Breaking News

तहसीलदार हजारे यांच्या सूचनेवरून रेशन दुकानांची धडक तपासणी मोहीम एकाच दिवशी दहा राशन दुकानांना ठोकले सील;राशन दुकानदारांचे धाबे दणाणले सप्टेंबर महिन्याचे गहू-तांदूळ वाटप न केल्याची होती तक्रार


बीड(एस.एम.न्युज़)तहसीलदार सुहास हजारे यांच्याकडे अनेक राशन कार्डधारकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या की, अनेक राशन दुकानदारांनी सप्टेंबर महिन्याचे गहू व तांदूळ वाटपच केले नाहीत. फक्त शासनाकडून १०० रुपयात आलेला आनंदाचा शिधा १०० रूपये घेऊन वाटप करण्यात आला. या तक्रारीची दखल घेऊन हजारे यांनी पुरवठा विभागाच्या पथकाला दिलेल्या सूचनेनुसार पुरवठा विभागाने दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ गुरुवार रोजी सकाळ पासून संध्याकाळपर्यंत रेशन दुकानांची धडक तपासणी मोहीम हाती घेतली. यात तपासणी करून एकाच दिवशी एक-दोन नाही तर तब्बल १० राशन दुकानांना सील ठोकण्यात आले. यामुळे राशन दुकानदारांचे चांगलेच धाबे दणाणले आले.
               याविषयी सविस्तर वृत्त असे की, सप्टेंबर महिन्यात राज्य शासनाकडून गौरी गणपती व ईद-ए-मिलादुन्नबी सणानिमित्ताने राशन कार्डधारकांसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा म्हणून एक किट देण्यात आले. ज्यात साखर, गोडतेल, चणाडाळ आणि रवा या वस्तू होत्या. याशिवाय सर्वसामान्य गोरगरीब राशन कार्डधारकांना केंद्र शासनाकडून दरमहा गहू-तांदूळ मिळून प्रतिमानसी ५ किलो धान्य मोफत देण्यात येत आहे. मात्र जेव्हापासून राज्य शासनाने सण त्यौहारासाठी आनंदाचा शिधा या नावाने १०० रुपयात चार वस्तू देण्याचा उपक्रम सुरू केला आहे तेव्हापासून ज्या-ज्या महिन्यात राज्य शासनाकडून आनंदाचा शिधा राशन कार्ड धारकांसाठी पाठविला जातो त्या महिन्यात अनेक राशन दुकानदार राशन कार्डधारकांना गहू-तांदूळ वाटप करत नसल्याच्या तक्रारी वाढतच चालल्या होत्या. अशाच प्रकारे सप्टेंबर महिन्यात आलेला आनंदाचा शिधा वाटप करताना अनेक रेशन दुकानदारांनी गहू व तांदूळ वाटप न करता स्वत:च पचविला. यामुळे जिल्हा भरातील हजारो रेशन कार्डधारक सप्टेंबर महिन्यात हक्काच्या मोफत गहू-तांदूळ पासून वंचित राहिले. यामुळे अनेक राशन कार्डधारकांनी आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसीलदारांना तक्रारी दिल्या. यामुळे या तक्रारींची गंभीरतेने दखल घेत बीडचे तहसीलदार सुहास हजारे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख यांना सूचना करून पथकाला तपासणी मोहिमेवर पाठविले. तहसीलदार हजारे यांची ही कृती एकाच दिवशी एक-दोन नाही तर तब्बल १० रेशन दुकानांवर कारवाई करण्याकरिता कामी आली. या १० रेशन दुकानांमध्ये बीड शहरातील तीन, गेवराई तालुक्यातील तीन, बीड तालुक्यातील दोन आणि आहेर वडगाव येथील दोन अशा दहा दुकानांवर कारवाई करून सील ठोकण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्राकडून कळाले आहे. यामुळे जिल्हाभरातील रेशन दुकानदारांचे धाबे दणाणले आहे तर राशन कार्ड धारकांकडून तहसीलदार हजारे यांच्या सह पुरवठा विभागाने केलेल्या या धडक मोहिमेचे कौतुक केले जात आहे.


या पथकात यांचा आहे समावेश 

तहसीलदार हजारे यांच्या पथकात जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख, निरीक्षण अधिकारी प्रशांत सुपेकर, पुरवठा निरीक्षक संतोष मुळीक, अव्वल कारकून श्रीराम वायभट, शिपाई श्रीराम महाकुंडे व इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.



शहरी आणि ग्रामीण भागात सुरूच राहणार धडक मोहीम

तहसीलदार सुहास हजारे यांची छबी एक कर्तव्यदक्ष व कर्तव्य कठोर अधिकाऱ्याची आहे. त्यांच्यासमोर कोणीही रितसर तक्रार घेऊन आला तर त्याच्यावर ते काम करतात म्हणजे करतातच. अशाच प्रकारे आता सप्टेंबर चे धान्य वाटप न करता जिरविलेल्या राशन दुकानदारांची झाडाझडती घेऊन जिरविण्याची मोहीम हजारे यांनी सुरू केली असून हे पथक बीड शहरासह ग्रामीण भागात सुद्धा दर दिवशी तपासणी मोहीम राबविणार आहे.


कारवाई चांगली पण .....

तहसीलदार यांच्या पथकाने रेशन दुकानांवर केलेली ही कारवाई चांगली असली तरी जे राशन दुकानदार सप्टेंबरचे धान्य जवळपास अर्धा ऑक्टोबर उलटल्यानंतर वाटप करत होते. आता सील ठोकण्यात आल्याने त्या दुकानदारांकडे असलेले धान्य राशनकार्ड धारकांना मिळणार नाही व काही दिवसातच ऑक्टोबर महिन्याचे धान्य सुद्धा पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना वितरित करण्यात येईल. तोपर्यंतही या दुकानांना सील राहिले तर मग सील करण्यात आलेल्या या दुकानांवरील राशन कार्ड धारकांना सप्टेंबरचे तर मिळालेच नाही पण ऑक्टोबरचे ही धान्य मिळण्यात अडचणी येतील. म्हणून तहसील कार्यालय आणि पुरवठा विभागाने ज्या-ज्या राशन दुकानदारांनी सप्टेंबरचे धान्य वाटप केले नाही अशा सर्व दुकानांवरून सप्टेंबर व ऑक्टोबर असे दोन महिन्यांचे धान्य वाटप करण्याचे नियोजन करावे. जेणेकरून सर्वसामान्य गोरगरिबांना लागोपाठ दोन महिने धान्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये.


आनंदाचा शिधामुळे गहू-तांदूळावर संकट!

एकीकडे आनंदाचा शिधा नाव देऊन १०० रुपयात चार वस्तू द्यायच्या आणि दुसरीकडे केंद्र शासनाकडून येणारे मोफत गहू-तांदूळ सर्वसामान्य गोरगरीबांना वाटप करायचे नाही. ही जी प्रथा व रीत अनेक राशन दुकानदारांनी अवलंबली आहे यामुळे राशन कार्ड धारकांना १०० रुपयात चार वस्तू तर मिळू लागल्या परंतु त्यांच्या नावाने येणारे हक्काचे मोफत गहू-तांदूळ मिळत नसल्याने राज्य शासनाच्या या आनंदाच्या शिध्याने केंद्र शासनाकडून सर्वसामान्य गोरगरिबांसाठी येणाऱ्या मोफत गहू व तांदुळावर संकट येत आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.



=======================================


१] कार्यालयीन निवेदन अर्ज व वृत्तपत्रात देण्यासाठी बातमी आणि लेख योग्य दरात लिहून मिळेल 
२] विशेष सेवा - कार्यक्रम स्थळी येऊन बातमी लिहून मिळेल 
३] वृत्तपत्र व एस.एम.न्युज़ साठी बातम्या आणि जाहिराती स्वीकारल्या जातात 
संपर्क साधा - एस.एम.युसूफ़ 
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़ 
आसेफ़नगर, बीड. 
मो.- 9021 02 3121
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत