महावितरणचे अभियंता व गुत्तेदाराची फिरवाफिरवी आसेफ़नगरवासियांच्या जीवावर बेतणार ! लोंबकळणाऱ्या विद्युत तारांना टेलिफोन खांबाचा आधार
बीड (एस.एम.न्युज़) - शहरातील आसेफ़नगर भागात अकबर किराणा दुकान गल्ली मध्ये लोंबकळणाऱ्या विद्युत तारा येथील रहिवाशांच्या जीवावर बेतू शकतात हे लक्षात घेता जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून येथील नागरिकांनी बांबू व सुतळीचा वापर करत लोंबकळणाऱ्या विद्युत तारांना टेलिफोन खांबाला बांधून आधार दिला आहे. मात्र याचे कुठलेही सोयरसुतक महावितरणचे अभियंता मिसाळ व गुत्तेदार इनामदार यांना नसल्याने त्यांची फिरवाफिरवी येथील नागरिकांच्या जीवावर बेतू शकते. येथे दुर्घटना घडल्यास महावितरणचे अभियंता व गुत्तेदार हेच सर्वस्वी जबाबदार असतील असे आसेफ़नगरवासियांनी "एस.एम.न्युज़" शी बोलताना म्हटले आहे.
या विषयी सविस्तर असे की, आसेफ़नगरवासीयांनी महावितरण कंपनी कडे सदरील बाब अनेकदा निवेदनाच्या माध्यमातून वेळोवेळी मांडलेली आहे. लोंबकळणाऱ्या तारांसह गल्लीतील एक विद्युत पोल जो वाकलेल्या अवस्थेत आहे, दोन तुकडे जोडून व कमी उंचीचा लावण्यात आलेला आहे. पोल वर लावलेल्या ब्रॅकेट वर विद्युत तारांची मदार आहे. या विद्युत तारा जवळपास तीस-पस्तीस वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या आहेत. त्या आता जीर्ण झाल्या असून दिवसेंदिवस खाली-खाली लोंबकळू लागल्या आहेत. ज्यामुळे एखाद दिवशी त्या तुटल्या तर मोठा अनर्थ घडू शकतो. कारण ही गल्ली अवघ्या सात-आठ फुटाची अरुंद आहे. म्हणून येथील रहिवाशांनी महावितरण चे अभियंता व गुत्तेदार च्या दुर्लक्षाकडे बघून एक बांबू आणि सुतळी बांधून या विद्युत तारांना टेलिफोन खांबाचा आधार दिला आहे. परंतु महावितरणचे अभियंता व गुत्तेदार हे अशा अवस्थेतही गल्लीमध्ये एक नवीन पोल व केबल टाकायला तयार नाहीत. याविषयी अभियंता मिसाळ यांना सांगितल्यानंतर महावितरण कडे पोल उपलब्ध नसल्याचे कारण देतात तर गुत्तेदार केबल उपलब्ध आहे, पोलचं काय ते तुम्ही बघा. असे म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून फिरवाफिरवी करू लागले आहेत. त्यांची ही फिरवाफिरवी आसेफ़नगरवासियांच्या जीवावर बेतू शकते जर गल्लीमध्ये लोंबकळणाऱ्या या विद्युत तारा तुटून कुठलीही दुर्घटना घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही महावितरणचे अभियंता व गुत्तेदार यांच्यावरच असेल असे "एस.एम.न्युज़" शी बोलताना आसेफ़नगरवासियांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा