Breaking News

बीडला रेल्वे आली-प्रवासी घेऊन धावू लागली; पण विलासरावांची साधी आठवणही कुणी नाही काढली!

 

     बीडला रेल्वे आली-प्रवासी घेऊन धावू लागली; पण 
     विलासरावांची साधी आठवणही कुणी नाही काढली!

बीड।एस.एम.न्युज़

स्वतंत्र भारतात ७९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एकदाची बीडला रेल्वे आली आणि बीडहून पुणे व पुणेहून बीड अशी प्रवासी वाहतूक सुरू झाली. मात्र या रेल्वे मार्गासाठी भरीव आणि ठोस असे पाऊल उचलणारे राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांची साधी आठवण सुद्धा कोणी नाही काढली.
                     आपला भारत देश स्वतंत्र होण्याअगोदर पासून निजाम काळात हैदराबाद ते परळी हा रेल्वे मार्ग निजाम सरकारने सुरू केला होता. बीड जिल्हा मात्र रेल्वे मार्गाच्या नकाशावर परळी वगळता कुठेही नव्हता. हा रेल्वे मार्ग व्हावा याकरिता बीड जिल्हा रेल्वे कृती समिती, स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक, तत्कालीन खासदारांनीही वेळोवेळी आवाज उठविले. लोकप्रतिनिधी वगळता इतरांनी वेळोवेळी आंदोलने केली. बीड जिल्ह्याला रेल्वे हवी म्हणून अनेकदा दिल्लीच्या वाऱ्या केल्या. सातत्याने मागणी केली. आज यापैकी अनेकांची नावे अनेकजण आठवणीने काढत आहेत. मात्र हा रेल्वे मार्ग व्हावा याकरिता ठोस आणि भक्कम पाऊल उचलणारे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव कोणाच्या ध्यानीमनी ही येत नाहीये. ही फार मोठी शोकांतिका आहे.
      परळी-बीड-अहेमदनगर आताचे अहिल्यानगर हा रेल्वे मार्ग व्हावा, याकरिता मुख्यमंत्री पदावर असताना विलासराव देशमुख यांनी केंद्रासोबत यशस्वी वाटाघाटी करत या रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेल्या निधीतील ५०% खर्च केंद्राने करावा आणि ५०% खर्च महाराष्ट्र सरकार उचलेल असा निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणीही केली. यामुळे या रेल्वे मार्गाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आणि ते पूर्णत्वास आले. सद्यस्थितीत जरी बीड-परळी रेल्वे मार्ग अजून जोडला गेला नसला तरी तो पुढील वर्षी पर्यंत जोडला जाणारच आहे आणि परळी ते मुंबई असा प्रवास बीड जिल्हावासियांना आरामदायक व माफक दरात करता येणार आहे.
                 लोकहितासाठी अनेक जण शासन-प्रशासनाकडे वेगवेगळ्या मागण्या करत असतात. त्या सर्वच पूर्ण होतात असेही नाही मात्र त्या मागण्या लावून धरलेल्यांची नावे लोकांच्या लक्षात राहतात. हे खरे असले तरी जो कोणतेही काम करण्यासाठी भक्कम आणि ठोस पाऊल उचलून आर्थिक तजवीज करतो, त्यात त्याचा सिंहाचा वाटा असतो. अशा व्यक्तीचे विस्मरण पडावे म्हणजे ती कृतघ्नता ठरते.
                  आज घडीला बीड रेल्वेचे शिल्पकार म्हणून काहीजण बीड लोकसभा मतदारसंघात होऊन गेलेल्या काही खासदारांच्या नावांचा भडीमार सोशल मीडियासह प्रसार माध्यमातून करू लागले आहेत. ज्यांच्या नावाचा आज उदोउदो होऊ लागला आहे. एक तर ते राजकारणातील मातब्बर-गब्बर घराण्यातील आहेत किंवा ते विद्यमान सत्ताधारी पक्षात आहेत.
                 विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून या रेल्वे मार्गासाठी ५०% खर्चाची जबाबदारी राज्य सरकारचे प्रमुख म्हणून तरतूद केली होती. त्यांच्यानंतर आलेल्या प्रत्येक राज्य सरकारला सुद्धा त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे पालन करावे लागले. रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या ५०% खर्च हा केंद्र सरकार सोबत राज्य सरकारलाही उचलावा लागला. एकूण खर्चाचा "फिफ्टी-फिफ्टी" वाटा केंद्रासोबत राज्याला उचलायला लावणारे विलासराव देशमुख यांचे साधे नावही ही रेल्वे सुरू झाल्यानंतर कुणी घ्यायला तयार नाही.
                   कारण ते ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करीत होते तो काँग्रेस आय पक्ष आता विद्यमान सत्ताधारी राहिला नाही. एवढंच नाही तर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सुद्धा त्या पक्षाची अवस्था डळमळीत झालेली आहे. बहुतेक यामुळेच या रेल्वे मार्गाचे खरे शिल्पकार म्हणून ज्या विलासराव देशमुख यांची आठवण सदैव व्हायला हवी ती होत नाहीये. किती हा दैवदुर् "विलास" म्हणावा.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत