बीड रेल्वे आनंदास्पद पण अभिमानास्पद नाहीच!
काही महिन्यांपूर्वी बीड ते अहिल्यानगर (अहेमदनगर) रेल्वे सेवा सुरू झाली तेव्हा तिचे पहिले उद्घाटन करण्यात आले. आता मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्ताने १७ सप्टेंबर २०२६ रोजी बीड ते पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार असल्याने या रेल्वेचे दुसऱ्यांदा उद्घाटन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आता जनतेतून प्रश्न उपस्थित केले जात आहे की, एकाच रेल्वेचे कितीदा उद्घाटन समारंभ करायचे? तर याचे उत्तर चारदा उद्घाटन समारंभाचे कार्यक्रम होणार, असे येऊ शकते.
कारण यानंतर बहुतेक बीड ते मुंबई रेल्वे सुरू करताना तिसऱ्यांदा उद्घाटन होईल त्यानंतर मग परळी-बीड-पुणे-मुंबई अशी रेल्वे सेवा सुरू करताना चौथे व शेवटचे उद्घाटन होईल असे वाटते. म्हणजेच एकाच रेल्वेचा प्रवास टप्प्याटप्प्याने वाढविताना प्रत्येक टप्प्यावेळी उद्घाटन समारंभ घेण्यात येईल. यासाठी मग प्रत्येक वेळी उद्घाटन समारंभाकरिता मोठा शासकीय-प्रशासकीय लवाजमा जमा करायचा, त्यावर लक्षावधी रुपयांची उधळपट्टी करायची. जनतेला उपस्थितीचे आवाहन करायचे. हे काय प्रकार सुरू आहेत? असे प्रश्न आता जनतेतून उपस्थित होऊ लागले आहेत. एकाच रेल्वे करिता शासनाच्या तिजोरीत जनतेकडून जमा होणाऱ्या महसुलाची अशाप्रकारे उधळपट्टी का म्हणून करण्यात येते? असा प्रश्नही आता सुज्ञ जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे.
बीड रेल्वे सुरू झाली ही बीड जिल्हावासियांसाठी निश्चितच आनंदास्पद बाब नक्कीच आहे. परंतु अभिमानास्पद आहे असे म्हणता येणार नाही. कारण स्वातंत्र्यपूर्व काळात निजाम राजवट असताना हैदराबाद ते परळी हा रेल्वेमार्ग सुरू करण्यात आला होता आणि परळी ते तत्कालीन अहेमदनगर आताचे अहिल्यानगर पर्यंत रेल्वे मार्ग प्रस्तावित होता. मात्र तो असा काही रखडला की, हा रेल्वे मार्ग व्हावा म्हणून अनेक स्वातंत्र्य सैनिकांसह रेल्वे संघर्ष कृती समिती आणि लोकप्रतिनिधींना सातत्याने आवाज उठवावा लागला. संघर्ष करावा लागला. समाजसेवकांना स्वतःच्या अंगावर गुन्हे दाखल करून घ्यावे लागले. तुरुंगवास भोगावा लागला. अनेकदा दिल्ली वाऱ्या कराव्या लागल्या. अनेक आंदोलने करावी लागली. तरीही स्वातंत्र्यानंतर ७९ वर्ष उलटूनही परळी-बीड हा रेल्वे मार्ग अजूनही सुरू झालेला नाही. अर्थात पुढील काही काळात तो सुरू होईल, तोपर्यंत बहुतेक स्वातंत्र्याची ८० वर्षे पूर्ण झालेली असेल. स्वतंत्र भारतात बीड सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी रेल्वे करिता ८० वर्षे वाट पाहावी लागते ही निश्चितच लज्जास्पद बाब आहे.
एवढ्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू होणाऱ्या या रेल्वे मार्गावर प्रथम बीड अहिल्यानगर व आता १७ सप्टेंबर २०२६ पासून बीड-पुणे अशी रेल्वे सेवा सुरू करताना आतापर्यंत दोन उद्घाटन समारंभ घेण्यात आले. आता पुढच्या टप्प्यात बहुतेक बीड ते मुंबई अशी रेल्वे सेवा सुरू करतानाही तिसऱ्यांदा उद्घाटन समारंभ घेतले जाईल व त्यानंतर परळी-बीड-पुणे-मुंबई हा रेल्वे मार्ग जेव्हा पूर्णतः सुरू होईल तेव्हा सुद्धा चौथे उद्घाटन समारंभ घेतले जाईल असे वाटते.
प्रत्येक वेळी अशा प्रकारे उद्घाटन समारंभ घेण्याकरिता शासकीय-प्रशासकीय यंत्रणा कामाला लावताना त्यावर लाखो रुपयांची उधळपट्टी होते. अनेक वरिष्ठ अधिकारी, राजकीय पदाधिकारी ज्यात आमदार, खासदार पासून अनेक मंत्री-संत्री एकत्र येतात. त्यावर होणारा खर्च हा जनतेकडून शासनाच्या तिजोरीत जमा झालेल्या महसूलातूनच केला जातो. एकाच कामाचे असे अनेक उद्घाटन समारंभ घेऊन त्यावर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याऐवजी तोच निधी जनतेच्या भल्यासाठी इतर योजना व कामांसाठी वापरला तर सार्थकी लागेल. याकडे सत्ताधीशांनी आणि प्रशासनाने ही लक्ष द्यावे.
शेवटी या रेल्वे मार्गाचा मागोवा घेताना बीड ला रेल्वे येणे ही बाब आनंदास्पद आहे पण अभिमानास्पद नक्कीच नाही, असे म्हटल्याशिवाय राहवत नाही.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा