Breaking News

कोई काम नहीं है मुश्कील, जब किया ईरादा पक्का



कोई काम नहीं है मुश्कील, जब किया ईरादा पक्का

शेख सुलतान यांनी शुन्यातून येत तिन्ही मुलांना केले उच्च शिक्षीत

मुहम्मदी फार्मसी ऑफिसर, जाफर एम्ब्रीयोलॉजिस्ट, इरम ट्रान्स प्लांट नर्स

*औरंगाबाद (एस.एम.न्युज़) -* मूळचे अहेमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या चिचोंडी शिराळ येथील रहिवासी, बीड शहराचे जावई आणि गेल्या ३२ वर्षांपासून औरंगाबाद येथे स्थायिक झालेले शेख सुलतान याक़ूब यांनी अक्षरशः शून्यातून पुढे येत आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. यात मोठी मुलगी शेख मुहम्मदी सुलतान (नागपूर) हिने एम. फार्म पर्यंत विशेष प्राविण्‍याने शिक्षण घेत फार्मसी ऑफिसर पदापर्यंत झेप घेतली. (तिचे इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण बीड शहरातील छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालयात आजोळी झाले). मुलगा शेख ज़ाफ़र सुलतान (गोंदिया) हा एम.एस.सी.सी.इ. पर्यंत शिक्षण घेऊन एम्ब्रीयोलॉजिस्ट (भ्रूण शास्त्रज्ञ) झाला तर लहान मुलगी शेख इरम सुलतान (पुणे) हि पी.बी.एस.सी. पर्यंत चे शिक्षण घेऊन ट्रान्स प्लांट नर्स झाली आहे. या तिघांनीही मेहनत आणि चिकाटी च्या बळावर गरुड झेप घेऊन आई-वडिलांनी त्यांच्यासाठी घेतलेल्या श्रमाचे चीज केले आहे. रमज़ान ईद निमित्ताने हे तिन्ही बहीण-भाऊ औरंगाबाद येथील घरी आले असता त्यांचे पीर ओ मुर्शिद हज़रत सय्यद रौशन मियाँ (हैदराबाद) यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते तिघांचेही अभिनंदन करून सत्कार करण्यात आले. तसेच यापुढेही त्यांनी अनेक यशस्वी शिखरे लिलया पादाक्रांत करावी अशा शुभेच्छा देण्यात आल्या. या तिन्ही भावंडांनी दाखवून दिले की, पालक जागरूक असले आणि जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या बळावर शिक्षणाची कास घट्ट धरली तर परिस्थिती कशीही असो आपल्याला हवे ते साध्य करता येते. यावेळी मुलामुलींचे मामू एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक, मुक्तपत्रकार तथा दैनिक जनमंथन चे बीड जिल्हा विशेष प्रतिनिधी एस.एम.युसूफ़-शेख कौसर जहाँ (मामू-मुमानी), नईम अहेमद (मामू), शेख फ़ुरखान, शेख वासेख, शेख लईख, मुहम्मद अली यांची उपस्थिती होती.

शेख सुलतान हे अहेमदनगर जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त असलेल्या पाथर्डी तालुक्यातील अत्यंत लहानशा अशा दुष्काळ पाचवीला पुजलेल्या चिचोंडी शिराळ या गावी जन्मले. त्यांचे वडील याकुब शेख हे अवघ्या एक एकर पेक्षा कमी जमीन असलेले अल्पभूधारक कोरडवाहू जमिनीचे शेतकरी होते. शेख सुलतान हे लहानपणापासूनच शिक्षणात हुशार असल्याने त्यांनी इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण चिचोंडी या गावीच आनंद ऋषी विद्यालयातून घेतले. त्यानंतर जिथे जिथे मोफत शिक्षण मिळेल तिथे जाऊन शिक्षण घेत राहिले. अकरावी व बारावी शिर्डी संस्थानच्या शाळेत शिक्षण घेतले तर श्रीगोंदा येथे बीए पूर्ण केले. नंतर बीपीएड साठी उमरगा गाठले. अशाप्रकारे बी.ए.बी.पी.एड. होऊन जेव्हा शाळेत शारीरिक शिक्षक म्हणून नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले तोपर्यंत शासनाने शारीरिक शिक्षकांच्या जागा भरणे बंद करून टाकले होते ते आजपर्यंत ही बंदच आहेत. सरकारी शाळांमध्ये बीपीएल शिक्षकांच्या जागा भरल्या जात नव्हत्या तर संस्थांच्या शाळांमध्ये वर्षानुवर्षे एकतर मोफत चाकरी करावी लागायची नाहीतर संस्थेला डोनेशन देऊन नोकरी मिळवावी लागायची. या दोन्ही बाबींना घरची परिस्थिती साथ देणारी नव्हती म्हणून त्यांनी अहेमदनगर शहरात जाऊन अनेक छोटे-मोठे काम तर कधी उद्योग करत दिनचर्या सुरू ठेवली. अशातच त्यांचे बीड शहरातील मुहम्मद अब्दुल रऊफ़ यांची मुलगी सुलताना शेख यांच्याशी २३ ऑक्टोबर १९९२ रोजी लग्न झाले. लग्न झाल्याने दोनचे चार हात झाले. तसा खर्च वाढला म्हणून त्यांनी शारीरिक शिक्षक होऊन नोकरी करण्याचा विचार सोडून दिला आणि औरंगाबाद येथे जाऊन खाजगी नोकरी करण्याचे पाऊल उचलले. यात त्यांना प्रथम सिक्युरिटी गार्ड म्हणून खाजगी कंपनीकडून नोकरी मिळाली. उच्च शिक्षण घेतलेले असल्याने अल्पावधीतच त्यांनी या पदावर कार्य करताना आपली छाप सोडल्याने त्यांना कंपनीकडून प्रथम स्टोर कीपर म्हणून पदोन्नती देण्यात आली. नंतर स्टोर ऑफिसर झाले. या दोन्ही पदांवरही त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने चांगली छाप सोडल्याने कंपनी व्यवस्थापनाने त्यांना स्टोर मॅनेजर पदी पदोन्नती दिली. या पदावर अनेक वर्षे आपले कर्तव्य निभावून दोन वर्षांपूर्वी नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले. तत्पूर्वी त्यांची दिनचर्या म्हणजे पहाटे लवकर उठून सकाळी आठ वाजता कंपनीवर जायचे आणि रात्री आठ वाजता घरी परत यायचे. अनेक वर्षे हा नित्यक्रम असल्याने तिन्ही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला त्यांना आवश्यक वेळ भेटायचा नाही. यामुळे पत्नी सुलताना शेख यांनी तिन्ही मुलांच्या संगोपनासह शिक्षणाकडे कटाक्षाने लक्ष देऊन वडिलांसारखे प्रत्येक वेळी आपल्या मुली आणि मुलासोबत राहून एक मुस्लिम महिला किंवा आई म्हणून फक्त चूल आणि मुल या चौकटीत मर्यादित न राहता प्रत्येक अडचणींवर मात करत तिन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. आज ही तिन्ही मुले आपापल्या क्षेत्रात यशस्वीपणे मार्गक्रमण करीत आहेत. त्यांच्या या उपलब्धीचा गुणगौरव करण्यासाठी रमज़ान ईदच्या दुसऱ्या दिवशी १ एप्रिल २०२५ रोजी त्यांचे पीर ओ मुर्शिद हज़रत सय्यद रौशन मियाँ यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते तिघांचेही हृदयी अभिनंदन करून सत्कार करण्यात आले. यासाठी बीडहून त्यांचे मामू एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक, मुक्तपत्रकार तथा दैनिक जनमंथन चे बीड जिल्हा विशेष प्रतिनिधी एस.एम.युसूफ़ हे सहकुटुंब उपस्थित होते. त्यांनी आपल्या दोन्ही भाची आणि भाच्याचे मनापासून अभिनंदन करत पुढील आयुष्याकरिता शुभाशीर्वाद दिले. तिघांनीही यापुढे सुद्धा आपल्या दैदीप्यमान कारकिर्दीने स्वतःसह आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल करावे. वडिलांसारखेच यशस्वी व्हावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

===========================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत