Breaking News

मुस्लिम महिलांवर सरसकट ताशेरे ओढू नका - एस.एम.युसूफ़ काहींनी शेण खाल्लं म्हणजे सगळेच नालायक आहेत असे नाही!


बीड (एस.एम.न्युज़) - अलीकडे काही दिवसांपासून शहरात असलेल्या एका शाळेतील शिक्षक व काही शिक्षिकांबाबत समाजासह प्रसिद्धी माध्यमातून सातत्याने बातम्या समोर येत आहेत. वास्तविक पाहता ही सर्व बाब अत्यंत निंदनीय व धिक्कार करावी अशीच आहे. म्हणून याविषयी समाज प्रबोधन करण्यासाठी व वाचा फोडण्यासाठी प्रसिद्धी माध्यमातून वृत्त समोर येऊ लागले आहे. मात्र या विषयी वृत्त लिहिताना एका वृत्तपत्राने काही शब्दांचा अतिरंजीत वापर केला आहे. ज्यात उर्दू शिक्षक, मुस्लिम शिक्षिका, मुस्लिम महिलांचा आदर्श काळवंडला असे शब्द प्रयोग केले. एवढेच नव्हे तर अशा वाह्यात प्रकरणात पवित्र क़ुरआनचे दाखले टाकण्याची गरज नसताना तेही टाकण्यात आले. म्हणजे मुस्लिम महिलांसह इस्लाम आणि क़ुरआन ला ही उघडे-नागडे करण्यात आले. हे एक मुस्लिम म्हणून नाही तर एक पत्रकार म्हणून सांगितल्याशिवाय राहवत नाही. म्हणून प्रसिद्धी माध्यमातील सर्व संपादक व लिखाण करणाऱ्या पत्रकारांना सविनय कळकळीची व नम्रतेची विनंती करतो की, या शाळेतील वाह्यात प्रकरणाविषयी, यात सामील असलेले शिक्षक व शिक्षिकांविषयी काय लिहायचे ते लिहा परंतु कृपा करून त्यात उर्दू, मुस्लिम शिक्षिका, मुस्लिम महिलांचा आदर्श काळवंडला व पवित्र क़ुरआनचे दाखले मांडत बसू नका. कारण काहींनी शेण खाल्लं म्हणजे सर्व मुस्लिम महिला तशाच असतील असे समजण्याचे कारण नाही. अशा प्रकारच्या लिखाणामुळे एक समाज दुसऱ्या समाजाला हिन व तुच्छ समजेल. ज्याने समाजात दुफळी निर्माण होईल. जे सुदृढ समाजासाठी योग्य नसेल.
याविषयी सविस्तर असे की, मी सुद्धा गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक,  राजकीय विषयांसह वेगवेगळ्या मुद्द्यांवर फक्त मुस्लिम समाजच नाही तर एकूण एक सर्व समाजाचे हित पाहून लिखाण करतो आहे. मी कधीही कोणत्या एका समाजाविषयी किंवा जाती धर्माचा उल्लेख करून अनादर करणारे लिखाण केले नाही. कार्य चांगले असो की वाईट, ते करणारा फक्त व्यक्ती असतो म्हणून चांगल्या कार्याची स्तुती करणे व वाईट, घाणेरडे, लज्जास्पद कृत्य करणाऱ्याविषयी त्याच्यावर टीका करणे समजू शकते मात्र चांगले कार्य आणि वाईट कृत्य करणाऱ्यांना त्याच्या जाती धर्माच्या चष्म्यातून न पाहता लिखाण व्हायला हवे. या शाळेच्या प्रकरणात काही नालायक शिक्षक व शिक्षिकांनी जे काही उघडे-नागडे कृत्य केले ते फक्त मुस्लिम समाजालाच काळे फासणारे नसून अख्ख्या मानव जातीला शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे. यामुळे याविषयी फक्त जाती व धर्माच्या चष्म्यातून उर्दू शिक्षक, मुस्लिम महिला आणि अशा प्रकारच्या घाणेरड्या प्रकरणात पवित्र क़ुरआनचे दाखले व शब्दप्रयोग कृपया संपादकांनी आणि लिखाण करणाऱ्या पत्रकारांनी करू नये. असे शेवटी पुन्हा एकदा सविनय नम्र आवाहन करतो.



=====================================


१) कार्यालयीन निवेदन अर्ज व वृत्तपत्रात देण्यासाठी बातम्या आणि लेख योग्य दरात लिहून मिळेल.
२) एस.एम.न्युज़ वेब पोर्टल-युट्युब चॅनेल आणि वृत्तपत्रात देण्यासाठी जाहिराती स्वीकारल्या जातील. 
३) विशेष सेवा - कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल.
संपर्क साधा - एस.एम.युसूफ़ 
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़नगर, बीड.
मो.- 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत