. एकदा बिहारमध्ये त्यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते, आपल्या पूर्ण देशामध्ये स्त्रियांना चूल, मुल, पदर आणि बुरखा एवढ्या पुरतेच मर्यादित ठेवले जाई. बिहार मध्ये तर स्त्रियांवर अजून काही बंधने होती. असे असताना गांधीजींनी अट घातली कि, कार्यक्रमात स्त्रिया आणि पुरुषांची संख्या बरोबरीने असली तरच मी कार्यक्रमाला येणार आणि तेथे तो चमत्कार घडला सुद्धा.
आपली भारतीय राज्यघटना तयार करण्यात अनेक गांधीवादी स्त्रियांचे मोठे योगदान आहे. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळण्यासाठी अनेक विकसित देशांना भांडावे लागले. आपल्या भारतात ते स्वातंत्र्यासोबतच मिळाले. त्याला कारण गांधींनी तयार केलेली ही मानसिकता होती.

आइनस्टाईन म्हणाले होते की, ‘गांधींसारखी महान व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि या भूतलावर चालली होती, हे पुढच्या पिढ्यांना खरं वाटणार नाही.’

अहिंसक किंवा सशस्त्र दोन्ही प्रकारे लढा देणारी माणसं गांधीजी ना प्रेरणादायकच मानत होती.
कारण आझाद हिंद सेना स्थापन केल्यावर ही नेताजींनी त्यात ज्या ५ तुकड्या बनवल्या. त्यात गांधी तुकडी व नेहरू तुकडी होते. आकाशवाणीवरून गांधीजीना राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोसच होते. गांधींनी ५६५ तुकड्यात विभागलेला देश एकत्र केला म्हणून बोस त्यांना राष्ट्रपिता म्हणाले. गांधी नसते तर स्वातंत्र्य उशिरा मिळालेही असते पण ५६५ पेक्षा जास्त तुकडे झाले असते.

शहीदेआजम भगतसिंगांनीही तुरुंगामध्ये ऊपोषण केले होते. काही मतभेद असले तरी त्यांच्यामध्येही गांधीजींबद्दल आदरच होता.
पण ज्यांनी अहिंसक किंवा सशस्त्र क्रांतीत कुठेही भाग घेतला नाही व नुसतीच हिंसक व ज्वलंत भाषणे दिली, अशा निष्क्रिय माणसांनी तेव्हाही द्वेष व अफवा पसरवण्याचे कार्य केले व आजही तेच करत आहेत.

मित्रांनो, गांधी समजुनच घ्यायचे असतील तर विनोबा, सरदार पटेल, लाल बहादूर शास्त्री, मंडेला, आईनस्टाईन यांना ऊमजलेले गांधीजी वाचा धर्म, जात-पात, गट यांच्या अफवांना बळी पडु नका.

नास्तिक असो वा आस्तिक, स्त्री असो वा पुरुष, हिंदु असो वा मुस्लिम किंवा कोणत्याही धर्माचा, शेतकरी असो वा व्यापारी, ऊच्च शिक्षित असो वा अशिक्षित, लहान/तरुण असो वा वयस्कर त्याकाळात अशा कोट्यावधी लोकांचा लोकमान्य नेता गांधी हेच होते.

लेखन - संकेत मुनोत
संपर्क - 8668975178
Knowing.gandhi@gmail.com

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत