सा.द स्कूल एक्सप्रेस, अविष्कार कोचिंग क्लासेस आणि युनिक अकॅडमी चे आदर्श पुरस्कार वितरण थाटात संपन्न
बीड (एस.एम.न्युज़) - दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मराठवाडा विभागात शैक्षणिक क्षेत्रात शिक्षणाला वाहिलेले एकमेव वृत्तपत्र असलेले सा. द स्कूल एक्सप्रेस, अविष्कार कोचिंग क्लासेस आणि युनिक अकॅडमी कडून आदर्श पुरस्कारांचे वितरण दिनांक ५ जानेवारी २०२५ रविवार रोजी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात करण्यात आले. यामध्ये आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, शिक्षणमित्र, आदर्श ग्रंथपाल, आरोग्यदूत अशा पुरस्कारांनी मान्यवरांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.जी. तांदळे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, ज्येष्ठ शिक्षक नेते उत्तमराव पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड शहराध्यक्ष तथा बीड नगर परिषद चे माजी सभापती खुर्शीद आलम, कुक्कळगाव येथील सरस्वती चिंतामणी विद्यालयाचे संस्थाध्यक्ष कुलकर्णी सर हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक काज़ी मुशाहेद सर यांनी केले. सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधाकर शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन अविष्कार कोचिंग क्लासेस चे संचालक प्रा. सुनील खंडागळे सर यांनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करताना काज़ी मुशाहेद सरांनी सांगितले की, द स्कूल एक्सप्रेस कडून शिक्षण क्षेत्रातील चांगले शिक्षक निवडून त्यांना दरवर्षी सन्मानित केले जाते. यामुळे पुरस्कार मिळालेल्यांची जबाबदारी वाढते. शिक्षण क्षेत्रासाठी जशी जबाबदारी द स्कूल एक्सप्रेस उचलत आहे, तशी जबाबदारी प्रत्येक शिक्षकाने द स्कूल एक्सप्रेस हे वृत्तपत्र आपल्या घरी लावून उचलावी असे म्हटले.
यावेळी बोलताना कुलकर्णी सर म्हणाले की गेल्या बारा वर्षांपासून साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेस विद्यार्थी शिक्षक शाळा आणि शिक्षणासाठी विशेष कार्य करीत आहे या वृत्तपत्रात शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाच्या हितासाठी अनेक बातम्या आणि लेख असतात शिवाय शासन निर्णय सुद्धा प्रकाशित केले जातात मी नियमितपणे द स्कूल एक्सप्रेस वाचतो असे म्हटले.
डॉ. नरेंद्र काळे म्हणाले की, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून शासनाने सुद्धा विशेष लक्ष देण्याची गरज आहे परंतु दुःखाने म्हणावेसे वाटते की, शासन याकडे लक्ष देत नाही. कारण विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जे शिक्षक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहेत, त्यांना शिक्षणाव्यतिरिक्त शासन अन्य कामे सोपवीत आहे. यापूर्वीही शिक्षकांकडून शासनाने अनेक कामे करून घेतली आहेत. आता विद्यार्थी किती शिकलेले आहेत यांची माहिती गोळा करण्यासाठी शासनाने अपार कार्ड ही एक नवीन प्रथा सुरू केली आहे. यात सुद्धा शासनाने शिक्षकांनाच नेमले आहे. अशामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. असे तळमळीचे उद्गार त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना काढले.
माजी आमदार सय्यद सलीम यांनी आपल्या भाषणात म्हटले की, वृत्तपत्र क्षेत्रात येऊन वृत्तपत्र काढणे म्हणावे तेवढे सोपे नाही. त्यातही फक्त शिक्षण क्षेत्राला वाहून वृत्तपत्र चालविणे तर अजून जास्त अवघड आहे परंतु हे अवघड काम द स्कूल एक्सप्रेस गेल्या बारा वर्षांपासून सातत्याने करीत आहे. हि बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील एकूण एक शिक्षकांनी द स्कूल एक्सप्रेस हा पेपर आपल्या घरी लावावा. या पेपरमध्ये भरपूर शैक्षणिक माहिती असते जी विद्यार्थ्यांसाठी अमूल्य आहे तसेच शिक्षण क्षेत्रातील घडामोडी सुद्धा यात प्रकाशित केल्या जातात. त्या शिक्षकांच्या फायद्याच्या असतात असे म्हटले.
कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.जी. तांदळे सर म्हणाले की, द स्कूल एक्सप्रेस शिक्षण क्षेत्रात गेल्या बारा वर्षांपासून वाखाणण्याजोगे काम करीत आहे. शासनाने विद्यार्थ्यांना मारू नये, रागाने पाहू नये असे जे नियम लावले आहेत ते चांगल्या शिक्षणाला ऱ्हासाचे कारण ठरत आहे. प्रत्येक विद्यार्थी हा फक्त सांगितल्यानंतर चांगला अभ्यास करीलच असे नसते. अभ्यासात मागे असलेले किंवा अभ्यास न करणारे विद्यार्थीही असतात म्हणून अशा विद्यार्थ्यांना वेळप्रसंगी रागावे लागते, मारावे लागते परंतु शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे विद्यार्थ्यांना आता रागावता येत नाही आणि मारता ही येत नाही म्हणून जसे विद्यार्थी तयार व्हावे तसे होत नाही आणि होणार ही नाही. असे निरीक्षण ही त्यांनी यावेळी नोंदविले. याशिवाय चांगले हुशार विद्यार्थी असल्यास आणि त्याने उल्लेखनीय यश मिळविल्यास आजकाल सगळीकडे फक्त त्याचा समाज पुढे येऊन त्याचा उदो उदो करीत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांच्या यशाला सुद्धा जाती धर्माच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. ही चुकीची प्रथा गेल्या काही वर्षांपासून जास्तच फोफावली आहे. ही कुठेतरी थांबली पाहिजे याला कुणीतरी निर्बंध घालायला पाहिजे. कारण हुशार आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थी हा फक्त त्याच्या समाजाचा नसतो तर तो त्या शाळेचा, गावाचा, शहराचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा असतो. अशाच हुशार विद्यार्थ्यांमधून अनेक जण चांगले शिक्षण घेऊन राज्य आणि देशपातळीवर सुद्धा कार्य करतात. तेव्हा अशा विद्यार्थ्यांचे गुणगान करण्यासाठी कोणत्याही समाजाने फक्त त्याला आपल्या समाजाच्या किंवा जाती धर्माच्या चष्म्याने पाहू नये. तर प्रत्येक हुशार विद्यार्थ्यांचा उचित सत्कार करण्याकरिता प्रत्येक समाज आणि जाती-धर्माच्या लोकांनी पुढे येणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा आपणच पुढच्या पिढीला संकुचित वृत्तीने जगण्याचा मार्ग दाखवून तो प्रशस्त करण्याकडे घेऊन जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. लक्षात ठेवा इतिहास यासाठी आपल्याला कधीही माफ करणार नाही असे परखड मत मांडले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करताना प्रा. सुनील खंडागळे सरांनी म्हटले की, शिक्षक एक सामाजिक अभियंता आहे. शिकवणे हे एक साधन आहे. जे मनुष्याच्या सर्व झोपेचे सार जागृत करते आणि असेच कार्य द स्कूल एक्सप्रेस सुद्धा शिक्षण क्षेत्रात गेल्या बारा वर्षांपासून करत आहे.
आदर्श पुरस्कार कार्यक्रमाचे नियोजन संपादक शेख एजाज़, प्रा. सुनील खंडागळे, इंजि. हर्षल केकान आणि ज्येष्ठ शिक्षक नेते मुज़्तबा खान सर यांनी केले. पुरस्कार निवड समिती मध्ये एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़, विकास सरवदे, शेख इम्रान आणि अमजद पठाण यांचा समावेश होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आवेज सर, अफरोज सर, इंजि. शेख आफताब, शेख अमान यांनी विशेष परिश्रम घेतले.
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा