Breaking News

आसेफ़नगरच्या मुख्य रस्त्याला गटार गंगेचे स्वरूप बजेट येऊनही नाला व रस्त्याच्या काँक्रीटीकरणास टाळाटाळ


बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील आसेफ़नगरच्या मुख्य रस्त्याला एकाच पावसात गटार गंगेचे स्वरूप आले. विशेष म्हणजे येथील अगडबंब नाला व रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी बजेट ही येऊन पडले आहे. तरीपण नाला व रस्त्याच्या काँक्रीटीकरणास टाळाटाळ केली जात असून लोकप्रतिनिधी नागरिकांवर सूड उगवत असल्याचे आरोपही केले जात आहे.
           याविषयी सविस्तर असे की, बीड नगर परिषदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आसेफ़नगरच्या मुख्य रस्त्याकडे लोकप्रतिनिधींची सुरुवातीपासूनच वक्रदृष्टी आहे. यामुळे आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक कोणीही असो, कुठल्याही पक्षाचे असो त्यांच्याकडून आसेफ़नगर समोरून वाहणारा व शहरापासून जवळपास चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पालवन चौकातून वाहत येणाऱ्या भल्यामोठ्या अगडबंब नाल्या ची रुंदी व खोली वाढवून नाला बनविला जात नाही. एवढ्या लांबच्या अंतराहून वाहत येणारे घाण पाणी नाल्यात मावत नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा या नाल्याचे पाणी अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात रस्त्यावरूनच एखादी नदी व्हावी तसे वाहते. कधी गुडघे एवढे तर कधी कमरे एवढे पाणी रस्त्यावर तुंबते. म्हणून पाऊस पडायला सुरुवात झाली की हा रस्ता वाहतुकीसाठी वापरणे पादचाऱ्यांसह दुचाकी, तीन चाकी व चार चाकी स्वारांना त्रासदायक व धोक्याचे ठरते. या गटारगंगेत अनेक वाहने बंद पडतात. अशा अवस्थेत लोकांना वाहनातून उतरून वाहणाऱ्या व तुंबलेल्या गटारगंगेत स्नान करत वाहनांना लोटत गटारगंगेच्या बाहेर काढावी लागतात. हा प्रकार जवळपास २५ ते ३० वर्षांपासून या रस्त्यावर आजपर्यंत ही तसाच सुरू आहे. या काळात अनेक पक्षाचे आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक होऊन गेले. त्यातले काही अजूनही राजकारणात आहेत. तर काही बाद झालेत. परंतु आसेफ़नगरच्या या मुख्य रस्त्याची समस्या अजूनही होती तशीच आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरील नाला बांधण्यासाठी व रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी गेल्या महिन्यात शासनाकडून कोट्यवधींचा निधी येऊन पडला आहे. तरीसुद्धा या रस्त्यावरील नाल्याचे व रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम प्रत्यक्षात सुरुवात करण्यास महिना उलटूनही टाळाटाळ करण्यात येत आहे. ही अवस्था पाहून सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी नागरिकांवर सूड उगवत असल्याचा आरोपही केला जात आहे.


लोकप्रतिनिधींना द्यावी लागेल का उदबत्तीची धूप ?

पहिल्याच पावसात आसेफ़नगरच्या मुख्य रस्त्याला आले गटार गंगेचे स्वरूप, लोकप्रतिनिधींची आश्वासने आणि बजेटही पडले खूप. नाला व रस्त्याचे काँक्रिटीकरण व्हावे म्हणून आता आमदार व नगराध्यक्षांना द्यावी लागेल का उदबत्तीची धूप ? असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत