Breaking News

अंत्योदय, दारिद्र्य रेषेखालील बोगस कार्डधारक होणार उघडे रेशन दुकानांवरून धान्य उचलणाऱ्यांच्या घरांवर लावणार पाट्या


बीड (एस.एम.न्युज) - अंत्योदय, दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड धारकांच्या धान्यावर डल्ला मारणारे बोगस गरीब म्हणजेच श्रीमंतांना उघडे पाडण्यासाठी शासनाने आता एक नवीन मोहीम हाती घेतली आहे. रेशन दुकानांवरून धान्य उचलणाऱ्यांच्या घरांवर पाट्या लावण्यात येणार आहे. यामुळे श्रीमंत लाभार्थी उघडे पडून लोकलाजेस्तव का होईना आपले नाव ते स्वतःहून अंत्योदय आणि दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांच्या यादीतून काढून घेतील अशी अपेक्षा शासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अंत्योदय आणि बीपीएल रेशन कार्ड धारकांच्या यादीत नाव समाविष्ट करून अनेक श्रीमंत लोक रेशन दुकानावरून मिळणारे धान्य उचलत आहेत. यामुळे जे खरेखुरे गरजूवंत व गरीब आहेत अशांना धान्य मिळण्यास अडचणी येतात. किंवा ते रेशनवरून मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहतात. यामुळे आता अंत्योदय आणि बीपीएल रेशन कार्डधारकांच्या घरांवर धान्य लाभार्थी असल्याच्या पाट्या लावण्याच्या सूचना शासनाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत. या पाट्या लावल्यानंतर गरिबांच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्या श्रीमंतांची मोठी अडचण होणार आहे. धान्य वितरणामध्ये अधिक पारदर्शकता यावी यासाठी शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी केंद्रीय ग्राहक संरक्षक समितीचे अध्यक्ष ॲड. मिर्झा जावेद बेग यांनी म्हटले आहे की, गोरगरीब व्यक्तींना स्वस्त दरात धान्य मिळावे, त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी वार्षिक उत्पन्नानुसार वर्गवारी करून अंत्योदय व बीपीएल दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना रेशन कार्डचे वितरण करण्यात आलेले आहे परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, काही श्रीमंत लोक देखील गरिबांच्या योजनेत आपले नाव नोंदवून लाभ घेत असल्याचे दिसून येते. यामुळे शासनाकडून आलेले हक्काचे धान्य गरिबांना मिळत नाही. गरिबांचा हक्क डावलून धान्य उचलणारे श्रीमंत शासनाची फसवणूक करीत आहेत. म्हणून रास्त भाव दुकान निहाय अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारकांच्या घरांवर आता छापील स्वरूपात पाटी लावण्यात येणार आहे. जेणेकरून खरे गरीब आणि बोगस गरीब समाजासमोर येतील. शासनाच्या या मोहीमेमुळे श्रीमंत रेशन कार्ड धारक उघडे पडणार आहे.

श्रीमंत असलेल्या बोगस गरिबांची होणार पंचाईत 

घरावर पाटी लावण्याच्या भीतीने अनेक धनाढ्य, श्रीमंत, बोगस लाभार्थी स्वतःहून आपले नाव या यादीतून कमी करून घेतील. राज्यातील प्रत्येक लाभार्थ्याच्या घरावर छापील पाटी लावून याबाबतचा अभिप्राय कळविण्याच्या सूचना औरंगाबाद येथील सहाय्यक विभागीय पुरवठा अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. त्यानुसार त्यांनी जिल्हा पुरवठा विभागाला सूचित केले आहे.

हे घर गरिबाचे आहे!

सहायक विभागीय पुरवठा अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार पाट्या लावण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. रेशनचे धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या घराबाहेर पाट्या लावून त्याचा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे. यामुळे आता ज्या घराबाहेर पाटी लावलेली दिसेल त्याची ओळख आता समाजात हे घर गरीबाचे आहे अशी होणार आहे. यामुळे खरे श्रीमंत असलेल्या बोगस गरिबांची गोची होणार आहे.

रेशन दुकानांवर टूजी पॉस ऐवजी फोरजी मशीन

यापूर्वी राज्य शासनाने टू जी पॉस मशीन रेशन दुकानांवर शिधा वाटपासाठी दिल्या होत्या. त्यांची मुदत संपल्याने आता त्या ऐवजी नवीन फोरजी मशीन देण्यात येत आहे. जुन्या मशीन मुळे तांत्रिक अडचणी होऊन त्यामध्ये रेशन कार्ड धारक व रेशन दुकानदारांत बऱ्याच वेळेला वादावादीचे प्रसंग घडत होते. भांडणाचे प्रसंगही घडत होते. नवीन फोर जी मशीन मुळे धान्य वाटपात सुसूत्रता येणार आहे. फोरजी मशीन मुळे रेशन कार्डधारकांना आता धान्य सुलभतेने मिळणार आहे.


======================

"आमच्या सेवा"
१) कार्यालयीन निवेदन व बातमी योग्य दरात लिहून मिळेल 
२) विविध वृत्तपत्रात व एस.एम. न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल.
संपर्क -
*एस.एम.युसूफ़* 
मुख्य संपादक - एस.एम.न्युज, वेब पोर्टल तथा यूट्यूब चैनल
आसेफ़नगर, बीड
संपर्क - *9021 02 3121*



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत