जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी झाले निगरगट्ट; रुग्णांची होऊ लागली ससेहोलपट अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांना तक्रार करताच कर्मचारी आला पळत
बीड (एस.एम.न्युज) - जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी कधी, कशाप्रकारे रुग्ण व नातेवाईकांचा छळ करतील याचा काही नेम राहिला नाही. आज दिनांक १८ जून २०२४ मंगळवार रोजी सकाळचे सव्वानऊ वाजले तरी रुग्णांना चिठ्ठी देणारा कर्मचारी कर्तव्यावर आला नाही. यामुळे शेकडो रुग्णांची लांबचलांब रांग सकाळी आठ वाजल्यापासून ताटकळत उभी होती. तेव्हा सायं. दैनिक बीड किसान चे प्रतिनिधी वार्तांकनासाठी जिल्हा रुग्णालयात गेले असता ही बाब दृष्टीस पडली. तेव्हा याची तक्रार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांना भ्रमणध्वनी वरून केली असता डॉ. चव्हाण यांनी संबंधित कर्मचाऱ्याला ताबडतोब फोन करून झापल्याने त्याची पाचावर धारण बसली आणि तो पळतच येऊन रुग्णांना चिठ्ठ्या देण्यासाठी बसला. यावरून जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेले डॉक्टर्स, परिचारिका कितीही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत असले तरी काही कर्मचारी मात्र त्यांच्या चांगल्या प्रयत्नावर पाणी फेरू लागल्याचे वारंवार दिसून येत असल्याने जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी किती निगरगट्ट झाले आहेत याची प्रचिती येत आहे.
सध्या जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण तसेच अन्य विभागातील डॉक्टर्स रुग्णांना चांगल्यात चांगली व आपलेपणा दाखविणारी चिकित्सा देत असले तसेच परिचारिका चांगली सेवा करत असल्या तरी काही कर्मचारी मात्र कर्तव्यात कसूर करण्यापासून चुकत नाही. यामुळे रुग्ण व त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागते परंतु याचे कुठलेही सोयरसुतक कामचुकार आणि हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असल्याचे दिसत नाही. अशा निगरगट झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांची मात्र ससेहोलपट होत आहे.
कामचुकार कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागात पाठवा
जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून कर्तव्यावर असलेले काही कर्मचारी अक्षरशः निगरगट्ट झालेले आहेत. ते वरिष्ठांना जुमानत नाहीत. रुग्णांची काळजी घेत नाहीत. चांगली सेवा देत नाहीत. अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयातून उचलून ग्रामीण भागात कर्तव्यावर पाठवावे. चांगली सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर ठेवावे. जेणेकरून दररोज जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या हजारो रुग्णांना त्रास होणार नाही.
वेळेचे बंधन कुणालाच नाही, आओ जाओ घर तुम्हारा
जिल्हा रुग्णालयाची वेळ ही सकाळी आठ ते साडेबारा पर्यंतची आहे. कर्तव्यावर येताना मात्र कुणीच वेळेवर येत नाही. आठ ऐवजी नऊ-साडेनऊच्या नंतर येतात आणि बारा वाजता निघून जातात. संध्याकाळी चार वाजता येवून सहा वाजेपर्यंत थांबणे बंधनकारक असतानाही पाच वाजता येऊन साडेपाचला निघून जातात. अशाप्रकारे उशिरा येणाऱ्या व लवकर जाणाऱ्यांमध्ये फक्त कर्मचारीच नाही तर अनेक डॉक्टर्स, टेक्निशियन आणि रक्त पेढीतील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
फार्मासिस्ट तर डॉक्टरांच्या अगोदर निघून जातात
औषध वितरण विभागातील फार्मासिस्ट पहिल्या सत्रात सकाळी आठ ते साडेबारा आणि दुसऱ्या सत्रात चार ते सहा या वेळेत उपस्थित राहणे आवश्यक असताना दुपारी बारा तर संध्याकाळी साडेपाच वाजताच निघून जातात. यामुळे शेवटच्या अर्ध्या तासात डॉक्टरांनी तपासणी केलेले रुग्ण जेव्हा औषध गोळ्या घेण्यासाठी औषध वितरण विभागात जातात तेव्हा तिथे दाराला टाळे लावलेले दिसते. यामुळे डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी रुग्णांना मिळत नाही. म्हणून सकाळच्या सत्रातील रुग्णांना संध्याकाळी आणि संध्याकाळच्या सत्रातील रुग्णांना दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन औषधी घ्यावी लागत आहेत. यामुळे वेळेआधी दवाखाना सोडून पळणाऱ्या फार्मासिस्ट वर सुद्धा कारवाई होणे आवश्यक आहे.
मधुमेह असलेल्या रुग्णांनाही बसावे लागते तात्कळत
जिल्हा रुग्णालयात दररोज मधुमेह झालेले अनेक रुग्ण येतात. त्यांना सकाळी उपाशीपोटी येऊन रक्त तपासणीसाठी द्यावे लागते. अशा रुग्णांचे रक्त सकाळी जेवढ्या लवकर घेता येईल तेवढे लवकर घ्यावे लागते. त्यानंतर काहीतरी थोडेफार खाऊन दोन तासांनी दुसऱ्यांदा रक्त तपासणीसाठी द्यावे लागते परंतु जिल्हा रुग्णालयातील रक्त तपासणी कक्षातील कर्मचारी सुद्धा सकाळी नऊच्या अगोदर कोणत्याच रुग्णांचे रक्त तपासणीसाठी घेत नसल्याने मधुमेह झालेल्या रुग्णांनाही तासनतास जिल्हा रुग्णालयात उपाशीपोटी तात्कळत बसून राहावे लागते. तेव्हा अशा रुग्णांना चांगली सेवा देण्याकरिता रक्त तपासणी कक्षात सकाळी आठ वाजताच रक्त घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्यक आहे. याकडेही रुग्णालय व्यवस्थापनाने लक्ष द्यावे.
===============================
*"आमच्या सेवा"*
१) कार्यालयीन निवेदन व बातमी योग्य दरात लिहून मिळेल
२) विविध वृत्तपत्रात व एस.एम. न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल.
संपर्क -
*एस.एम.युसूफ़*
मुख्य संपादक - एस.एम.न्युज, वेब पोर्टल तथा यूट्यूब चैनल
आसेफ़नगर, बीड
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा