बीपीएल कार्ड धारकांच्या ऑनलाइन नाव नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी एक ना धड भाराभर चिंध्यांसारखे;त्यांना पहा अन् पान-फूल वहा
बीड (एस.एम.न्युज़) - खा. रजनीताई पाटील, खा. प्रीतमताई मुंडे, आ. नमिताताई मुंदडा, आ. संदीप क्षीरसागर, ना. धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, आ. लक्ष्मण पवार, आ. बाळासाहेब आजबे, आ. सुरेश धस, आ. विनायक मेटे, आ. संजय दौंड बास एकेकाची नावे घ्या आणि पान फूल व्हा अशी अवस्था या सर्वांनी निर्माण केल्याने बीड जिल्ह्यातील बीपीएल कार्डधारकांची ऑनलाईन नाव नोंदणी जवळपास वर्षभरापासून होत नाहीये. यामुळे वर उल्लेख केलेले बीड जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी हे एक ना धड भाराभर चिंध्यांसारखे झाल्याची घणाघाती टीका गोरगरीब बी.पी.एल. कार्ड धारकांच्या विदारक अवस्थेवर प्रकाश टाकताना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
याविषयी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,जवळपास गेल्या वर्षभरापासून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या गोरगरीब कुटुंबीयांना तहसील कार्यालयाकडून मिळालेले बी.पी.एल.रेशनकार्ड ऑनलाइन नाव नोंदणी प्रशासनाकडून करण्यात येत नसल्याने हजारो बी.पी.एल.कार्डधारक शासनाकडून देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या लाभापासून वंचित राहिले आहेत. यावर गेल्या वर्षभरात वृत्तपत्रकारांनी आपापल्या वृत्तपत्रात रकानेच्या रकाने लिहून स्थिती विषद केलेली आहे. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी याविषयी शासन-प्रशासनाला निवेदनांच्या माध्यमांतून वस्तुस्थिती दाखवून दिलेली आहे. या सर्व बाबी जिल्ह्यातील दोन खासदार, एक मंत्री आणि आठ आमदारांना माहित नसेल असे नाही. मात्र तरीसुद्धा जिल्ह्यातील या सर्व अकरा लोकप्रतिनिधींना या गोरगरीबांचे काही देणेघेणे असल्याचे गेल्या वर्षभरात दिसून आले नाही. यामुळे आजही जिल्ह्यातील बी.पी.एल. कार्डधारक त्यांच्यासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध योजनांपासून वंचित राहिले आहेत. शिवाय पोटाची खळगी भरण्याकरिता दररोज लागणारे अन्नधान्य सुद्धा रेशनकार्ड ऑनलाईन नाव नोंदणी नसल्याने त्यांना मिळत नाहीये. परंतु या सर्व बाबींकडे जिल्ह्यातील या सर्व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य असे दुर्लक्ष गेल्या वर्षभरात दिसून आले आहेत. यामुळे या सर्व लोकप्रतिनिधींबाबत सर्वसामान्य गोरगरीब बी.पी.एल.कार्डधारकांच्या मनात रोष खदखदत असून त्याचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो. याचा परिणाम लवकरच येऊ घातलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीवर निश्चितपणे दिसून येईल यात शंका नाही. परंतु तत्पूर्वी तरी जिल्ह्यातील हे सर्व लोकप्रतिनिधी एक ना धड भाराभर चिंध्यांसारखे झाले असून त्यांना पहा अन् पान-फूल वहा अशी अवस्था त्यांनी निर्माण करून ठेवली असल्याचा घणाघाती आरोपही जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केला असून सर्वसामान्य गोरगरीब बी.पी.एल. रेशनकार्ड धारकांची होत असलेली कुचंबना थांबविण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. सदरील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना दिले असून निवेदनावर एस.एम.युसूफ़ यांच्यासह डॉ. संजय तांदळे आणि डॉ. लक्ष्मण पवळ यांची नावे व सह्या आहेत.
चोर कोण ? शिक्षा कुणाला ? अर्थातच करे कोई भरे कोई !
काही महिन्यांपूर्वी तहसील कार्यालयातून थोडेथोडके नव्हे तर चक्क पाच हजार पिवळे कार्ड चोरीस गेल्याचे उघडकीस आल्याने राज्यभर याचा गवगवा झाला. हा मुद्दा बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेतही उचलल्याचे प्रसिद्धी माध्यमातून समोर आले. हे सर्व प्रकरण असले तरी रेशनकार्डांची चोरी केली कुणी आणि त्याची शिक्षा कुणाला दिली जातेयं याचाही विचार व्हावा. मात्र गेल्या वर्षभरात तरी, करे कोई-भरे कोई सारखा प्रत्यय सर्वसामान्य गोरगरीब बीपीएल रेशनकार्ड धारकांना येतोय.
पुरवठा अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांची ही उदासीनता !
एकीकडे तहसील कार्यालयातून रेशन कार्डची चोरी होते तर दुसरीकडे तहसील कार्यालयात असलेल्या पुरवठा विभागाकडे जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष असल्याने त्यांचीही उदासीनता यामध्ये लपून राहत नाही. गेल्या वर्षभरापासून पुरवठा विभागाला टाळे असल्याने शासनाकडून आलेले धान्य रेशन दुकानदारांना वेळेवर दिले जात नाही. धान्य वितरणात सुसूत्रता नाही. यामुळे सुद्धा बी.पी.एल. कार्डधारकांना दरमहा मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. परंतु याचेही कुठले सोयरसूतक पुरवठा अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकार्यांपासून ते जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना ही नाही.
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क साधा -
एस.एम.युसूफ़
मुख्य संपादक - एस.एम. न्युज़, बीड.
मो. - 9021 02 3121.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा