Breaking News

मराठी शिकण्याच्या पुढाकाराला रिक्षाचालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ७३२ अमराठी रिक्षाचालकांना प्रमाणपत्रांचे वितरण

मराठी शिकण्याच्या पुढाकाराला रिक्षाचालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद७३२ अमराठी रिक्षाचालकांना प्रमाणपत्रांचे वितरण

पुणे।एस.एम.न्युज़ - महाराष्ट्राच्या विविध भागांतून पुण्यात येऊन रिक्षा व्यवसाय करणाऱ्या अमराठी रिक्षाचालकांनी मराठी भाषा शिकण्यासाठी घेतलेला पुढाकार हा सामाजिक एकात्मता, बंधुभाव आणि महाराष्ट्राच्या भाषा-संस्कृतीचा सन्मान करणारा आदर्श उपक्रम ठरला आहे. पुण्यात विशेष मराठी भाषा प्रशिक्षण घेऊन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ७३२ अमराठी रिक्षाचालकांना प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
          रिक्षाचालकांचा प्रवाशांशी दररोज मोठ्या प्रमाणावर संपर्क येतो. प्रवाशांशी मराठीत सहज संवाद साधता यावा, त्यांच्या अडचणी समजून घेता याव्यात आणि रिक्षाचालक व प्रवासी यांच्यात अधिक आपुलकी व विश्वासाचे नाते निर्माण व्हावे, या उद्देशाने हा मराठी भाषा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला होता.
                 या उपक्रमासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच मराठी प्रशिक्षक ज्योती ठाकरे, स्वप्निल जोशी आणि अनुराधा इंगळे यांच्यासह परिवहन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
              यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वाहतूक विभाग, पुणे जिल्हा अध्यक्ष अरशद अन्सारी म्हणाले, “मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून महाराष्ट्राच्या मातीशी आणि संस्कृतीशी जोडणारी भावना आहे. अमराठी रिक्षाचालक बांधवांनी कोणत्याही दबावाशिवाय स्वेच्छेने मराठी भाषा शिकण्यासाठी पुढाकार घेणे ही अत्यंत कौतुकास्पद आणि सकारात्मक बाब आहे. प्रवाशांशी मराठीत संवाद साधल्याने रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातील विश्वास व आपुलकी निश्चितच अधिक दृढ होईल.”
              उत्तर भारतीय एकता रिक्षाचालक ग्रुपच्या वतीनेही मराठी भाषा प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या सर्व रिक्षाचालकांचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्रात राहून व्यवसाय करताना येथील भाषा, संस्कृती आणि परंपरेचा आदर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.  
              मराठी भाषा शिकण्याचा हा उपक्रम भाषिक सलोखा, सामाजिक एकता, बंधुभाव आणि परस्पर सन्मान वाढविणारा असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
             यावेळी उत्तर भारतीय रिक्षाचालक बांधवांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वाहतूक विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष अरशद अन्सारी तसेच किरण एरंडे, मुराद काज़ी, कविता तर्डे-फुगे, मोहसीन शेख आणि अन्सार शेख यांनी अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी प्रेरित करण्यात महत्त्वाची भूमिका घेऊन ६५० रिक्षा चालकांना परीक्षा देण्यास उत्स्फूर्त केले. तसेच उत्तर भारतीय रिक्षाचालक संघटनांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
                पुणे तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील ज्या रिक्षाचालकांना या प्रशिक्षणाचा लाभ घेता आला नाही, त्यांच्यासाठी पुढील टप्प्यात विशेष मराठी भाषा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
               “महाराष्ट्रात व्यवसाय करूया, महाराष्ट्राच्या भाषेचा सन्मान करूया आणि एकतेने पुढे जाऊया,” असा संदेश देत या उपक्रमाची सांगता करण्यात आली.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत