दुष्काळात बोअर पुनरुज्जीवीत करण्याऐवजी काँक्रिटीकरण करून बुजवण्यात आले बीड शहरात टँकर लॉबी सुरू करायची आहे काय?
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील बीड नगर परिषदेने घेतलेल्या परंतु सद्यस्थितीत बंद पडलेल्या बोअर्स यावेळी दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पाणीटंचाईपासून वाचविण्यासाठी पुनरुज्जीवित करणे आवश्यक असताना बोअरच्या जागी काँक्रिटीकरण करून बुजवण्यात आले आहे. यामुळे बीड शहरात टँकर लॉबी सुरू करायची आहे काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
गेल्या वर्षी अत्यंत अल्प प्रमाणात पडलेल्या पावसामुळे या उन्हाळ्यात बीड शहरावर भीषण पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तसेच पाण्याचे टँकर सुरू करण्याची वेळ येऊ नये व त्यावर कोट्यावधी रुपयांचा चुराडा होऊ नये. याकरिता काही वर्षांपूर्वी बीड नगर परिषदेने बीड शहरात जवळपास प्रत्येक प्रभाग व वार्डात घेतलेले बोअर्स जे नगर परिषदेच्या दुर्लक्षपणामुळे देखरेख व डागडूजी अभावी बंद पडलेले आहेत. ज्यामध्ये काही बोअर्सवर हातपंप तर काही बोअर्सवर सबमर्सिबल मोटर सुद्धा लावलेल्या आहेत परंतु याकडे बीड नगर परिषदेचे साफ दुर्लक्ष झाल्याने ते सध्या बंद अवस्थेत पडून आहे. निदान यावेळी उन्हाळ्यात तरी हे बोअर्स पूर्ववत सुरू करून पुनरूज्जीवीत करणे आवश्यक आहे. जेणेकरून बीड शहरवासीयांना पाणी पंचाई पासून काही प्रमाणात का होईना वाचविता येईल व पाण्याचे टँकर सुरू करण्याची वेळ येऊ नये. पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण होऊ नये. नागरिकांवर पाणीबाणीची वेळ येऊ नये. सध्या नळांना १५ ते २५ दिवसाआड पाणी सोडले जात असतानाही बीड नगर परिषद या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. उलट घेतलेले बोअर्स काँक्रीटीकरण करून बुजवण्यात आले आहे. किती हे दळभद्री नियोजन असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
बोअर च्या जागी काँक्रिटीकरण केले खरे पण .....
बीड नगर परिषदेपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या शहरातील थोरातवाडी परिसरात बीड नगर परिषदेचे सदरील बोअर काही महिन्यापूर्वी पर्यंत सुरू होते मात्र सबमर्सिबल मोटार बिघडल्याने त्याची देखभाल न करता बंद अवस्थेत सोडून देण्यात आले होते. काही दिवसापूर्वी हे बोअर काँक्रीटीकरण करून बंद करून टाकण्यात आले. विशेष म्हणजे या बोअरच्या पाईपलाईन मध्ये नळांना पाणी देणारी तलावाची पाईपलाईन जोडलेली आहे. यामुळे जेव्हा तलावाचे पाणी सोडले जाते तेव्हा या डमी विना बंद केलेल्या बोअर मधून पाणी नालीत वाहू लागले आहे. बंद करायचेच होते तर बोअरला जोडलेली नळाची पाईपलाईन डमी लाऊन बंद करायला हवी होती परंतु तसे न करता कावरेपणात काँक्रिटीकरण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. काल शुक्रवार दिनांक १५ मार्च रोजी नळाला पाणी आल्यानंतर कावरेपणात केलेल्या या काँक्रिटीकरणामधून नळाचे पाणी नालीत वाहू लागले होते. आता जेव्हा-जेव्हा नळाला पाणी येईल तेव्हा-तेव्हा येथून लाखमोलाचे पिण्याचे पाणी नालीत वाहत जाईल.
६ मार्च रोजी निवेदनही दिले आहे
बीड शहरात निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन याविषयी बुधवार दिनांक ६ मार्च २०२४ रोजी "बीड नगर परिषदेने घेतलेल्या परंतु बंद अवस्थेत असलेल्या बीड शहरातील सर्व बोअर्स पूर्ववत सुरू करणे तसेच शहरातील खाजगी विहीर व बोअर्सचे अधिग्रहण करणे" बीडच्या जिल्हाधिकारी, बीड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आणि बीड तहसीलदार यांना याकरिता निवेदन दिलेले आहे. यावर कारवाई न करता निवेदन दिल्यानंतर आठ दिवस होत नाही तोच थोरातवाडी येथील बोअरचे पाईप कापून काँक्रीटीकरण करून बुजवून टाकण्यात आले आहे. हे कसले नियोजन आहे असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.
शहरवासीयांना टँकर लॉबीचा अनुभव घेण्याची वेळ येऊ नये
आवश्यक तेवढ्या प्रमाणात बीड शहरवासीयांना पाणी मिळत नसूनही बीड नगर परिषदेकडून १० ते २५ दिवसात नळांना पाणी सोडूनही शहरात सुरू असलेल्या पाणी टंचाईचे गांभीर्य बीड नगर परिषद प्रशासनाला असल्याचे दिसून येत नाही. यावरून बीड शहरवासीयांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे की, बीड नगर परिषदेला शहरात टँकर लॉबी तर सुरू करायची नाही ना!
==============================
१) कार्यालयीन निवेदन अर्ज व वृत्तपत्रात देण्यासाठी बातम्या आणि लेख योग्य दरात लिहून मिळेल.
२) एस.एम.न्युज़ वेब पोर्टल-युट्युब चॅनेल आणि वृत्तपत्रात देण्यासाठी जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) विशेष सेवा - कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल.
संपर्क साधा - एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़नगर, बीड.
मो.- 9021 02 3121


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा