जागतिक पर्यावरण दिन झाडे बोडखी करून साजरा?
जागतिक पर्यावरण दिन झाडे बोडखी करून साजरा?
झाडे लावा-झाडे जगवा पण वाढलेली झाडे वाचविणार कोण?राजुरीवेस ते माळीवेस पर्यंतची अनेक झाडे तोडल्याने झाली बोडखी
पावसाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. सध्या रोहिणी नक्षत्र सुरू असून या नक्षत्रात आतापर्यंत दोन वेळेस अत्यंत तुरळक पाऊस पडला. येत्या ०७ जून पासून मृग नक्षत्रास सुरुवात होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे आज दिनांक ०३ जून २०२६ बुधवार रोजी छाटण्यात आली. यामुळे अनेक झाडे बोडखी झाली असून झाडे लावा-झाडे जगवा हा नेहमी दिला जाणारा संदेश झाडे तोडताना पाहणाऱ्याच्या मनात आला तसेच त्यांच्या सद्सद् विवेक बुद्धीमध्ये झाडे वाचविणार कोण? तसेच ३ जून रोजी एकीकडे झाडे मोठ्या बेदर्दीने छाटली गेली असताना दुसरीकडे मात्र ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन जगभरात साजरा केला जात आहे. हा योगायोग आहे की, कपाळ करंटेपणा? असे प्रश्नही या अनुषंगाने उपस्थित होऊ लागले आहेत.
अवघ्या काही वर्षांपूर्वी बीड शहरातील राजुरीवेस ते बलभीम चौक ते माळीवेस चौक या रस्त्यांवर मास्टर प्लॅन राबविण्यात आला होता. त्यानंतर बीड नगर परिषदेने कोट्यावधी रुपये खर्च करून या रस्त्यांवर दोन्ही बाजूने भारतीय सोडून विदेशी असलेली कुचकी झाडे लावली होती. वड, पिंपळ, कडूलिंब या मानवासह जनावरांकरिता अत्यंत उपयोगी असलेली शुद्ध भारतीय झाडांना वगळून विदेशी झाडे लावली. ही कुचकी असल्याने काही काळातच भरभराटीने वाढली खरी परंतु त्यांचा लाभ मात्र भारतीय झाडांसारखा नागरिकांसह जनावरांनाही होत नाहीये. पण त्या झाडांकडून रस्त्यांवर सावली मिळत होती. हीच काय ती समाधानाची बाब. मात्र पावसाळ्याचा हंगाम लक्षात घेता रस्त्यांवरून विद्युत वाहून नेणाऱ्या तारांना या झाडांमुळे, त्यांच्या फांद्यांमुळे नुकसान होऊ नये म्हणून शहरातील या दोन्ही प्रमुख रस्त्यांवरील झाडे सपासप तोडण्यात आली. यामुळे या रस्त्यांवरील झाडे तर बोडखी झालीच परंतु त्यापासून रस्त्यांवर येणारी सावली सुद्धा आता मिळणार नाहीये. ही परिस्थिती पाहता नेहमी माणसासह जनावरांकरिता सुद्धा झाडे कशी आवश्यक आहे हे सांगून शासन-प्रशासनाकडून दरवर्षी वृक्षारोपणावर कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला जातोय. त्याकरिता पैशांची उधळपट्टी करताना जागा व पुढील काळाचा विचार न करता कुठेही आणि कसेही वृक्षारोपण केले जाते. याकरिता शासन-प्रशासनाकडून आलेला निधी हा उधळला जातो की, गिळला जातो हे संबंधित यंत्रणेलाच माहीत, पण तूर्तास तरी वीज आणि पाऊस याचे कारण देऊन झाडे बोडखी करण्यात आली आहे.
लेखन - एस.एम.युसूफ़
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा