राजकीय विश्लेषकांची गणिते चुकली; उमेदवारांसह मतदार ही पडले बुचकळ्यात! निकाल लागेपर्यंत यावर होणार काथ्याकूट!
बीड (एस.एम.न्युज़) - विधानसभा निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघात मतदारांनी दाखविलेल्या निरुत्साह मुळे या मतदारसंघात फक्त ५८.३३% मतदान झाल्याने राजकीय विश्लेषकांची गणिते चुकली असून उमेदवारांसह मतदार ही बुचकळ्यात पडले आहेत. आता यावर निकाल लागेपर्यंत काथ्याकूट होणार आहे.
बीड जिल्ह्यातील सहा पैकी जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीड विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये कमालीचा निरुत्साह दिसून आला. येथील मतदानाची टक्केवारी सहा मतदार संघापैकी सर्वात कमी राहिली आहे. या मागची कारणमीमांसा यथावकाश जनतेसमोर येईलच. परंतु तूर्तास तरी संध्याकाळी मतदान पूर्ण झाल्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीत सहापैकी परळी मतदारसंघ झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला असून जिल्ह्याचे ठिकाण असलेला बीड विधानसभा मतदारसंघ मात्र सर्वात शेवटी राहिला आहे. यामागे दोन्ही प्रमुख गठबंधन म्हणजेच महाविकास आघाडी व महायुती कडून असलेले दोन्ही क्षीरसागर उमेदवार हेच एक प्रमुख कारण असल्याचे मतदारातून बोलले जात आहे.
*बीड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची टक्केवारी खालील प्रमाणे -*
१) परळी - २३३ - ७२.०२%
२) गेवराई - २२८ - ७१.२३%
३) केज - २३२ - ६९.५९%
४) माजलगाव - २२९ - ६७.२६%
५) आष्टी - २३१ - ६६.१९%
६) बीड - २३० - ५८.३३%
यात मतदानाची सर्वात जास्त टक्केवारी परळी विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी टक्केवारी ही बीड विधानसभा मतदारसंघात संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत मतदान संपल्यानंतर समोर आली असून जिल्ह्यातील सर्व सहा मतदार संघातील मतदानाची सरासरी टक्केवारी ही ६७.३४ भरली आहे.
*उमेदवारांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज!*
बीड विधानसभा मतदार संघात पक्षीय आणि अपक्ष मिळून एकूण ३१ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी प्रमुख उमेदवारांमध्ये क्षीरसागर (यांच्याकडे असंख्य शिक्षण संस्था आणि अनेक वेगवेगळे उद्योग असून त्यात कार्यरत असलेल्यांचे पेटी पॅक मतदान बरेच असल्याचे नेहमी बोलले जाते) घराण्यातील विद्यमान आ. संदीप क्षीरसागर आणि डॉ. योगेश क्षीरसागर हे अनुक्रमे महाविकास आघाडी आणि महायुती कडून उमेदवार होते. मनसे आणि वंचितचेही उमेदवार रिंगणात होते. या पक्षीय उमेदवारांशिवाय अपक्ष म्हणून अनिल जगताप, ज्योती मेटे, कुंडलिक खांडे आणि भागवत तावरे असे हे ८ उमेदवार चर्चेत होते. याशिवाय अजून २३ उमेदवार रिंगणात होते. असे एकूण ३१ उमेदवार रिंगणात असतानाही बीड विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ही फक्त ५८.३३% एवढीच आल्याने एवढ्या मोठ्या संख्येत उमेदवार मैदानात असतानाही ते मतदारांना मतदान करण्यासाठी आकर्षित करू शकले नाहीत? की त्यांच्यावर मतदारांचा रोष होता? हे यथावकाश समोर येईलच. पण मतदानाची घटलेली टक्केवारी ही का घटली? उमेदवार कार्य कर्तुत्वात कुठे कमी पडले? याचे आत्मपरीक्षण यावेळी निवडणुकीच्या मैदानात उतरून निवडणूक लढविलेल्या प्रत्येक उमेदवाराने करण्याची गरज आहे. कारण बीड सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी ७०% पर्यंत सुद्धा मतदान होत नाही, याला काय म्हणावे? असा प्रश्न सहज समोर येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा