Breaking News

इच्छुकांची गंमत; मतदारांनी सावध राहण्याची गरज!



सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. या अनुषंगाने राजकीय आखाड्यात चांगलेच रमलेल्यांनी आणि नवोत्सुक असलेल्यांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या शैलीनुसार साम, दाम, दंड, भेद सह जनतेसमोर जाण्याचा किंवा जनतेला आपल्याकडे बोलविण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशाच प्रकारे काल एका संघटनेच्या सर्वेसर्वा असलेल्या व्यक्तीने पत्रकार परिषद बोलावली. मी जरी पत्रकार म्हणून वृत्तपत्र क्षेत्रात वावरत असलो तरी राजकीय लोकांच्या पत्रकार परिषदांमध्ये कधीच हजेरी लावत नाही. कारण अशा पत्रकार परिषदांमध्ये सत्य आणि वस्तुस्थिती बाजूला सारून ९०% भामटेगिरी, खोटे-नाटे, गोडी-गुलाबीने पत्रकारांच्या समोर मांडले जाते. वस्तुस्थिती मात्र त्यापेक्षा वेगळी असते. असो!
       हो तर काल घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये संबंधित व्यक्ती राजकारणी नसल्याने तसेच कुठल्याही पक्षाशी, नेत्याशी साधे कार्यकर्ते म्हणून सुद्धा संलग्न नसल्याने एक मोठ्या सामाजिक संघटनेचे सर्वेसर्वा म्हणून त्यांच्या निमंत्रणावर पत्रकार परिषदेत जातीने उपस्थित राहिलो. तेव्हा राजकारणाचा कुठलाही गंध किंवा अनुभव नसलेल्या या साध्या व्यक्तीने सुरुवातीलाच पत्रकारांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. त्याच मनोगतातून प्रश्न हेरून जेव्हा पत्रकार मंडळी प्रश्नांचा भडीमार करू लागले, तेव्हा अपेक्षेप्रमाणे तो व्यक्ती गडबडला. एवढेच नाही तर त्याने मी पहिल्यांदाच पत्रकार परिषदेला सामोरे जात आहे हे लक्षात घेऊन जरा सोपे प्रश्न विचारा ना राव. अशा अवघड प्रश्नांचा भडीमार तोफगोळ्यासारखा माझ्यावर करू नका. मी गोंधळतोय, असे साधे सरळपणाने सांगून टाकले. त्या व्यक्तीची ही अवस्था पाहता राजकीय क्षेत्र हा त्या माणसाचा पिंड नाही. यावर पत्रकार परिषदेत जमलेल्या पत्रकारांमध्ये कुजबूज सुरू झाली. कुणी आपण विचारलेल्या प्रश्नानंतर कशी घाबरगुंडी उडाली, यावर बोलत होते तर कुणी राजकारण हा त्यांचा प्रांत नाही असे म्हणत होते. असो!
              एकदाची ही पत्रकार परिषद अवघ्या अर्धा तासाच्या आतच संपली आणि त्यानंतर संबंधित इच्छुक व्यक्तीकडून ठेवण्यात आलेल्या जेवणाचा आस्वाद उपस्थित सर्व पत्रकारांनी घेतला आणि आपापल्या मार्गाला लागले. आज सकाळी व संध्याकाळी येणारी वृत्तपत्रे चाळून पाहिल्यानंतर एकाध दुसरा अपवाद वगळता त्या पत्रकार परिषदेची बातमी वृत्तपत्रात दिसलीच नाही. याचाच अर्थ त्या व्यक्तीला पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या जवळपास ५० पत्रकारांनी उमेदवार म्हणून नाकारले, असा घ्यावा का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. 
          कारण तत्पूर्वी या पत्रकार परिषदेत मोजक्याच पत्रकारांनी मोजकेच आणि तीही नेहमीचीच प्रश्न विचारली असता त्यावर त्या व्यक्तीकडून आलेली उत्तरे अत्यंत गमतीशीर होती. किंबहुना त्या उत्तरातून राजकीय अपरिपक्वता दिसत होती. पत्रकाराने विचारले, तुम्हाला सामाजिक कार्य करता-करता असे का वाटू लागले की तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरावे आणि निवडणूक लढवावी? तर यावर त्या व्यक्तीचे उत्तर होते, राजकारणात येणे किंवा निवडणूक लढविणे माझ्या ध्यानीमनी नव्हते परंतु तुम्हीच पत्रकारांनी आपापल्या वृत्तपत्रातून मी कसा चांगला उमेदवार राहील, माझे ४० विधानसभा मतदारसंघावर कसे प्रभुत्व आहे? मी आणि आमच्या संघटनेने ठरविले तर या ४० ही विधानसभा मतदारसंघात उमेदवार निवडून ही आणू शकतो किंवा पाडूही शकतो. असे सर्व काही आकडेवारी सहित मांडले, ते सर्व वाचून आणि वारंवार पाहून विचार केला की, सर्वांचीच तशी इच्छा असेल तर उतरावेच राजकारणात आणि आमदारकी लढवावीच म्हणून ही पत्रकार परिषद ठेवून तुम्हा सर्वांना बोलावले. आता या उत्तरात आहे की नाही गंमत म्हणजे कसं बघा. तुमची इच्छा असो किंवा नसो परंतु वृत्तपत्रात पत्रकार लिहितात म्हणून आपण उमेदवार व्हावे असे जर वाटत असेल तर किती हा बालिशपणा. आज कालच्या युगात निवडणुकीत उतरणे, निवडणूक लढविणे आणि जिंकून येणे हे काही येऱ्या-गबाळ्याचे काम नाहीच. त्यासाठी नाकाने केळी सोलून दाखवावी लागते. लोखंडाचे हरभरे चावावे लागतात. शिवाय सगळ्यात मोठी बाब म्हणजे जनतेला मूर्खात काढण्याचा बेरकी आणि हरामीपणा अंगी असावा लागतो. परंतु हा बिचारा नामवंत संघटनेचा सर्वेसर्वा, साधा सरळ, चांगल्या मनाचा माणूस या सर्व बाबी कशाशी खातात याचा गंधही नसलेला, सोज्वळ माणूस. हा माणूस जर खरेच कोणत्याही एखाद्या पक्षाकडून उमेदवार होऊन मैदानात उतरला किंवा कोणत्याही पक्षाने तिकीट दिले नाही तर अशावेळी कोणत्या सेक्युलर पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा हे सुद्धा मनाने ठरवू शकत नसलेला, असे याच व्यक्तीने पत्रकार परिषदेत सांगितले. तर मग अशा व्यक्तीला आपला नेता आपला आमदार म्हणून जनता कशी मान्य करेल? कसे मतदान करेल? असे प्रश्न नक्कीच उपस्थित होतात. 
             कारण ज्याला स्वतःला राजकारणात गेल्यानंतर नेमके काय करायचे? कसे करायचे? याचा कुठलाही अभ्यास नाही, तर मग तो लबाडांच्या राजकीय दुनियेत कसा जाऊ शकतो? हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो आहे. असो!
               कारण ज्या व्यक्तीला कोणत्याही पक्षाची काम करण्याची पद्धत माहित नाही. कधी कोणत्या पक्षाची नाळ जुळलेली नाही. राजकीय क्षेत्रात कुठलेही कार्य नाही. स्वतः निवडणुकीत उभे राहून निवडणूक लढविण्याचा अनुभव नाही. आमदार तर दूर कधी नगरसेवकाची निवडणूक सुद्धा लढवली नाही. अशा सर्व नाही असलेल्या बाबी असून सुद्धा फक्त आपल्या हाती एक मोठी संघटना आहे, तीही राजकीय नाही तर सामाजिक आहे. तरीसुद्धा आमदारकीच्या निवडणुकीत उभे राहण्याचे धाडस एक संघटनेचा सर्वेसर्वा कसा करू शकतो? ज्याला राजकारणाचा काहीच गंध नाही. यामुळे काही पत्रकार मंडळी आपसात कुजबूज सुद्धा करत होती की, हेच राजकारणात उतरू इच्छितात की, यांना पडद्यामागून कुणीतरी मदत करत डमी म्हणून पुढे आणून अशा नवख्यांना निवडणुकांच्या मैदानात उतरवून ठराविक जातीच्या किंवा धर्माच्या मतांची विभागणी करून आपले इप्सित किंवा आपली महत्वाकांक्षा साध्य करू पाहत आहे का? की ही व्यक्तीच स्वतः होऊन पुढे येऊन कोणत्यातरी एखाद्या पक्षासोबत आर्थिक देवाणघेवाण करण्याकरिता हे पाऊल उचलत आहे? असेही प्रश्न उपस्थित केले जात होते. असो!
             राजकारणी असो की, संघटनात्मक कार्य करणारे असो. ते आपल्या परीने विचार करतात. आपल्याला नेमका कशात फायदा होईल? कोणता मार्ग अवलंबवावा? यासाठी नेहमीच दक्ष व सतर्क राहतात. मात्र मतदार राजा नेहमीच बेसावध असतो. कधी भावनेच्या भरात, कधी जाती धर्माच्या आवेशात तर कधी बोटी आणि चपटीच्या आमिषात तर कधी करकरत्या नोटांच्या आमिषाने मतदानादिवशी मतदान करून मोकळा होतो व नंतर पाच वर्ष तोच मतदार त्याच्याच मतदान करण्याच्या चुकीमुळे निवडून आलेल्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीच्या नावाने बोंबा मारत फिरत असतो. मजबूत आणि सुदृढ लोकशाही करिता ही शोचनीय बाब आहे. असे होऊ नये नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, खासदार या लोकशाहीच्या पदांसाठी योग्य आणि लायक उमेदवारालाच मतदान करून निवडून आणावे. खोगीरभरती वाढविणाऱ्या इच्छुकांनी अशा कितीही गमती केल्या तरी मतदार राजा हो, मतदान करताना तुम्हाला दक्ष व सावध राहण्याची गरज आहे.

*लेखन - एस.एम.युसूफ़*
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - ९०२१ ०२ ३१२१



=============== 

*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
 
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.

संपर्क -

*एस.एम.युसूफ़* 

रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत