Breaking News

पुणे येथील टूर्स अँड ट्रव्हल्स कडून उमराह साठी गेलेल्या जोडप्याची 1 लाख 70 हजार रुपयाची फसवणूक मक्का मध्ये जोडप्याला हॉटेलच्या व्हरंड्यात दिवस काढावे लागले


बीड (एस.एम.न्युज) - जिल्ह्यातील नेकनूर गावात राहणारे सय्यद मैनोद्दीन सय्यद खाजा हे उमराहसाठी मक्का-मदिना येथे जाऊन आले परंतु ते ज्या ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून उमराह साठी गेले होते, त्याने या जोडप्याकडून पैसे तर पूर्ण घेतले परंतु पुढे न पाठविल्याने त्यांची मक्का-मदीना यात्रा त्रासातच संपन्न झाली. त्यांना जवळ जास्त पैसे नसल्याने हॉटेलच्या व्हरंड्यात दिवस काढावे लागले. उमराह करून आल्यानंतर त्यांनी संबंधित ट्रॅव्हल्स एजंटला उर्वरित 1 लाख 70 हजार ची रक्कम परत देण्यास सांगितले असता, त्याने अजूनही ही रक्कम परत दिली नाही तसेच देण्यास टाळाटाळ करू लागला. यामुळे वाट पाहून पाहून थकलेल्या सय्यद मैनोद्दीन यांनी पोलिसात धाव घेतली.
     सध्या मुस्लिम बंधू-भगिनी मोठ्या संख्येने जगभरातून हज यात्रेसाठी जात आहेत. हज साठी जाताना काही जण शासकीय कोट्यातून जातात तर काही खाजगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या माध्यमातून जातात. तसेच उमराहसाठी सुद्धा जातात. अशाच प्रकारे शासकीय सेवेतुन कनिष्ठ अभियंता म्हणुन निवृत्त झालेले सय्यद मैनोद्दीन यांनी मार्च-2024 मध्ये उमराहसाठी सपत्नीक जाण्याकरिता पुणे येथील एका इंटरनॅशनल टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाल्याशी फोनवरून संपर्क केला. यावर टूर्स वाल्याने त्यांना एक व्यक्तीस 1 महिन्याची तिर्थयात्रा उमराह मदीना प्रत्येकी रक्कम रु. 1,30,000/- लागतील असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांना टूर्सवाल्याने ऑनलाईन फोन पे वरुन प्रत्येकी रक्कम रु. 1,30,000/- प्रमाणे स्वतःसह पत्नीचे मिळून एकूण रक्कम रु.2,60,000/-पाठविण्यास सांगितले. म्हणून त्यांनी फोन पे वरून दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी ट्रॅव्हल्स एजंटच्या खात्यावर रक्कम रु.2,60,000/- पाठविले. त्यानंतर आणखी चलन बदलुन मिळण्यासाठी रक्कम रु. 40,000/ - मागितले ते ही त्यांनी फोन पे वरुन पाठविले. टूर्स वाल्याने एक महिन्याकरीता उमराह करीता पैसे स्विकारले. ज्यात विमान फी, व्हिजा, मक्का येथील हॉटेल व जेवणाचा खर्च इत्यादी करीता होणाऱ्या खर्चाचा समावेश होता. यानंतर दिनांक 12 मार्च 2024 रोजी मुंबई विमानतळावर ते पत्नीसह गेले. तिथे त्यांना विमानाचे दोन तिकीट देण्यात आले व कर्नाटक राज्यातील विजापुर येथील दुसऱ्या ट्रव्हल्स वाल्याच्या हवाली केले. दुसऱ्या ट्रव्हल्सवाला त्यांना विमानात बसवुन मक्का सौदी अरेबिया देशात घेऊन गेला. मात्र तिथे हॉटेलमध्ये रुम दिली नाही. कारण पुणे येथील टूर्सवाल्याने हॉटेलचे भाडेच भरले नव्हते. त्यांनी कसेबसे 12 ते 13 दिवस हॉटेलच्या व्हरांड्यात काढले. टूर्स वाल्याने चलन बदलीच्या नावाने घेतलेले रक्कम रु. 40,000/- चे चलन देखील बदलुन दिले नाही. अशाप्रकारे सय्यद मैनोद्दीन यांचे ट्रव्हल्सवाल्याकडून एकुण रक्कम रु.1,70,000/- येणे बाकी आहेत. जे त्यांनी उमराह यात्रेकरीता पैसे घेऊन फसवणुक केल्यामुळे त्यांचे विरुध्द कायदेशीर तक्रार करण्यात आली असून संबंधित टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालकाविरुध्द कायदेशीर कार्यवाही करून रु.1,70,000/- रुपयांची रक्कम परत मिळवून द्यावी अशी विनंती सय्यद मैनोद्दीन यांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.


===============================

"आमच्या सेवा"
१) कार्यालयीन निवेदन व बातमी योग्य दरात लिहून मिळेल 
२) विविध वृत्तपत्रात व एस.एम. न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल.
संपर्क -
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज, वेब पोर्टल तथा यूट्यूब चैनल
आसेफ़नगर, बीड
संपर्क - 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत