Breaking News

हुतात्मा स्मारकासाठी प्रशासनिक अधिकाऱ्यांची मांदियाळी!

हुतात्मा स्मारकासाठी प्रशासनिक अधिकाऱ्यांची मांदियाळी!

ऐतिहासिक कारंजा टॉवर साठी मात्र निधीची निर्जळी

बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील राजीव गांधी चौकात असलेल्या बीड नगर परिषदेच्या एका छोट्याशा उद्यानात हुतात्मा स्मारक बांधलेले आहे. आगामी १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात येणार असल्याने या निमित्ताने बीड जिल्हा प्रशासनात महत्त्वाच्या अशा वर्ग एकच्या प्रशासकीय हुद्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनी नुकतीच या हुतात्मा स्मारकाची पाहणी करण्याकरिता भेट दिली आणि या स्मारकाचे या दिनानिमित्ताने का होईना स्वच्छता आणि रंगरंगोटी करण्याची मोहीम हाती घेण्याचे सांगण्यात आले आहे. एकीकडे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या  कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे मात्र याच बीड शहरात असलेल्या तसेच हुतात्मा स्मारकाच्या शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक कारंजा टॉवरच्या परिपूर्ण नूतनीकरणाकडे मात्र नेते, पुढारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह या सर्व प्रशासनिक अधिकाऱ्यांचेही साफ दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
येत्या १७ सप्टेंबर रोजी बीड शहरातील हुतात्मा स्मारकावर आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक १ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्मारकाची पाहणी केली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार चंद्रकांत शेळके, बीड नगर परिषद मुख्याधिकारी शैलेश फडसे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता चंद्रकांत बोराडे यांनी हुतात्मा स्मारक असलेल्या उद्यानाला भेट देऊन आवश्यक कामांची तपासणी केली.
यावेळी स्मारक परिसरातील स्वच्छता, रंगरंगोटी आणि व्यवस्थापन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बीड नगर परिषदेचे नगर अभियंता किरण देशमुख, मंडळ अधिकारी सचिन सानप, ग्राम महसूल अधिकारी शब्बीर शेख, स्वच्छता विभाग प्रमुख भागवत जाधव आणि स्वच्छता निरीक्षक अय्युब शेख आदी अधिकारीही या पाहणीवेळी उपस्थित होते.
प्रशासनाने स्मारक परिसर स्वच्छ, आकर्षक आणि सुव्यवस्थित ठेवण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांच्या सहभागातून हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्व यंत्रणा सज्ज राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

*अधिकाऱ्यांनो, हुतात्मा स्मारकाचा कायापालट अवश्य करा पण ऐतिहासिक कारंजा टॉवरचे नूतनीकरण ही परिपूर्ण करा रे ....!*

बीड शहराच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक कारंजा टॉवर म्हणजे फक्त इतिहासाची ओळखच नव्हे तर बीड शहराची सुद्धा ओळख आहे. मात्र बीड नगर परिषदेच्या कपाळ करंट्यापणामुळे या वास्तूचे अजूनही परिपूर्ण नूतनीकरण करण्यात आलेले नाही. याचे कुठलेही शल्य किंवा वैषम्य राजकारणी असो की अधिकारी कुणालाही असल्याचे दिसत नाही. जो तो आपल्याच तंद्रीत मस्त आहे. यामुळे कारंजा टॉवर ची पार दुरावस्था झाली होती परंतु गेल्या काही महिन्यांपासून या ऐतिहासिक वास्तूच्या जवळपास राहणाऱ्या नागरिकांमध्ये या वास्तु विषयी जागरूकता निर्माण झाल्याने नागरिकांनी पुढे येऊन आर्थिक दान व श्रमदान करून येथे पाण्याच्या मोटारी लावल्या, रंगबिरंगी लाईट्स लावल्या, फवारे उडविण्यासाठी नोझल लावले, विद्युत पुरवठा सुरू करून घेतला, सिमेंटचे बाकडे ठेवले, झाडे लावली. यामुळे काही प्रमाणात का होईना या ऐतिहासिक वास्तूची दुरावस्था थोडी तरी कमी झाली. असे असूनही शासन-प्रशासनकर्ते मात्र अजूनही आंधळे, बहिरे, आणि मुके असल्यासारखे वागत आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळे या ऐतिहासिक वास्तु असलेल्या कारंजा टॉवरचे परिपूर्ण नूतनीकरण अजूनही पूर्ण झालेले नाही. हे पाहता अधिकाऱ्यांनो, हुतात्मा स्मारकाचा कायापालट अवश्य करा पण ऐतिहासिक कारंजा टॉवरचे नूतनीकरण ही परिपूर्ण करा रे ....! असे म्हणण्यावासून राहवत नाही.

*ऐतिहासिक कारंजा टॉवर साठी दहा वर्षांपासून पाठपुरावा*

बीड शहराची ओळख असलेल्या ऐतिहासिक कारंजा टॉवरचे परिपूर्ण नूतनीकरण करण्यात यावे, याकरिता गेल्या दहा वर्षांपासून शासन-प्रशासन दरबारी नित्यनेमाने निवेदनाच्या माध्यमातून तसेच प्रसिद्धी माध्यमातूनही वेळोवेळी बातम्या व लेखांच्या माध्यमातून लक्ष वेधले जात आहे. तरीही गेंड्याची कातडी पांघरल्यासारखे शासन-प्रशासनकर्ते या ऐतिहासिक वास्तू कडे ढुंकूनही पाहायला तयार असल्याचे दिसत नाही. यामुळे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत