Breaking News

शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने कोरोना पळविला;शिक्षण क्षेत्रातूनही बाऊ केलेल्या कोरोनाला पळवा !


बीड (एस.एम.न्युज़) - नुकतीच शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात सर्वधर्मीय बांधवांनी मोठ्या हर्षोल्हासात साजरी केली. या निमित्ताने शासन-प्रशासनाने कोरोनाचीही गय न करता त्याला पळवून लावले तसेच आता शिक्षण क्षेत्रात सुद्धा बाऊ करून ठेवलेल्या  कोरोनालाही पळवा आणि  शाळा महाविद्यालय प्रत्येक दिवशी पूर्णवेळ सुरू करण्याचे आदेश काढावे. अशी मागणी आपले सरकार या वेब पोर्टल द्वारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
      याविषयी पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मार्च २०२० पासून कोरोना च्या निमित्ताने राज्यभरातील शाळा व महाविद्यालयांना जवळपास टाळेबंद करण्यात आलेले आहे. अपवादात्मकरित्या काही शाळा व महाविद्यालय सुरू असले तरी तिथेही १००% विद्यार्थ्यांना प्रवेश न देता ५०%विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. साडेपाच तासांऐवजी अवघ्या तीन तासांची शाळा व महाविद्यालये भरविले जाताहेत. विद्यार्थ्यांना दर दिवशी  शाळेत प्रवेश न देता एक दिवसाआड शाळेत प्रवेश दिला जातो. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे अतोनात नुकसान झाले आहे व होत आहे. मात्र याचे कुठलेही गांभीर्य शिक्षण क्षेत्रात दरमहा अवाढव्य वेतन घेणाऱ्या अधिकार्‍यांपासून ते शिक्षकांपर्यंत कोणालाही नाही. हे सर्व चाकरमानी फक्त "दिन जाओ पगार आवो" प्रमाणे पाट्या टाकण्याचे कार्य करीत आहे. या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे व पर्यायाने भावी पिढीची शैक्षणिक व बौद्धिक हानी अतोनात झाली आहे. शासन-प्रशासनासह शिक्षण विभागातील शिक्षणाधिकार्‍यांपासुन कर्मचाऱ्यांपर्यंत, मुख्याध्यापकांपासून शिक्षकांपर्यंत, प्राचार्यांपासून प्राध्यापकापर्यंत कोणालाच याचे गांभीर्य राहिले नसल्याने गेल्या दोन वर्षांच्या शिक्षण क्षेत्रातील टाळेबंदीमुळे येणाऱ्या नवीन पिढीच्या अनेक वर्षांचा मार्ग हा खडतर व अंधकारमय झाला आहे. ही बाब लक्षात घेता जसे शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शासकीय-प्रशासकीय स्तरावर कोरोना पळविण्यात आला आणि संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात शिवजयंती हर्षोल्लासाने कोरोना मुक्त वातावरणात हजारोंच्या संख्येत साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील कोरोनाचा बाऊही पळवून लावावा आणि शाळा-महाविद्यालय संपूर्ण क्षमतेने प्रत्येक दिवशी पूर्ण वेळ सुरू करण्याचे आदेश काढावे व त्याची अंमलबजावणी करून घ्यावी. अशी मागणी आपले सरकार या वेब पोर्टल च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क साधा -
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम.न्युज़, बीड.
मो.- 9021 02 3121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत