Breaking News

आनंदाच्या लग्न सोहळ्याला दुःखाची किनार कर्तबगार मुलाचे लग्न पाहण्यास वडील जिवंत राहिले नाही


बीड (एस.एम.न्युज़) - दिनांक १४ जानेवारी २०२४ रविवार रोजी फिटनेस ट्रेनर शेख मोहसीन अय्युब यांचे लग्न पार पडले. लग्नाच्या या आनंदाच्या सोहळ्याला मात्र दुःखाची किनार लागली होती. कारण हे लग्न पाहण्यासाठी मोहसीनचे वडील अय्युब हे जिवंत नव्हते. गेल्याच महिन्यात दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी त्यांना ऑटो रिक्षातच तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांचे निधन झाले होते.
मोहसीनचे वडील शेख अय्युब हे गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ऑटो रिक्षा चालवीत होते. आरोग्याविषयी त्यांना कोणताही त्रास नव्हता. सडपातळ शरीरयष्टी आणि हसमुख व सर्वांशी मिळून मिसळून राहत असल्याने संपूर्ण बीड शहरात त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक जण होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेमच होती. अशाही परिस्थितीत सर्व मुलामुलींना शिक्षण दिले. मुलींची लग्न करून दिली तर मोठ्या मुलाचेही लग्न केले. आता कुटुंबात सर्वात लहान मोहसीन हाच लग्नाचा राहिला होता. त्याचेही निधनाच्या काही दिवस अगोदरच लग्न जमवून लग्नाची तारीख १४ जानेवारी २०२४ काढली होती. असे सगळे काही व्यवस्थित सुरू असताना ८ डिसेंबर २०२३ रोजी नेहमी प्रमाणे ते ऑटो रिक्षा घेऊन रविवार पेठ कडबा मंडीच्या रिक्षा थांब्यावर रिक्षा लावून थांबले असता अचानक त्यांच्या छातीत चमक निघाली होती व ते ड्रायव्हरची सीट सोडून मागच्या सीटवर जाऊन बसले आणि अवघ्या काही सेकंदातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ऑटो रिक्षातच त्यांचे निधन झाले होते. ज्या ऑटो रिक्षा च्या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबीयांचा प्रपंच चालविला त्याच ऑटोरीक्षात मृत्यू यावा याला काय म्हणावे. असो! अशा या मेहनती व गरीब कुटुंबातील बापाचा लहान मुलगा शेख मोहसीन हा समज आल्यापासूनच स्वतःच्या शरीर प्रकृतीवर बऱ्यापैकी लक्ष देऊन नित्यनेमाने व्यायाम करीत चांगली शरीर यष्टी मिळवून पिळदार शरीराचा तरुण बनला आणि आपल्या मेहनतीने व कर्तबगारीने विविध शरीर सौष्ठव स्पर्धेत भाग घेत आतापर्यंत बीड जिल्हा पातळीवर सुवर्णपदक, विद्यापीठ स्तरावर सुवर्णपदक, मराठवाडा श्री साठी चार वेळा सहभाग, बीड जिल्हा पावर लिफ्टिंग मध्ये सुवर्णपदक अशा प्रकारे दैदीप्यमान प्रगती करणाऱ्या या पुत्राचे लग्न पाहण्यासाठी मात्र शेख अय्युब जिवंत राहिले नाही. अगदीच अचानक अकस्मात मृत्यूने त्यांना गाठले. अशा मेहनती शेख अय्युब यांचा पुत्र शेख मोहसीन चे ठरल्यानुसार दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी लग्न पार पाडले. मात्र हा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी त्याचे वडील हयात नव्हते. लग्नप्रसंगी अय्युब यांचे मित्र विशाल सिंग ठाकूर, शेख महेमूद, मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़, काज़ी मोईज़ोद्दीन, सलाउद्दीन इनामदार यांनी मोहसीनच्या लग्नात आवर्जून उपस्थित रहात मोहसीनसह संपूर्ण शेख कुटुंबीयांना लग्नाच्या हृदयी शुभेच्छा दिल्या मात्र दुसरीकडे या लग्नाच्या आनंदाला दुःखाची किनार ही लागलेली होती.


========================================

१) कार्यालयीन निवेदन अर्ज व वृत्तपत्रात देण्यासाठी बातम्या आणि लेख योग्य दरात लिहून मिळेल.
२) एस.एम.न्युज़ वेब पोर्टल-युट्युब चॅनेल आणि वृत्तपत्रात देण्यासाठी जाहिराती स्वीकारल्या जातील. 
३) विशेष सेवा - कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल.
संपर्क साधा - एस.एम.युसूफ़ 
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़नगर, बीड.
मो.- 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत