बीडशी संबंधित मोठ्या नेत्यांचेच मृत्यू अपघाताने का होतात?
बीडशी संबंधित मोठ्या नेत्यांचेच मृत्यू अपघाताने का होतात?
गोपीनाथराव मुंडे, विनायकराव मेटे आणि आता अजित पवार यांच्या मृत्यूची मालिका काय दर्शविते!
संपूर्ण महाराष्ट्राला त्यातल्या त्यात बीड जिल्ह्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे धक्का बसला असून शोककळा पसरली आहे. यापूर्वीही गोपीनाथराव मुंडे आणि विनायकराव मेटे यांचे वाहन अपघातात तर आता अजित पवार यांचे विमान अपघातात मृत्यू झाले. विशेष म्हणजे हे तिन्ही मोठे नेते बीड जिल्ह्याशी संबंधित होते.
गोपीनाथराव मुंडे यांचे वाहन अपघातात निधन झाले तेव्हा ते खासदार म्हणून बीड जिल्ह्याचे नेतृत्व करत होते तसेच केंद्रात मंत्रीपदी होते. विनायकराव मेटे यांचे जेव्हा अपघातात निधन झाले तेव्हा ते विधान परिषद चे सदस्य होते. आणि आता अजित पवार यांचे निधन झाले तेव्हा ते राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर तर होतेच, शिवाय बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा होते आणि हे तिन्ही दिवंगत नेते राजकारणात मोठे वलय असलेले तसेच सर्वमान्य नेतृत्व म्हणून ओळखले जायचे. त्यांच्यात असलेल्या विशेष धमक मुळे हे सर्वजण प्रत्येकाला आदरणीय होते. त्यातल्या त्यात हे तिन्ही नेते बीड जिल्ह्याशी संबंधित होते. बीड जिल्हावासियांना या प्रत्येकाकडून बकाल झालेल्या बीड जिल्ह्याचा विकास चांगल्या प्रकारे होईल अशी मोठी अपेक्षा होती. मात्र बीड जिल्हावासीयांच्या अपेक्षांचा प्रत्येक वेळी भ्रमनिरास होऊ लागला आहे.
गोपीनाथराव मुंडे यांनी शून्यातून पुढे येत सतत संघर्ष करत राजकारणात मोठी उंची गाठली होती तर विनायकराव मेटे यांनीही अनेक हालअपेष्टा सोसून फक्त बीड जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात आपला जम बसविला होता तर अजित पवार यांनीही काका शरद पवार यांच्या सावलीतून बाजूला होत गेल्या काही वर्षांपासून स्वकर्तुत्वावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली होती. त्यांच्या या परिश्रमाला चांगले फळ येत असतानाच त्यांच्या विमान अपघाताची व त्यात त्यांचे निधन झाल्याची काळीकुट्ट बातमी येऊन धडकली. यामुळे बीड जिल्हावासियांना मोठा धक्का बसला आहे.
विकासात्मक बाबीवर बीड शहराची झालेली पीछेहाट व बकाल अवस्था दूर करण्याकरिता पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांनी बीड नगरपरिषद निवडणुकवेळी बीड शहरवासियांना फक्त आश्वासनच नाही तर वचन दिले होते की, बीडला सुद्धा येत्या काही वर्षात ते आपल्या पालकमंत्री पदाखाली बारामती सारखे करतील म्हणून. त्यांच्या अशा प्रकारे अकाली निधनाने महाराष्ट्र राज्य तर पोरका झाला आहेच. आता पुन्हा एकदा बीड शहर आणि जिल्हा विकासापासून पोरका होतो की काय? असा प्रश्न सर्वसामान्य बीड वासियांच्या मनात धसकन उभा राहिला असून गोपीनाथराव मुंडे, विनायकराव मेटे आणि आता अजित पवार असे हे तिन्ही मोठे नेते बीड शी संबंधित असल्याने त्यांचेच अपघाती निधन कसे होतात असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.
*लेखन - एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा