Breaking News

नालायकांची खोगीर भरती; निष्पाप लोकांचे जीव जाती! बेजबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा!

नालायकांची खोगीर भरती; निष्पाप लोकांचे जीव जाती

बेजबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा!

बीड।एस.एम.न्युज़

या बातमी च्या माध्यमातून मनोगत मांडण्या अगोदर हे स्पष्ट करू इच्छितो की, इथे बातमीला दिलेल्या शीर्षकातील *नालायक* हा शब्द एखादी *शिवी* नसून जे *लायक* नाहीत असे म्हणजे *नालायक*. या अर्थाने या शब्दाचा वापर केला आहे. असो!

बीड येथून प्रकाशित होणारे *सायं. दैनिक महाराष्ट्र आरंभ* ने दिनांक २६ मे २०२६ रोजी च्या अंकात बातमीच्या शीर्षकातच स्पष्ट उल्लेख केला होता की, *श्री. क्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांच्या जीवाशी खेळ, लाखो भाविकांची सुरक्षा धोक्यात?*
तर दुसरी ओळ होती *क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची होडीतून वाहतूक; पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका?*

ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर माहिती अधिकारी कार्यालयासह शासन-प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून कार्य करणे आवश्यक होते परंतु बहुतेक प्रशासनाने याच्या गांभीर्यतेकडे लक्षच दिले नाही म्हणून ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात पुरुषोत्तमपुरी येथे होडी उलटलीच आणि त्यात अत्यंत दुर्दैवीरीत्या दोन महिलांचा मृत्यू होऊन सायं. दैनिक महाराष्ट्र आरंभची भविष्यवाणी अगदी तंतोतंत खरी ठरली.
               काही दिवसांपूर्वी पुरुषोत्तमपुरी येथे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रत्यक्ष पाहणी करून काही सूचना केल्या होत्या व त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले होते परंतु त्या सूचनांची दखल घेतली न गेल्याने त्यांच्या आदेशाचे पालन झाले नाही म्हणून होडी उलटून दोन निष्पाप महिलांना आपला जीव गमवावा लागला. हा सर्व प्रकार पाहून शासन-प्रशासनात नालायकांची खोगीर भरती झाल्याने दोन निष्पाप लोकांचा जीव गेला, असे म्हटल्याशिवाय राहवत नाही.

भविष्यवाणी सांगणारे फक्त पंचांग पाहणारेच हवेत का?

समाजात वावरताना ज्यांचे मन, मस्तिष्क आणि नजरेत समाजाविषयी कळकळ असते ते समोरची परिस्थिती पाहून आपले अंदाज वर्तवित असतात. मग ते वृत्तपत्र चालविणारे संपादक असो की, सामाजिक कार्याला वाहून घेतलेले सामाजिक कार्यकर्ते असो. (काही काळापूर्वी यात दर्दी राजकारण्यांचाही समावेश असायचा परंतु अलीकडच्या काळात राजकारणातून अशी मंडळी नाहीशी झाल्याने आताच्या राजकीय मंडळींकडून अशी अपेक्षा करणे म्हणजे

हाल्याकडून दूध देण्याची अपेक्षा करण्यासारखे झाले आहे) असो. यामुळे फक्त पंचांग पाहणारेच भविष्य सांगू शकतात असे नव्हे.

शासन-प्रशासनाकडून वृत्तपत्रे आणि सामाजिक कार्यकर्त्यांची अवहेलना!

समाजासाठी काय चांगले किंवा काय वाईट, हे फक्त शासन-प्रशासनालाच माहित असते असे नाही. वास्तविक पाहता शासन-प्रशासनापेक्षा समाजातील प्रश्नांची जास्त माहिती वृत्तपत्रकारांसोबतच सामाजिक कार्यकर्त्यांना असते. ते आपल्या परीने वेळोवेळी शासन-प्रशासनासमोर विविध प्रश्न मांडून लक्षही वेधतात परंतु गेल्या काही वर्षापासून शासन-प्रशासनाने वृत्तपत्रांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर आवश्यक असलेली कामे न करता सर्रासपणे पाठ फिरविण्याचे सूत्र अवलंबले आहे. यामुळे वृत्तपत्रांसह सामाजिक कार्यकर्त्यांचीही शासन-प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात अवहेलना होऊ लागली आहे. असाच प्रकार बीड जिल्हा प्रशासनाने केल्यामुळेच सायं. दैनिक महाराष्ट्र आरंभ ने पुरुषोत्तमपुरी येथील संभाव्य धोक्याविषयी बातमीतून सविस्तर लक्ष वेधूनही त्यावर वेळीच योग्य ते कार्य न केल्याने दोन निष्पाप महिलांना जीव गमवावा लागला.

बेजबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा!

पुरुषोत्तमपुरी येथे होडी उलटून झालेल्या दोन महिलांच्या मृत्यूस प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा.

👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*
------------------------------------------------------

दिनांक २६ मे २०२६ रोजी सायं. दैनिक महाराष्ट्र आरंभ ने प्रकाशित केलेली बातमी वाचकांसाठी जशीच्या तशी खाली दिली आहे.
👇👇👇👇👇

श्री. क्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांच्या जीवाशी खेळ, लाखो भाविकांची सुरक्षा धोक्यात?

क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची होडीतून वाहतूक; पोलीस प्रशासनाची बघ्याची भूमिका?

माजलगाव | आरंभ वृत्तसेवा

माजलगाव तालुक्यातील श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेनिमित्त दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असून, भाविकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोदावरी नदीवर स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांची होडीतून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वाहतूक केली जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

नदीपात्रात सुरू असलेल्या होडी वाहतुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचे सुरक्षा नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे. अनेक होड्यांमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी बसवले जात असून, ना लाईफ जॅकेटची सुविधा आहे, ना आपत्कालीन बचाव पथकाची व्यवस्था. परिणामी लाखो भाविकांचे जीव धोक्यात घालून ही वाहतूक सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यात्रास्थळी आलेल्या भाविकांनी सांगितले की, “होडीत चढताना किंवा प्रवासादरम्यान कोणतीही सुरक्षा तपासणी होत नाही. लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.” विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी एका बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यात्रास्थळी पाहणी दौरा करून भाविकांच्या सुरक्षेबाबत सूचना दिल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी अंमलबजावणी दिसून येत नसल्याची चर्चा आहे. यात्रास्थळी सुरक्षा यंत्रणेचा अभाव स्पष्टपणे जाणवत असून, पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे.

स्थानिक स्तरावर होडी मालकांकडून आर्थिक व्यवहार होत असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. त्यामुळेच होडी चालकांना प्रशासनाचा धाक उरलेला नसल्याचे बोलले जात आहे. नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असतानाही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठावर एनडीआरएफ अथवा बचाव पथकाची नियुक्ती करणे, प्रत्येक होडीत लाईफ जॅकेट सक्तीचे करणे, क्षमतेनुसारच प्रवासी वाहतूक करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

“आणखी किती निष्पाप जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल आता भाविक आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत