मुस्लीम महेदवीया मस्जीद साठी एल.एम.एम.ग्रुप ग्लोबल चे पोलीस अधीक्षकांना निवेदन
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील लोहार गल्ली भागात असलेल्या मुस्लीम महेदवीया मस्जीद साठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले असून मस्जीद च्या जीर्णोद्धारासाठी जिल्हा पोलीस प्रमुख या नात्याने विशेष लक्ष घालावे. मुस्लीम समाजातीलच दोन समुदायांमध्ये मस्जीद प्रकरणामुळे तेढ निर्माण होऊ नये. मस्जीद ए महेदवीया च्या जागेची साफसफाई व बांधकामासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे. अशी विनंती वजा मागणी एल.एम.एम.ग्रुप ग्लोबल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सय्यद अली दिलावर फ़र्रूख़ यांनी निवेदनातून केली आहे. सदरील निवेदन मुहम्मद अब्दुल क़दीर आणि एस.एम.युसूफ़ यांनी पोलीस अधीक्षकांना दिले.
याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहरातील जुना बाजार भागात असलेल्या लोहार गल्ली परिसरातील सुप्रसिद्ध हवेली समोर मुस्लीम महेदवीया समाजाची मस्जीद आहे. परंतु मस्जीद आजमितीला पडझड झालेल्या अवस्थेत आहे. मात्र मस्जीद ची जागा क़ौम ए महेदवीया च्या अखत्यारित नसून मस्जीद लगत असलेल्या मुस्लीम समाजातीलच अन्य पंथीय शेजाऱ्याच्या ताब्यात आहे. त्याने मस्जीदचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून टाकल्याने तिथे महेदवीया जमाअ्तला जाता येत नाही. शिवाय पडझड झाल्याने मस्जीद ची संपूर्ण जागा घाण व केर कचरा काढून साफ करून घेणे आवश्यक आहे. परंतु शेजाऱ्याने मस्जीद मध्ये जाण्यास रस्ताच न ठेवल्याने आणि महेदवीया जमाअ्तला मस्जीद च्या जागी संबंधित माणूस मस्जीद बांधण्यास मज्जाव करीत असल्याने इच्छा असूनही महेदवीया जमाअ्त मस्जीद बांधू शकत नाही. शिवाय मस्जीद च्या जमिनीचा काही भाग शेजाऱ्याने अतिक्रमण केला आहे. ही बाब खा.प्रीतम ताई मुंडे, आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांनाही निवेदनाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आली आहे. महेदवीया जमाअ्त ला काळजी आहे की, हा जमीन बळकावणारा जीर्णोद्धाराच्या कामात अडथळा आणण्याचा आणि मुस्लीम महेदवीया समुदायाच्या सदस्यांना इजा करण्याचा प्रयत्न करेल. ही बाब लक्षात घेता पोलीस अधीक्षक साहेबांनी याकडे विशेष बाब म्हणून जातीने लक्ष देऊन पडझड झालेली मस्जीद ए महेदवीया ची जागा साफसफाई करून घेण्यासाठी व नंतर मस्जीदचे बांधकाम करण्याकरिता क़ौम ए महेदवीयाच्या ताब्यात देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. अशी विनंती वजा मागणी एल.एम. एम.ग्रुप ग्लोबल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सय्यद अली दिलावर फ़र्रूख़ यांनी केली असून सदरील निवेदन जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटीचे सदस्य मुहम्मद अब्दुल क़दीर आणि एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना दिले.
जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क साधा -
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़
आसेफ़नगर, बीड.
मो :- 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा