Breaking News

अधिकाऱ्यांना हटविले जाते, राजकारणी मात्र फेविकॉल च्या जोडा सारखे चिटकून राहतात

अधिकाऱ्यांना हटविले जाते, राजकारणी मात्र फेविकॉल च्या जोडा सारखे चिटकून राहतात 

बीड (एस.एम.न्युज़) - मस्साजोग येथील हत्येप्रकरणी शेवटी अपेक्षेप्रमाणेच अवघ्या चार महिन्यापूर्वी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून आलेले अविनाश बारगळ यांची उचल बांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी औरंगाबाद येथे पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असलेले तरणेबांड आयपीएस अधिकारी नवनीत कॉवत यांना बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदी पदस्थापना देण्यात आली आहे. यामुळे करे कोई भरे कोई, ये राजकारण है भई! कुठे काहीही अघटीत घडले किंवा अप्रिय घटना घडली की याचे खापर अधिकाऱ्यांवरच फोडले जाते आणि त्यांनाच हटविले जाते. मग अशा घटनांमध्ये राजकारण असो की राजकारणी, मात्र ते फेविकॉल च्या जोडा सारखे आपल्या पदावर चिटकून राहतात आणि वेठीस धरले जाते ते फक्त अधिकारी असे आता जनतेतून उघडपणे बोलले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात अनेक अप्रिय आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. यात खुनापासून अपहरण, खंडणी, बलात्कार वगैरे सारखे गुन्हे सामील आहेत. असे सर्व प्रकार फक्त जिल्ह्यातील एका तालुक्यातच कसे आणि का घडतात? या प्रकारांना आळा घालण्यासाठी आवश्यक सहकार्य पोलिसांना शासनकर्त्यांकडून का मिळत नाही? पोलिसांवर दबाव तंत्राचा वापर करून परळी तालुक्यात जंगल राज सुरू झाले आहे का? असे प्रश्न आता जनतेमधून उपस्थित होऊ लागले आहेत. नुकतेच काही दिवसापूर्वी मस्साजोग येथे देशमुख यांच्या अमानुष हत्येमुळे या सर्व प्रकारांना आता सर्व विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणात वाचा फोडली असून सत्ताधाऱ्यांविरोधात जवळपास सर्वच राजकीय पक्ष एकत्र येऊ लागले असून जनतेतही अशा प्रकारांमुळे मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत परळी येथील विविध अपराधिक घटनांच्या पार्श्वभूमीवर चार महिन्यापूर्वीच बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती देण्यात आलेले अविनाश बारगळ यांची उचल बांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी औरंगाबाद येथे पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असलेले नवनीत कॉवत यांची बीड जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाकडून आदेश आल्यानंतर नवनीत कॉवत यांनी शनिवार दिनांक २१  डिसेंबर २०२४ रोजी रात्री उशिरा १०.४५ मिनिटांनी नवनीत कॉवत यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतला आहे. बीड जिल्ह्यात त्यातल्या त्यात परळी तालुक्यात ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करणे,  देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करणे, अपहरण, खंडणी अशा प्रकारांना आळा घालणे अशी आव्हाने नवनियुक्त बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्यासमोर असणार आहे.

*गुंड आणि झुंडशाहीमध्ये अपंगही सुटला नाही?*


एकीकडे परळी तालुक्यात खून, अपहरण, खंडणी यासारख्या घटना घडत असतानाच दुसरीकडे आज याच तालुक्यात एक शिवभोजन केंद्र चालविणाऱ्याने एक अपंग व्यक्ती तिथे पैसे विना जेवण मागण्यास गेला असता त्या अपंग व्यक्तीला सदरील शिवभोजन केंद्र चालकाने अक्षरशः लाथा बुक्क्यांनी जनावरासारखे जमिनीवर लोळवून मारले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड गतीने मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

*मुंडे साहेबांचा आत्मा तळमळत असेल!*

परळी तालुक्यात होत असलेल्या अशा वेगवेगळ्या विदारक घटना पाहून दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचा आत्मा तळमळत असेल. त्यांचा वारसा सांगणाऱ्यांना याचे कुठलेही सोयर सुतक असल्याचे दिसत नाही. त्यांचा वारसा सांगणारे फक्त सत्तेत आमदार, खासदार, मंत्री, संत्री होण्यातच धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे परळी तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यातील जनतेला मुंडे साहेबांची प्रकर्षाने आठवण येत आहे.

 ==================================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत