बीड जिल्हा परिषद मराठी कन्या शाळेत शून्य विद्यार्थीनी रिकाम्या शाळेत मुख्याध्यापकासह पाच शिक्षक आणि सहा शिपाई बसून विद्यार्थिनी असलेल्या शाळेत मात्र शिक्षक व शिपायांची वाणवा शासनाला वेतनापायी दरमहा लाखोंचा भुर्दंड
बीड (प्रतिनिधी) - बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागात अंधेर नगरी चौपट राजा किंवा आंधळा दळतोय कुत्र पीठ खातोय असा प्रकार सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय तसेच योजना शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्यासमोर गेल्या काही काळापासून एकही विद्यार्थी पटावर नसताना सुद्धा या दोन्ही कार्यालयाच्या इमारतीत कागदोपत्री सुरू असलेल्या जिल्हा परिषद मराठी कन्या शाळेत विद्यार्थी संख्या अक्षरशः शून्य असताना सुद्धा तिथे एक मुख्याध्यापकासह पाच शिक्षक आणि सहा चपराशी नियुक्त केलेले आहे. हे सर्वजण जणू काही शासन-प्रशासनाचे जावई असल्याप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून कोणतेही कर्तव्य न करता दरमहा लाखो रुपयांचे वेतन फुकटात घेत आहेत. यामुळे त्यांच्या वेतनापायी शासनाला दरमहा लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर याच्या विरुद्ध आणि विदारक स्थिती बीड शहरासह जिल्हाभरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिसून येते. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कुठे चांगली तर कुठे बऱ्यापैकी आहे, तिथे अनेक विषय शिक्षकांची कमतरता आहे. काही ठिकाणी तर एक शिक्षक चार-चार वर्ग सांभाळत आहे. काही ठिकाणी विद्यार्थी, वर्ग आणि तुकड्यांच्या मानाने शिक्षकांची संख्या अत्यल्प आहे. अशा शाळांमधील शिक्षक जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकाऱ्यांकडे विनंती करून बेजार झालेले आहेत की, आमच्या शाळेत शिक्षक वाढवून द्या परंतु जिल्हा परिषद येथे असलेल्या ऐतखाऊ आणि निगरगट शिक्षक आणि चपराशांमधून एकालाही इतर ठिकाणी कर्तव्यावर पाठविण्याची हिंमत शिक्षणाधिकाऱ्यांमध्ये नसल्याचे अत्यंत विदारक चित्र बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात दिसून आले आहे. येथील मुख्याध्यापकासह सर्व ऐतखाऊ शिक्षक आणि चपराशी कुणाच्या आशीर्वादाने गेल्या काही वर्षांपासून येथे नुसतेच बसून तुकडे तोडत आहेत? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. अन्यथा हे बेशरम शिक्षक आणि चपराशी सेवानिवृत्त होईपर्यंत कुठलेही काम न करता अशाच पद्धतीने दरमहा वेतन उचलून आयते बसून खातील. पर्यायाने विद्यार्थ्यांचे नुकसान करतील. या प्रकरणांमध्ये जो कोणी किंवा जे कोणी दोषी असतील त्यांना वेळप्रसंगी निलंबित केले तरी कमीच असेल.
जिल्हा परिषदेच्या याच मराठी कन्या शाळेतील उर्दू माध्यमाच्या तेलगाव नाका परिसरातील शाळेत इयत्ता पहिली ते आठवी ची शाळा भरते. तिथे मोठ्या संख्येने उर्दूचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनी आहेत. त्यांच्यासाठी तीन शिक्षिका नियुक्त केलेल्या आहेत. वर्गांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे परंतु याचे कुठलेही सोयरसुतक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकाऱ्यांसह इतर अधिकारी व मुख्याध्यापकांना नाही. शिवाय या शाळेत चपराशीही नाही, लिपिक ही नाही. इमारतही भाड्याची आहे. मुख्याध्यापक नसल्याने येथील तीन शिक्षकांमधून एका शिक्षिकेलाच सर्व कार्यालयीन कामे करावी लागतात. मुख्याध्यापक आणि कारकुनाचे कार्य तीन पैकी एक शिक्षिकाच करत असल्याने तिन्ही मधून एक शिक्षिका अध्यापन बाह्य कामात गुंतल्याने या शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचे कार्य काही होत नाही. वर्गांची संख्या पाहता इयत्ता पहिली ते आठवीचे शिक्षण फक्त दोन शिक्षिका कशा काय देणार? हा प्रश्न मात्र शिक्षण विभागाच्या दळभद्री कर्त्याधर्त्यांना पडत नाही हेच दुर्दैव.
याच मराठी कन्या शाळेची दुसरी उर्दू शाळा ही पेठ बीड भागात शहिंशाहवली दर्गा रोड येथे चालविली जात आहे. जिथे इयत्ता नववी व दहावी चे वर्ग भरतात. इथेही या दोन वर्गात जवळपास 100 च्या जवळपास विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. परंतु येथेही मुख्याध्यापक नाही, शिक्षक दोन तर शिक्षिका एक असे मिळून येथेही तीनच शिक्षक कर्तव्यरत आहेत. येथेही कारकून नाही आणि चपराशीही नाही. येथेही महिला शिक्षिकेलाच मुख्याध्यापकाचे काम करावे लागत असल्याने त्या विद्यार्थिनींना शिक्षणाचे धडे देत नाहीत. विद्यार्थ्यांना जे काही येथे शिकविले जाते ते येथील दोन शिक्षकच शिकवतात. या दोन्ही शाळांची जबाबदारी कन्या शाळा मराठी चे मुख्याध्यापक यांच्याकडेच आहे. मात्र ते ऐतखाऊ प्रमाणे मराठी कन्या शाळेत बसून उंटावरून शेळ्या हाकत आहेत. शिवाय उर्दू माध्यमाच्या दोन्ही शाळेतील एक-एक शिक्षिकांकडे मुख्याध्यापकांनी करावयाचे काम दिलेले आहे. या दोन्ही उर्दू शाळेतील शिक्षक आणि शिक्षिकांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचे मार सहन करण्यासारखी झालेली आहे. जिल्हा परिषद च्या या दोन्ही उर्दू शाळा मराठी कन्या विद्यालयातूनच मुख्याध्यापक महोदय गेल्या अनेक वर्षांपासून चालवू लागले आहेत. याचे कुठलेही सोयरसुतक याच इमारतीमध्ये असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी योजना यांना असल्याचे दिसत नाही म्हणून अनेक वर्षांपासून येथे मुख्याध्यापकासह पाच शिक्षक आणि सहा चपराशी ऐतखाऊ प्रमाणे दरमहा बसून वेतन घेत आहेत. कर्तव्याशी प्रताडना करून दरमहा भरभक्कम वेतन घेताना या सर्वांना जनाची नाही तर मनाची सुद्धा लाज वाटत नसल्याचे दिसून आले आहे. याची शिक्षण विभागासह जिल्हा प्रशासनाने त्वरित दखल घेऊन येथील सर्व ऐतखाऊंना येथून उचलून जिथे शिक्षकांची आवश्यकता आहे तिथे टाकावे अन्यथा यांच्याविरुद्ध एक दिवस लोक आक्रमक होऊन धडा शिकवतील. याची नोंद वेळीच शिक्षण विभागाने घेणे गरजेचे आहे.
मुख्याध्यापक निव्वळ बुजगावणे!
कन्या शाळेत कर्तव्यरत असलेले मुख्याध्यापक तिथे एकही विद्यार्थिनी नसताना तिथेच चिटकून असतात तर याच शाळेचे उर्दू वर्ग इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत इतर ठिकाणी भाड्याने इमारती घेऊन चालविण्यात येत असलेल्या जागी चांगल्या संख्येत विद्यार्थिनी असूनही हे मुख्याध्यापक महोदय तिथे फिरकत नाहीत. त्या शाळेत जाऊन काडीचेही काम करत नाही. उलट दोन्ही उर्दू शाळेतील महिला शिक्षिकांना दबाव तंत्राचा वापर करून मुख्याध्यापकांनी करावयाची कामे करायला लावतात तसेच शाळेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती सुद्धा हे मुख्याध्यापक महोदय ऑनलाईन भरत नसल्याने दोन्ही उर्दू शाळांना अशा उपक्रमांची माहिती मिळत नाही म्हणून दोन्ही उर्दू शाळेतील विद्यार्थिनी शिक्षणासह इतर उपक्रमातही मागास राहू लागल्या आहेत. अशा अनेक तक्रारी येथील मुख्याध्यापकांबद्दल समोर आल्या आहेत.
पालकमंत्री म्हणजे पालक भाजी नव्हे याचे भान धनंजय मुंडे यांनी ठेवावे!
सध्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे पदावर आहेत. या पदावर असताना जिल्ह्याचे पालकत्व बहुतेक त्यांना पालक भाजी सारखे वाटते की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्री म्हणून ते पदावर आल्यापासून त्यांनी जिल्हावासियांच्या लाभासाठी आवश्यक असलेले कार्य करणे तर सोडा लक्ष सुद्धा दिलेले दिसत नाही. यामुळेच बीड जिल्हा परिषदेच्या या मराठी कन्या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि चपराशी सर्वजण गेल्या काही वर्षापासून नुसते बसून दरमहा वेतन घेऊ लागले आहेत. पालकमंत्री या नात्याने धनंजय मुंडे याकडे लक्ष देतील का? असा प्रश्नही शिक्षणाविषयी तळमळ असलेल्या नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.
===================
*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.
संपर्क -
*एस.एम.युसूफ़*
रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा