Breaking News

निर्लज्ज बीडकर आणि निर्लज्ज अधिकारी


निर्लज्ज बीडकर आणि निर्लज्ज अधिकारी

टीप - मी हे फक्त भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांबद्दल लिहिले आहे. जे भ्रष्टाचार देतात आणि घेतात. बाकीच्या चांगल्या लोकांनी मनावर घेऊ नये.

अविकसनशील शहरात माझी अवस्था. बीडकर कामासाठी लाच देतो आणि निर्लज्जपणे लाच घेणारे अधिकारी ती लाच घेतात. मग कधी सुधारणा होणार माझ्या बीड मध्ये. हेच चक्र चालू आहे. तुम्ही लोक प्रत्येक गोष्टीसाठी लाच देतात. अरे बाबा पण तुमच्यामुळे खूप मोठ्या भ्रष्टाचाराचे जाळे पसरले आहे. इथे खरं तर विषय कोठून चालू करायचा आणि कोठे थांबवायचा? हाच प्रश्न आहे. पण रोज थोडं थोडं बोलूंयात या विषयावर. 

कारण विषय खूप मोठा आहे. लाच घेणारा प्रत्येक अधिकारी, कर्मचारी ते लाच घेणाऱ्या शिपाई पर्यंत कोठे कोठे पैसे देतात लोकांनो. थोडी तरी लाज बाळगा. आपले काम होण्यासाठी आपण किती भ्रष्टाचार करतो. अधिकाऱ्यांना पगार असतो पोटभरून. तुम्ही दिलेले पैसे पोटच्या बाहेर आहे.

प्रत्येक भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांनी तर लाज थोडी सुद्धा ठेवली नाही. ते त्यांचे इमान वेशीला टांगून मगच येतात ऑफिस मध्ये. इथे आपण काही बाबीतच बोलू नंतर काही बोलू कारण तेच, विषय मोठा आहे. खरे तर या विकसनशील असलेल्या या देशात बीड सारखे शहर आज २०२४ मध्ये सुद्धा आहे तसेच आहे. विकसित होणे तर दुर विकसनशील होण्याच्या मार्गावर सुद्धा बीड अजून आला नाही. जग एकीकडे चालत आहे आणि आपण वर्षानुवर्षे तिथेच आहोत. तीच परिस्थिती कायम राहते. माझ्या लहानपणी जसे बीड होते तसेच आजही आहे. आज यात फक्त एकच घडले कि, बीड खूप पसरत चालले आहे. नागरी वसाहतीचे  क्षेत्रफळ फक्त वाढले आहे. नवनवीन वसाहती वाढल्या, बीड दूरवर पसरले आहे. पण बीड आजतागायत तसेच आहे. बीड मधील प्रश्न तेच आहे. माझ्या आईच्या लहानपणी पण तसेच होते. म्हणजे ६० ते ७० वर्षांपासून कायम बीडकर त्याच समस्यांमध्ये वावरत आहेत. त्याच समस्या, तेच कायम मूलभूत प्रश्न, तोच भ्रष्टाचार, तेच राजकारण आणि त्याच राजकारणातून होणारे समाजकारण. तीच सर्व परिस्थिती आणि विशेष करून तीच जनता, तेच लोक बुरसटलेले. कशाची हि खंत वाटत नाही बीडकरांना. तोच मरगळलेपणा, तिसरी पिढी आली तरी तेही तसेच कायम. मला खरं तर बीडकरांना विचारायचे कि, तुम्हाला कशाचाच फरक पडत नाही का? किती शोषिक आहात तुम्ही लोक. या रोजच्या तरी प्रश्नाला सामोरे जा. पाणी, वीज आणि रस्ते. याही समस्यांना मूग गिळून शांतच बसायचं आहे. मला वाटते कि, या घाणीतले डास चावून चावून तुमचं रक्त सळसळत नाही का? तुमच्या रक्तातील बाणेदारपणा शिल्कक नाही का? उठा जागे व्हा, असं म्हणणे देखील चूक आहे तुमच्यासमोर. कारण झोपलेल्या माणसाला जागे व्हा म्हणता येते पण मेलेल्या जीवाला जागे व्हा कसे म्हणायचे. अशीच गत तुमची झाली आहे. मेलेल्या माणसालाच काही लागत नाही, जसे की तुम्ही. नळांना पाणी १५ दिवसांनी आले तरी तुम्ही शांत असतात, बरं आपल्या सण-त्यौहारात लाईट नसते तरी तुम्ही शांत असता. तुमच्या घरच्या बाहेर कचराच कचरा असतो तरी तुम्ही शांत असता. तुमची वैयक्तिक कामे वेळेत व्हावी त्यासाठी तुम्ही अमाप पैसे देऊ करता. समोरचा अधिकारी, कर्मचारी पैसे घेतात तरी शांत असता. वाटेल तेवढा भ्रष्टाचार जो वाढला तो फक्त तुमच्यामुळेच कारण त्यांना तुम्ही सोकवून ठेवले आहे. आजच्या बीडच्या राजकाणाला तुम्हीच सोकवून ठेवले आहे. कारण तुम्ही तुमचे मत विकले. तुमच्या मतांचे पैसे ते देत गेले आणि तुम्हाला दोन-पाचशे रूपयात त्यांनी विकत घेतले. गंमत वाटते की, तुमची किमंत इतकी कमी आहे. तुम्ही लोक इतके स्वस्त आहात. म्हणूनच राजकारणी तुमच्या समस्यांवर आजतागायत राजकारण करून स्वतः च्या भाकरी भाजून घेत आहेत. आपण लोक सर्वच ठिकाणी गप्प असतो. डॉक्टर लोक तपासणी फीस ५०० वर घेतात आणि शस्त्रक्रिया करायची असेल तर कित्येक लाखात विचारूच नका. ते हि तुम्ही निमूटपणे सहन करता. स्वतः जवळ पैसे नसले तर शेती, घरदार विकून डॉक्टर लोकांना पैसे देतात. बरं एवढे पैसे देऊन कित्येक आपले पेशंट जगत नाहीत. कपड्याच्या दुकानदार कपड्यावर तीन-चार पटीने दर लावून सुद्धा त्याच्या दुकानात लिहिले असते "एकच भाव, भावात कमी करू नका" तुम्ही लोक तिथे हि शांत असतात. तुमच्याकडे काही कागदपत्र सर्व असूनही कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रॅफिक पोलिसाच्या खिशात पैसे टाकतात. अशी असंख्य उदाहरणे आहेत जिथे तुम्ही गप्प आणि गप्पच बसतात. पैसे देऊन मोकळे होतात. सामान्य लोकांनो तुमच्यामुळे हे सर्व चुकीचे साम्राज्य उभे राहिले आहे. याला तुम्ही भेदणार कसे? या चक्रव्युहात पूर्ण अडकलात. हे चक्र आता भेदणार कसे? आणि कधी? पिढ्या न पिढ्या असे चालत असणारे तुम्ही अडकलेल्या भोवऱ्याच्या बाहेर येणार कसे? यात जर तुम्हाला कोणी हात दिला तर तुम्ही तो हात सोडतात. नाहीतर तुमच्या भोवऱ्यात ओढतात. मग कसे शक्य आहे की, विकसनशील शहरात राहताल? काही छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही भ्रष्टाचार सुद्धा कमी करू शकतात. कोणत्याही शासकीय कामात पैसे देऊ नका. गाडी लायसन्स, ट्राफिक पोलीस, सरपंचापासून जिल्हा अधिकाऱ्यांपर्यंत कुणालाही कोणत्याच कामासाठी पैसे देऊ नका आणि अधिकाऱ्यांनो, तुम्ही सुद्धा थोडी तरी लाज बाळगा. तुम्हाला तुमच्या कामासाठी सरकार पगार देते. तरी निर्लज्जपणे हात पसरून लाच घेऊ नका. या विषयावर खूप लिहायचे आहे. पुढे ते यथावकाश लिहिणारंच आहे.

*लेखन - रुपाली देशपांडे*

बीड

संपर्क - *8888955539*

==================================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत