शिवसेना उबाठातून अनिल जगताप रिटायर्ड हर्ट नऊ तारखेला वर्षा बंगल्यावर करणार शिंदे सेनेत प्रवेश
बीड (एस.एम.न्युज़) - पूर्वाश्रमीची शिवसेना व आताची शिवसेना उबाठा या दोन्ही शिवसेनेत अनेक वर्षे जिल्हाप्रमुख पद भूषविलेले आणि काही दिवसांपूर्वीच जिल्हाप्रमुख पदावरून सहसंपर्कप्रमुख पद देण्यात आलेले अनिल जगताप यांनी त्यांच्या एकनिष्ठतेची वारंवार हेटाळणी होत असल्याने मूळचे हाडाचे क्रिकेट खेळाडू असलेले जगताप यांनी शिवसेना उबाठातून रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय शहरातील नीलकमल हॉटेल येथे शुक्रवार दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ०४:०० वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करत येत्या ९ तारखेला मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आपल्या समर्थकांसह शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले. या पत्रकार परिषदेत त्यांचे अनेक समर्थक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत आपले म्हणणे मांडताना त्यांनी म्हटले की, शिवसेनेत सर्वकाही व्यवस्थित असताना दि. १ डिसेंबर २०२३ रोजी शिवसेनेच्या उपनेत्या आणि कायम मराठा आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी जिल्ह्याभरात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कुटील डाव रचून मला जिल्हाप्रमुख पदावरून हटवले. मी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला व गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याभरात सर्वत्र मराठा आरक्षणाचे काम प्रभावीपणे सूरू केले. हीच बाब मराठा आरक्षण विरोधी असणाऱ्या सुषमा अंधारे यांना खटकली आणि त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानात विष कालवून अचानक तातडीने बीड शिवसेनेमध्ये खांदेपालट घडवून आणली जी अवघ्या बीडवासियांना आश्चर्याचा धक्का देऊन गेली. गेल्या चाळीस वर्षांपासून मातोश्रीवर आपली श्रद्धा अबाधित ठेवली याचे फळ पक्षाने कुठलीही सूचना व माहिती न देता पदावरून काढले आणि किंचितही पात्रता नसलेल्या परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर, रत्नाकर शिंदे या तिघांना जिल्हाप्रमुखपदी व निजाम शेख यांना शहरप्रमुख पदी नियुक्त केले. हे सर्व पाहता बीड शिवसेनेत पक्षाने खांदेपालट केली का खांदेमोड केली ? हे मात्र अद्याप उमगले नाही. आजवर प्रामाणिकपणे बाळासाहेबांचे विचार बीडच्या मातीत रुजवले. शिवसेनेचा भगवा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गाव, वस्ती, वाडी तांड्यावर फडकवला. अठरा पगड जाती-धर्मातील लोकांची नाळ शिवसेनेशी जोडली. याचबरोबर बीड जिल्ह्यात सर्वत्र तळमळीने पक्षाचे काम करणारे शिवसैनिक उभे केले. त्यांना हाताशी घेऊन जिल्ह्याभरात पक्ष बांधणी केली. मतदारांची संख्या वाढवली. मात्र पक्षाने सुषमा अंधारे यांच्या सांगण्यावरून विधानसभा निवडणुकीच्या महत्वपूर्ण टप्प्यावर माझं पद काढून घेत माझ्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त सदस्य नोंदणी देणारा जिल्हा म्हणून बीड जिल्हा असल्याचे पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी स्वतः स्तुतीसुमने उधळली होती. कदाचित याचा विसर त्यांना पडला असावा. माझ्या आतापर्यंतच्या कार्यकाळात मी पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेसाठी केलेल्या कार्याची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली नाही याची शिवसैनिक म्हणून खंत वाटते. असे अनिल जगताप यांनी म्हटले.
बीड शिवसेना झाली अंधारी सेना
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि बीड जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोद्दार यांनी भरगच्च पैसे घेऊन शिवसेनेचे पदे विकली नवे जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांची नियुक्ती केली. याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत. बीड शिवसेना आता अंधारीसेना झालेली असून मराठा विरोधी सुषमा अंधारे यांचा डाव साध्य झाला आहे असेही म्हटले.
सर्वांचेच राजीनामे मातोश्रीवर पाठविणार
मातोश्रीवर श्रद्धा ठेऊन बाळासाहेबांच्या विचारांचा वसा घेऊन चालत असताना कुठलीही चूक नसताना विनाकारण सुषमा अंधारे यांच्या सांगण्यावरून आम्हा शिवसैनिकांवर झालेला अन्याय आम्हा सर्व शिवसैनिकांच्या जिव्हारी लागणारा आहे. त्यामुळे मी माझ्या सहकाऱ्यांसह माझ्या पदाचा सामूहिक राजीनामा देऊन मुंबई येथे मातोश्री दरबारी पाठवत आहे.
इथून पुढे शिंदे हेच आमचे नेते
आदरणीय श्रद्धेय स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वसा घेऊन सदैव मराठी माणसाच्या हक्काचा, हिंदुत्वाचा विचार करणारे आणि जनतेचे हित पाहणारे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण हजारोंच्या संख्येने एकत्रित येऊन मुंबई येथे वर्षा बंगल्यावर शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करत आहोत तसेच मराठा आरक्षणाचा लढा आणि मराठा हिताचे कार्य अविरत आणि अखंडित सुरु राहील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचे विचार वाढवत राहू असे म्हटले.
विधानसभा निवडणूक तोंडावर आली की पद काढण्यात येतं
शिवसेनेत १९८६-८७ पासून कार्यरत आहे. सुरुवातीला उप जिल्हा प्रमुख व नंतर जिल्हाप्रमुख पदावर राहून अनेक वर्षे इमाने इतबारे काम केले. आम्ही बाळासाहेबांचे वेडे होतो, आहोत आणि पुढेही राहणार. यामुळेच पदाविना सुद्धा चार वर्षे पक्षात राहिलो. यापूर्वीही जोमाने काम करत असताना अचानक पद व शक्ती काढून घेण्यात आली आणि हे नेमके विधानसभा निवडणूक तोंडावर आली की माझ्यासोबत करण्यात येते.
अंधारे मुळे पक्षात अंधार होणार
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रात पक्षामध्ये अंधार करायची सुपारी घेतली असा घनाघात करून बीडमध्ये ही अंधार केला आहे व आता दहा जिल्ह्यात सुद्धा अंधार असून अंधारे या मराठा विरोधात आहेत. त्यांनी कारस्थान करून माझे जिल्हाप्रमुख पद काढले.
आगामी विधानसभा निवडणूक लढवणार
पत्रकार परिषदेत पुढील वाटचाली बद्दल बोलताना जगताप म्हणाले की, आपल्या सोबत २५ ते ३० सरपंच, ग्रामपंचायतचे २०० सदस्य, नगरपालिकातील नगरसेवक आहेत. या सर्वांच्या सोबतीने शिंदे सेनेची ताकद वाढवून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे ठाम सूतोवाच केले.
मी हाडाचा खेळाडू
गेली जवळपास ४० वर्षे शिवसेनेत आहे. पण मला जातीचा क्रेटेरिया कधीच लागला नाही. कारण मी एक हाडाचा खेळाडू आहे आणि खेळाडूला जातीचा टॅग कधीच लागत नाही. जवळपास ४० वर्षांपासून बीड जिल्ह्यात आम्ही सर्व जण पक्ष सांभाळतोय. बाळासाहेबांच्या छायेत आयुष्य घातले. बीड मधील शिवसेनेचे नाव घेतलं तर अनिल जगतापच नाव येतचं.
========================================
१) कार्यालयीन निवेदन अर्ज व वृत्तपत्रात देण्यासाठी बातम्या आणि लेख योग्य दरात लिहून मिळेल.
२) एस.एम.न्युज़ वेब पोर्टल-युट्युब चॅनेल आणि वृत्तपत्रात देण्यासाठी जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) विशेष सेवा - कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल.
संपर्क साधा - एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़नगर, बीड.
मो.- 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा