बीडच्या एआरटीओंचा मनमानी कारभार! हक्काची सरकारी जागा असताना कार्यालय भाड्याच्या जागेतून पुन्हा भाड्याच्याच जागेत हलविले कुमशी रस्त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जागेत कार्यालय स्थापन करण्यास उदासीनता का?
बीड (एस.एम.न्युज) - जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना रोडवरील भाड्याच्या जागेतून निघून पिंपरगव्हाण रस्त्यावरील भाड्याच्या जागेत हलविण्यात येत आहे. यामुळे खाजगी जागा मालकाचे चांगभले होणार असून शासनाचे मात्र पुन्हा एकदा दिवाळे निघणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. याशिवाय वाहन चालकांना पुन्हा त्रासास सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात असून कुमशी रस्त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जागेत कार्यालय स्थापन करण्यास उदासीनता का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला असून येथून कार्यालय अळगळीच्या जागी हलविण्यात एआरटीओ यांची मनमानी असल्याचे बोलले जात आहे.
बीडचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे सध्या जालना रोडवरील नामलगाव फाट्याजवळ कार्यरत आहे. काही वर्षांपूर्वी ज्या इमारतीमध्ये हे कार्यालय थाटण्यात आले होते ती इमारत शासकीय किंवा प्रशासकीय मालकीची नव्हती तर खाजगी मालकीची होती व भाडेतत्त्वावर घेण्यात आली होती. तिथे दैनंदिन कामकाज चांगले रूळले होते. दोन वर्षांपूर्वीच हे कार्यालय नीटनेटके करण्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली होती. परंतु का कुणास ठाऊक एआरटीओंच्या मनात आले आणि तिथून कार्यालय आता पिंपरगव्हाण रस्त्यावरील खाजगी जागा मालकाच्या जागेवर हे कार्यालय येत्या 2 सप्टेंबर 2024 पासून स्थलांतरित करण्यात येणार आहे. तिथूनच यापुढे बीड च्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे कामकाज चालविले जाणार आहे. यामुळे या नवीन जागेत जाऊन आपली कामे करून घेताना वाहन चालकांना पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागणार आहे. या नवीन जागेवर जाण्यासाठी असलेले अहेमदनगर रोड तसेच पिंपर गव्हाण रोड हे दोन्ही रस्ते जवळपास अर्धा किलोमीटर कच्चे आहेत. ते कधी बनवण्यात येतील हे सांगता येत नाही म्हणून जोपर्यंत दोन्ही रस्ते डांबरीकरण किंवा कॉंक्रिटीकरणाने बांधले जात नाही तोपर्यंत या नवीन जागेवर गेलेल्या एआरटीओ कार्यालयात जाणाऱ्या वाहन चालकांना त्रास सहन करावा लागणार आहे. शिवाय ही जागा शासकीय किंवा प्रशासकीय मालकीची नसून खाजगी मालकाचीच आहे. म्हणजे पूर्वीच्या खाजगी जागेवर सुद्धा भाडे देऊनच कार्यालय चालविले जात होते. आता या जागेवरही भाडे देऊनच कार्यालय चालविले जाणार आहे. मग हायवे टच असलेल्या, चांगले मजबूत रस्ते असलेल्या जागेवरून आणि विना त्रास कार्यालयात जाऊन कामे होत असताना कुणाच्या लाभासाठी पिंपरगव्हाण रस्त्यावर हलविण्यात येत आहे?आणि कशासाठी? याची चौकशी व्हायला हवी असेही बोलले जात आहे. कारण जालना रोडच्या कार्यालयासाठी दोन वर्षांपूर्वीच लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता. आता पिंपर गव्हाणच्या कार्यालयासाठीही लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. यातून खाजगी जागा मालकांचे चांगभले होणार असून शासनाचे मात्र दिवाळे निघणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जागेत कार्यालय का थाटले जात नाही?
बीडचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या भाड्याच्या इमारतींमध्ये थाटले जात आहे. हे पाहता हे कार्यालय शासकीय-प्रशासकीय हक्काच्या जागी असावे म्हणून काही वर्षांपूर्वी काही जणांनी मिळून शासन-प्रशासनाकडे पाठपुरावा करत एआरटीओ कार्यालयासाठी हक्काची शासकीय जागा देण्यात यावी म्हणून लढा दिला होता. त्यात यश सुद्धा आले. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी कुमशी रस्त्यावर एआरटीओ कार्यालयासाठी मोठी जमीन दिली आहे. आता त्या जागेची नोंद उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या नावाने प्रशासनाकडे आहे. त्या जागी कार्यालय थाटले तर पुन्हा पुन्हा अशाप्रकारे कार्यालय एकीकडून दुसरीकडे हलविण्याची वेळ येणार नाही. शासकीय हक्काच्या जागेवर हक्काचे कार्यालय तयार होईल परंतु या शासकीय जागेत कार्यालय हलविण्यात उदासीनता दिसून येत आहे. या मागील गौडबंगाल काय? याची शहानिशा व्हायला हवी असे बोलले जात होते.
तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोतींच्या माळा!
आरटीओ कार्यालय जिथे असते तिथून 200 मीटर च्या आतील परिसरात एजंट फिरकता कामा नये किंवा त्यांची बैठक असू नये असा नियम आहे परंतु पिंपर गव्हाण रस्त्यावर जिथे एआरटीओ कार्यालय हलविण्यात आले आहे तिथे मुबलक जागा नाही म्हणून खाजगी जागा मालकाने एआरटीओ कार्यालयासमोरच थोडेथोडके नव्हे तर चक्क चाळीस गाळे बनवून एजंटांकडून ॲडव्हान्स रक्कम घेत भाडेतत्त्वावर देऊनही टाकल्याचे बोलले जात आहे. एवढ्या कमी अंतरात आता एआरटीओ कार्यालयासमोर एजंटांची बैठक व्यवस्था झाल्याने येथील एआरटीओ आणि एजंट आता यापुढे तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोतींच्या माळा म्हणाले नाही तरच नवल.
कागदपत्रे गहाळ होण्याची दाट शक्यता
कितीही सांगितले जात असले की, आता सर्व कामे ऑनलाईन होतात तरीही आरटीओ कार्यालयातील कामेही आजही ऑफलाइनच होतात. प्रत्येक कामासाठी वाहन चालक व मालकांना एआरटीओ कार्यालयात जावेच लागते. आजही मोठ्या प्रमाणात रजिस्टर मेंटेन करावेच लागते. कार्यालय अजूनही 100% कॉम्प्युटराईज्ड झालेले नाही. हे पाहता वारंवार एकीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे, तिसरीकडून चौथी कडे अशा प्रकारे एआरटीओ कार्यालय हलविण्यात येत असल्याने कार्यालयातून कागदपत्रे मोठ्या प्रमाणात गहाळ होण्याची शक्यता असते नव्हे कागदपत्रे गहाळ होतातच आणि याचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास वाहन चालक व मालकांना सहन करावा लागतो परंतु याचे कुठलेही सोयरसुतक एआरटीओ यांना असल्याचे दिसत नाही.
सात किलोमीटर लांब गायरान च्या जागेत; जनतेतून तीव्र नाराजी
जालना रोड सारख्या महामार्गावरून पिंपरगव्हाण सारख्या आडमार्गी रस्त्यावर एआरटीओ कार्यालय हलविण्यात आल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. एक तर हा रस्ता एआरटीओ कार्यालयापर्यंत पूर्ण बनविण्यात आलेला नाही तसेच अहेमदनगर रस्त्यावरून सुद्धा या कार्यालयापर्यंत जाण्यासाठी पूर्ण रस्ता बनविण्यात आलेला नाही. दोन्हीकडचे रस्ते अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त कच्चे आहेत. शिवाय शहरापासून सात किलोमीटर लांब गायरानच्या जागी असल्याने वाहन चालकांना हेलपाटा मारावा लागणार आहे. यामुळे इतरांसह महिला वर्गातून देखील तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
========≠===========
*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.
संपर्क -
*एस.एम.युसूफ़*
रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा