Breaking News

*बीड विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरण्याचे कारण!*


बीड (एस.एम.न्युज़) - काही महिन्यापूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मोठ्या हिरीरीने सहभाग नोंदवून मतदान केले होते. तेव्हा मतदानाची टक्केवारी ७०% च्या जवळपास होती. म्हणून या विधानसभा निवडणुकीत सुद्धा तशाच प्रकारे मतदार मतदान करतील असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तविला जात होता, परंतु बीड जिल्ह्यातील सहा पैकी बीड विधानसभा मतदार संघात मतदारांमध्ये कमालीचा निरुत्साह दिसून आला. येथील मतदानाची टक्केवारी सहा मतदार संघात शेवटी राहणार असल्याचे दिसून येत आहे. या मागची कारणमीमांसा यथावकाश जनतेसमोर येईलच.

बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीवेळी भाजप आणि मित्रपक्षा विरोधात बीड जिल्हावासियांनी आपल्या मताधिकाराचा जोरदार वापर केला होता. त्यावरून यावेळी विधानसभा निवडणुकीत सुद्धा लोकसभेसारखेच काहीसे चित्र असेल असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तविला जात होता. परंतु बीड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी राजकीय पक्ष, उमेदवार आणि विश्लेषकांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. बीड जिल्ह्यात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या बीड विधानसभा मतदार संघासाठी होत असलेल्या मतदानाची टक्केवारी ही इतर पाच मतदार संघापेक्षा सर्वात शेवटी येऊ लागली आहे. मतदानाची घटलेली ही टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडेल? आणि कोणाचे नुकसान करून जाईल? हे येत्या २३ तारखेलाच दिसून येणार आहे. तोपर्यंत प्रत्येक पक्ष व पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते आणि एक दिवसाचा मतदार राजा आपापल्या वकूबानुसार निकालाची हवेत चर्चा चालू ठेवतील यात शंका नाही. असो!


*ही असू शकतात कारणे?*


१) महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी असो की विरोधक दोन्ही बाजूंनी एक दुसऱ्यांवर आरोप-प्रत्यारोप करण्याशिवाय जनहिताचे कार्य म्हणावे तसे केलेच नाही.

२) सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या नाही, उद्योग धंदे नाहीत, उद्योग करण्यासाठी कर्ज नाही.

३) मजुरांच्या हातांना काम नाही. काम मिळाले तर आवश्यक तेवढी मजुरी मिळत नाही.

४) शेतकऱ्यांच्या पिकांना व मालाला हमीभाव नाही. नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही.

५) काँग्रेस व्यतिरिक्त प्रमुख पक्ष म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसारख्या पक्षाची उडालेली शकले.

६) या दोन्ही पक्षांच्या झालेल्या दोन-दोन तुकड्यांपैकी एक तुकडा सत्ताधारी पक्षाकडे तर दुसरा तुकडा विरोधी पक्षाकडे अशी गंमत.

७) लाडक्या बहिणींना ५ महिन्यात दिलेले ७५०० रुपयेही मतदानाचा टक्का वाढवू शकले नाही.

८) सत्ताधारी आणि विरोधक दोघांवर ही जनतेची नाराजी.

९) आता स्थानिक पातळीवरील सर्वात मोठे कारण म्हणजे राज्यात जे सत्ताधारी आहेत त्या पक्षात प्रमुख पक्ष म्हणून भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष. या प्रमुख तीन पक्षाकडून उमेदवार म्हणून डॉ. योगेश क्षीरसागर, तर राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन प्रमुख पक्षाकडून उमेदवार म्हणून विद्यमान आ. संदीप क्षीरसागर. या दोघांना उमेदवारी देणारे पक्ष जरी सहा असले तरी उमेदवार हे दोनच आणि ते दोन्ही पण क्षीरसागरच. बाकीच्या उमेदवारांमध्ये मनसे आणि वंचित चे उमेदवार स्वतंत्र उभे असले तरी त्यांचे अस्तित्व अगदी नगण्यच. बाकीचे अपक्ष. त्यातही मराठा आणि मुस्लिम उमेदवार बहुसंख्येने. ही सर्व अवस्था पाहून बहुतेक बीड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी होणारा भावी आमदार कोण? याचा ताळेबंद मनाशी लावून तो कुणीही असला तरी असणार क्षीरसागरच हे समजून घेतले. मतदार संघात तिरंगी, चौरंगी किंवा पचरंगी लढत असली तर मतदारांनाही मताधिकाराचा वापर करताना चेव येतो. येथे अशी लढत नसल्याने विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाकडे मतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसते.


*बीड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची टक्केवारी खालील प्रमाणे -*


१) परळी - २३३ - ६६.३१%

२) गेवराई - २२८ - ६४.५६%

३) आष्टी - २३१ - ६१.८९%

४) माजलगाव - २२९ - ६०.२७%

५) केज - २३२ - ५९.४५%

६) बीड - २३० - ५१.९२%


यात मतदानाची सर्वात जास्त टक्केवारी परळी विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी टक्केवारी ही बीड विधानसभा मतदारसंघात संध्याकाळी ०५:०० वाजेपर्यंत समोर आली आहे.


========================


*विधानसभा निवडणुक झाल्याने आता वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.*


१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

 २) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.


*- एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*वेळ - सकाळी ८ ते १० आणि रात्री १० ते ११ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत