सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा काल्पनिक वेतनवाढीचा लाभ देण्याचे आदेश
बीड।एस.एम.न्युज़ - सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी, शिक्षक, अभियंते व अधिकाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढीचा लाभ देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.
दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या या निकालामुळे राज्यातील अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बीड जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या मागणीसाठी न्यायालयीन लढा उभारला होता. सेवानिवृत्त कर्मचारी श्यामराव तुपे यांनी ॲड. राजेंद्र हांगे यांच्या माध्यमातून औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल रिट याचिका क्रमांक १०५०८/२०२६ अन्वये दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या निर्णयानुसार, जे कर्मचारी सेवानिवृत्त होताना केवळ काही कालावधीने वेतनवाढीसाठी पात्र ठरत नव्हते, अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काल्पनिक वेतनवाढीचा विचार करून त्यानुसार निवृत्तीवेतन व संबंधित लाभ निश्चित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषतः शेवटच्या वेतनवाढीपासून सहा महिन्यांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे केवळ बीड जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील विविध शासकीय व निमशासकीय विभागांमध्ये कार्यरत राहून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून वेतनवाढीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या न्यायालयीन लढ्यासाठी पुढाकार घेणारे शिक्षक संघटनेचे नेते राजकुमार कदम व श्यामराव तुपे यांनी सर्व पात्र कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन केले आहे. या निर्णयामुळे सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक लाभांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार असून, अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष आर्थिक फायदा मिळण्याची अपेक्षा आहे. उच्च न्यायालयाच्या या निकालाकडे राज्यातील सेवानिवृत्त कर्मचारी वर्गासाठी महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून पाहिले जात असून, संबंधित विभागांनी पात्र कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा