Breaking News

बीडकरांना आपुलकीचा लळा लावणारे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर


लोकसेवक असणारा अधिकारी कसा असावा या प्रश्नाचे मूर्तीमंत उत्तर म्हणजे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासारखा असावा असे दिल्यास वावगे ठरणार नाही. कारण कुणी नाही म्हटले तरी लोकांच्या मनावर अधिकाऱ्यांचे आपोआप एक प्रकारचे दडपण व दबाव असते. अशा अवस्थेत मग सर्वसामान्य जनतेचे काही प्रश्न किंवा समस्या असल्या अन् ते सोडविणे अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील असल्या तरी अधिकाऱ्यांसमोर ते प्रश्न किंवा त्या समस्या मांडण्याचे धारिष्ट्य सर्वसामान्यांकडून सहसा होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु काही अधिकारी असेही असतात की, त्यांच्या पदांनुसार भलेही त्यांचा दरारा असतो परंतु त्यांच्या कार्यकृतीतून ते या दराऱ्याला अगदीच आदरयुक्त करतात. यामुळे अशा अधिकाऱ्यांना जनतेचा विश्वास संपादन करून आपले कर्तव्य चांगल्या पद्धतीने निभावता येते. शिवाय जनतेमध्ये आपली व आपल्या कार्याची प्रतिमाही चांगली व आश्वासक तयार करता येते, उंचावता येते.
           याच प्रकारातील अधिकारी म्हणजे नुकतेच बदली झालेले बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर होते. ठाकूर साहेबांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ते बदली होईपर्यंत स्वतःसह पोलीस प्रशासनाविषयी संपूर्ण बीड जिल्हावासियांच्या मनात फक्त आदरयुक्त दराराच निर्माण केला असे नाही तर त्यांनी आपल्या कार्यातून जनतेसाठी पालकांसारखी माया सुद्धा वेळोवेळी दाखवून दिली होती. अशा या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बीड येथून दिनांक ७ ऑगस्ट २०२४ रोजी बदली झाली अन् बीड जिल्हावासियांचे मन खट्टू झाले. असे असले तरी अधिकारी कितीही चांगले आणि मोठे असो ठराविक काळानंतर त्यांची बदली होणे ही एक शासकीय-प्रशासकीय प्रक्रिया आहे, ती थांबू शकत नाही. मात्र चांगल्या अधिकाऱ्यांनी आपल्या कार्याविषयी जनतेला लावलेल्या लळ्यामुळे अशा अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर जनतेच्या मनात मोठी रुखरुख व हुरहुर लागून राहते. अशाच प्रकारे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या बदलीने बीड जिल्ह्यातील जनतेच्या मनाला लागली आहे.
                नंदकुमार ठाकूर यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार ८ जून २०२२ रोजी स्वीकारला होता. बीड येथे आल्यापासूनच त्यांनी आपले कार्यालय आणि दालन प्रत्येकासाठी सदैव खुले ठेवले होते. सामान्यातील सामान्यजन थेट त्यांना जाऊन भेटू शकत होता, बोलू शकत होता, हितगुज करू शकत होता. चांगल्याचे स्वागत आणि वाईटावर प्रहार असा त्यांचा दृष्टिकोन अल्पावधीतच जिल्हाभरात लोकप्रिय झाला होता. शिवाय ते प्रत्येकाला देत असलेल्या वागणुकीने त्यांच्याविषयी संपूर्ण बीड जिल्हावासियांच्या मनात एक आपुलकीचे आणि पालकत्वाचे नाते निर्माण झाले होते. कुठे काही चांगले करायचे असेल तर लोकांना ठाकूर साहेब हवे असायचे. कुठे काही विपरीत घडले तर त्याची कल्पना मोठ्या विश्वासाने लोक ठाकूर साहेबांना द्यायचे. यामुळे जशी जनता समाधानी व्हायची तसेच ठाकूर साहेबांचे कर्तव्यही उत्तमरीत्या पार पडायचे. 
                  अनेकदा असे म्हटले जाते की, बीड म्हणजे दुसरे बिहार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये हि भीती पसरवून ठेवण्यात आलेली आहे. परंतु "दैनिक जन मंथन" साठी मुलाखत घेताना जेव्हा ठाकूर साहेबांना बीड जिल्ह्यातील जनतेविषयी प्रश्न विचारला होता, तेव्हा त्यांनी बीड जिल्ह्याच्या जनतेविषयी स्वतःचा अनुभव कथन करताना सांगितले होते की, बीड जिल्ह्याची जनता ही खूप चांगली आहे, प्रेमळ आणि अभ्यासू आहे. चांगले आणि वाईट पटकन ओळखते. अधिकारी चांगले असल्यास सहकार्य करते नव्हे डोक्यावर घेते. मला प्रश्न पडतो, बीड सारख्या चांगल्या जिल्ह्याला लोक बिहारची उपमा का म्हणून देतात? 
                      आता नंदकुमार ठाकूर साहेबांची बदली झाली आहे. त्यांच्या बदलीमुळे एक चांगला अधिकारी बीड जिल्ह्यातून जात आहे. ते येथून गेले तरीही त्यांनी त्यांच्या ८ जून २०२२ ते ७ ऑगस्ट २०२४ या २ वर्ष २ महिन्याच्या कार्यकाळात आपले कर्तव्य निभावताना बीड जिल्हावासियांची केलेली सेवा विसरता येणार नाही. प्रसंग कोणताही असो कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे याची ते सदैव दक्षता घेत होते. मग ती दोन समाजातील मारहाणीच्या घटना असो की, मराठा आरक्षण आंदोलनात बीड-माजलगाव येथे झालेली जाळपोळीची घटना असो. प्रत्येक वेळी मोठ्या कुशलतेने प्रसंग हाताळत होते. बीड-माजलगाव येथे घडलेल्या जाळपोळीच्या घटनेवेळी जर त्यांच्या ऐवजी इतर कोणी अधिकारी असता गांगरून गेला असता परंतु ठाकूर साहेबांनी ती विदारक परिस्थितीही अत्यंत कुशलतेने हाताळली आणि वातावरण चिघळू न देता व्यवस्थितरीत्या हाताळले होते. तेव्हापासून तर बीड जिल्हावासियांच्या मनात त्यांचा आदर अजून कैकपटीने वाढला होता. 
                         नुकतीच त्यांच्या कार्यकाळात पोलीस शिपाई पदासाठी भरती झाली. वर्षानुवर्षांपासून पोलीस प्रशासनात शिपाई पदासाठी भरती घेण्यात येते परंतु ठाकूर साहेबांच्या कार्यकाळात झालेली भरती ही एकमेवाद्वितीय ठरली आहे. त्यांनी भरतीसाठी चे उत्कृष्ट नियोजन केले होते. भरतीसाठी येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला पहाटे उठल्यावर अंघोळीपासून ते चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, राहण्याची व्यवस्था यात कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रचंड दक्षता घेतली होती. तसेच जेव्हा लेखी परीक्षा घेण्याचे ठरले तेव्हा ठाकूर साहेबांनी महिला उमेदवारांकरिता पोलीस मुख्यालयात सर्व व्यवस्था ठेवली तर पुरुष उमेदवाराकरिता दोन खाजगी मोठमोठे फंक्शन हॉल घेऊन तिथे व्यवस्था केली होती. 
                   या सर्व आठवणी बीड जिल्हावासियांच्या मनातून पुसल्या जाणार नाहीत. आता त्यांची बदली झाली असली तरी बीड जिल्ह्यातून जाताना ते बीडकरांच्या मायेची आणि आदराची मोठी शिदोरी सोबत घेऊन जाणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्य निभावताना जनतेकडून मिळालेल्या कर्तव्याची ती पावतीच असेल. पुढील कार्यासाठी नंदकुमार ठाकूर साहेबांना खूप-खूप हृदयी शुभेच्छा ......


वेगवेगळ्या क्षेत्रात असणाऱ्यांनी घेतली निरोपाची भेट!

"दैनिक जन मंथन" साठी नंदकुमार ठाकूर साहेबांच्या घेतलेल्या मुलाखतीचा मोठा फोटो फ्रेम, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन निरोपाची भेट घेण्यासाठी गेलेल्या मंडळींमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक होते. माझ्यासोबतच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार मच्छिंद्र भालेराव, साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेस चे मुख्य संपादक शेख एजाज आणि तज्ञ फोटोग्राफर, नामवंत साहित्यिक तथा कवी अनंत सुतनासे यांचा समावेश होता.


ताजा कलम - नंदकुमार ठाकूर यांची दौंड च्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात नियुक्ती

पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बीड येथून ७ ऑगस्ट २०२४ रोजी बदली झाल्यानंतर त्यांना इतर ठिकाणी नियुक्ती मात्र देण्यात आली नव्हती. अखेर त्यांना बदली झाल्यानंतर एक आठवड्याने १३ ऑगस्ट २०२४ रोजी दौंडच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.



=====================

 *लेखन - एस.एम.युसूफ़* 
(मुख्य संपादक - एस.एम.न्युज़)

*"आता एकाच ठिकाणी सर्व सेवा"*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
 
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) कार्यक्रम स्थळी येऊन *बातमी* लिहून मिळेल.

संपर्क -

*एस.एम.युसूफ़* 

रमेशराव गंगाधरे यांची स्वस्त धान्य दुकान क्रमांक ४१, राजुरीवेस जवळ, भीमराज नगर, बीड.
संपर्क क्रमांक - *9021 02 3121*
*वेळ - दुपारी ५ ते रात्री ९ पर्यंत*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत