पक्षीय अपक्षांमुळे अपक्षिय अपक्षांचा हिरमोड!
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षीय अपक्षांमुळे अपक्षिय अपक्षांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड होणार आहे. यावेळी राजकीय क्षेत्राबाहेरील अपक्षांची डाळ निवडणुकीत शिजणार नाही.
लोकशाही मध्ये निवडणूक आल्यास त्या लढविण्याची सर्वांना मुभा आहे. यामुळे एरवी राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्यांशिवाय कुणीही राजकारणात स्वारस्य घेत नसले तरी लोकशाहीचा महाकुंभ अर्थातच निवडणूक आली की, राजकीय क्षेत्राबाहेरील व्यक्ती सुद्धा आपले असेल नसेल ते इप्सित साध्य करण्याकरिता निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. अशांना कोणताही राजकीय पक्ष उमेदवारी देणे तर दूर जवळ फटकू सुद्धा देत नाहीत. म्हणून असे लोक निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उतरतात. असे चित्र प्रत्येक निवडणुकी वेळी हमखास दिसून येते.
तसे पाहता अपवादात्मक वेळी अपक्ष निवडून येतात. तेही ते ज्या पक्षात कार्यरत असतात त्या पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्यात खरेच दम असेल तर ते अपक्ष म्हणून उभे राहतात आणि आपल्या संपर्कावर, कार्यकर्तृत्वावर किंवा साम, दाम, दंड, भेद या नीतींचा अवलंब करून निवडून येतात. अशा अपक्षांव्यतिरिक्त जे कधीही राजकीय क्षेत्रात वावरत नाही किंवा कुठल्याही पक्षाशी दूर दूर संबंध नसतो. फक्त लोकशाही मध्ये निवडणूक लढविता येते, या धोरणानुसार किंवा आपल्याला काय हवे नको ते साध्य करण्यासाठी निवडणुकीत अपक्ष खेळी खेळतात.
गेल्या काही वर्षाच्या राजकारणावर नजर टाकल्यास असे दिसून येते की, अशा अपक्षांची निवडणूक काळात मोठ्या संख्येने खोगीरभरती वाढू लागली आहे. निवडक पक्षीय उमेदवार सोडले तर डझनावरी अपक्षांची रेलचेल उमेदवारांच्या नावांची अंतिम यादी तयार झाल्यानंतर दिसून येते.
अपक्ष उमेदवार हे अनेक प्रकारचे असतात. ज्यांना स्वतः वाटते की, आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी. ज्यांना कुणीतरी महत्त्वाकांक्षी व्यक्ती आर्थिक रसद पोहोचवून निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरवितात. तर काहीजण आपल्या अपक्ष उमेदवारीचा सौदा करून स्वतःच्या पदरात आर्थिक लाभ उचलण्याकरिता उभे राहतात. अशा अनेक प्रकारचे अपक्ष उमेदवार निवडणुकीत उभे राहतात.
अशा अपक्ष उमेदवारांमुळे कधी सत्ताधाऱ्यांची तर कधी विरोधकांची पंचाईत ही होते किंवा चांदीही होते. यावेळी सुद्धा राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवारांची रेलचेल दिसून येत आहे. परंतु यंदा नेहमीप्रमाणे राजकीय क्षेत्राबाहेरील अपक्ष उमेदवार अत्यल्प राहणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे.
राजकीय क्षेत्रातील किंबहुना कोणत्या ना कोणत्या पक्षाशी संलग्न असलेल्या अनेक व्यक्ती यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात दिसून येणार आहे. कारण यावेळी गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने जे लोक नगरसेवक पदाचे स्वप्न पाहत होते किंवा निवडणूक लढवण्याची तयारी करत होते त्यांची मोठ्या प्रमाणात गोची झालेली आहे.
अशांपैकी अनेक हौसे, नवसे, गवसे यावेळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू इच्छितात. तसेच महाराष्ट्र राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन तगड्या पक्षात उभी फूट पडल्याने दोनाचे चार पक्ष झाले आहेत. या दोन्ही पक्षात नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये विभागणी होऊन काहीजण एका तर काहीजण दुसऱ्या गटात सामील झाले आहे. पर्यायाने विधानसभा निवडणूक लागल्यानंतर जेव्हा उमेदवारी देण्याचा प्रश्न आला तर अगोदरच दोनाचे चार झालेले आणि त्यात पुन्हा महाराष्ट्र विकास आघाडी हे तीन प्रमुख पक्ष सामील असलेला एक गट तर महायुती हा तीन पक्ष सामील असलेला दुसरा गट अशाप्रकारे पक्ष सहा परंतु आघाडी आणि युती असल्याने एका जागेसाठी सहा पक्षांमधून फक्त दोन उमेदवारांनाच उमेदवारी मिळू लागल्याने उर्वरित चार पक्षाच्या इच्छुकांच्या इच्छेवर पाणी फिरू लागले आहे.
या दोन्ही गटाच्या अन्य मित्रपक्षांना सुद्धा उमेदवारीत हिस्सेदारी हवी आहे. मग यात समाजवादी, रिपाईं किंवा मनसे आणि अन्य कोणताही पक्ष असो सर्वांच्या महत्त्वाकांक्षा कमी जास्त प्रमाणात आहेतच. आता एवढी सगळी झालेली खिचडी पाहता प्रत्येकाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे उमेदवारी पासून वंचित राहिलेत असे पक्ष किंवा इच्छुक नेते बंडखोरी म्हणून अपक्ष उमेदवारी दाखल करू लागले आहेत किंवा त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करावी म्हणून त्यांना अदृश्य हात मदत करू लागले आहेत.
राजकीय पक्षांच्या अशा खेळीमुळे जे राजकारण व राजकीय पक्ष विरहित अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरतात, निवडणूक लढवू इच्छितात, कुणी आपले इप्सित साध्य करू पाहतात तर कोणी आर्थिक जुळवाजुळव करून लाभ उचलतात. अशा सर्वांच्या आशांवर जवळपास पाणी फिरण्याची शक्यता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दिसून येत आहे.
आतापर्यंत दिसून येत असलेल्या एकंदरीत परिस्थिती व चित्रावरून असेच दिसते की, यावेळी पक्षीय अपक्षांमुळे अपक्षिय अपक्षांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड होणार आहे तसेच अशा अपक्षांना आपले इप्सित साध्य करता येणार नाही किंवा आर्थिक लाभही उचलता येणार नाही. अशी एकंदरीत स्थिती आहे.
लेखन - एस.एम.युसूफ़
======================
*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.
संपर्क -
*एस.एम.युसूफ़*
रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा