Breaking News

बीडकरांनो, अजून चौदा महिन्यांचा वनवास सहन करा - एस.एम.युसूफ

बीडकरांनो, अजून चौदा महिन्यांचा वनवास सहन करा - एस.एम.युसूफ

बीड (प्रतिनिधी) -  शहराची गेल्या ४६ महिन्यात झालेल्या दुरावस्थेने नागरिकांना शहरात असूनही वनवासात असल्याचा अनुभव येत आहे. हा वनवास संपायला अजून १४ महिने बाकी असून उरलेला हा काळ सहन करावा. असे प्रतिपादन पत्रकार एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या पत्रकातून केले आहे.
पत्रकात नमूद केले आहे की, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बीड नगर परिषद साठी मतदारांनी २७ नोव्हेंबर २०१६ दिवशी मतदान करून संमिश्र कौल दिला. मतदारांनी मातब्बर नगराध्यक्षांच्या विरोधात नवख्या भिडूने निर्माण केलेल्या काकू-नाना विकास आघाडी च्या झोळीत पहिल्याच झटक्यात चक्क २० नगरसेवक टाकले. मात्र नगराध्यक्ष ही जास्त मागे राहिले नाही, त्यांनीही स्वतःच्या नगराध्यक्षपदासह राष्ट्रवादी पक्षाचे १९ नगरसेवक निवडून आणले. तसेच ए.आय.एम.आय.एम. या पक्षानेही पहिल्याच प्रयत्नात ९ नगरसेवक निवडून आणून बीड शहरातील भल्याभल्या राजकारण्यांना तोंडात बोटं घालायला लावली. एकूण ५० नगर सेवक असलेल्या बीड नगर परिषदेमध्ये तिन्ही प्रतिस्पर्धी पैकी कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने संमिश्र परिस्थिती बनली. येथून सुरू झाले बीड नगर परिषदच्या मतदारांचे दुर्दैव. निकालानंतर बऱ्याच उलाढाली झाल्या आणि मातब्बर नगराध्यक्षांना विरोध म्हणून ए.आय.एम.आय.एम. पक्षाने दगडापेक्षा वीट मऊ हे धोरण समोर ठेवून आपले ९ नगरसेवक काकू-नाना विकास आघाडी च्या झोळीत टाकले. परंतु मुळातच सर्वांची विचारसरणी वेगवेगळी. निवडून आलेल्या तिन्ही प्रतिस्पर्धीं नगरसेवकांच्या महत्त्वाकांक्षा वेगवेगळ्या. यामुळे अल्पावधीतच व्हायचे तेच झाले आणि सुरुवातीला आघाडी सोबत गेलेल्या ए.आय.एम.आय.एम. च्या काही नगरसेवकांचे अल्पकाळातच फिस्कटले व ते आपल्याच पक्षाच्या विरोधात भूमिका घेत नगराध्यक्षांच्या राष्ट्रवादीला जाऊन मिळाले. त्यांच्यासोबत कसातरी संसार सुरू असताना विधानसभा निवडणुक लागली आणि तत्कालीन आमदार व विद्यमान नगराध्यक्ष या दोन्ही काकांना नवखा भिडू पुतण्या डोईजड होत असल्याचे लक्षात येताच मातब्बर काकाने कूस बदलून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी मिळविली. मातब्बरांच्या या वाटचालीमुळे त्यांच्यासोबत गेलेल्या ए.आय.एम.आय.एम. च्या नगरसेवकांची मात्र गोची झाली. तरीही काही त्यांच्यासोबत राहिले तर काही त्यांना सोडून गेले. त्यांना सोडून गेलेले नगरसेवक आता कोणाचेच राहिलेले नाहीत. नगराध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाकडून जनतेतून निवडून आले. मात्र त्यांचे मोठे बंधू शिवसेनावासी झाल्याने व नगराध्यक्ष त्यांच्या सोबत एकनिष्ठ असल्याने त्यांनी अजून तरी राष्ट्रवादी पक्ष सोडल्याचे किंवा शिवसेनेत प्रवेश केल्याचे घोषित केलेले नाही. म्हणून आता त्यांचीही अवस्था नगरसेवकांसारखीच झालेली आहे. आता तेही ना धड राष्ट्रवादी, ना धड शिवसेनेचे अशी अवस्था झालेली आहे. तर काकू-नाना विकास आघाडी स्थापन करणाऱ्या नवख्या भिडूने विधानसभा निवडणुकीत काकाला धोबीपछाड देत आमदारकी मिळविली ती राष्ट्रवादी पक्षाकडून. यामुळे त्यांच्या आघाडीकडून निवडून आलेले २० नगरसेवक आता आघाडीचे की राष्ट्रवादीचे ? याचे उत्तर काकू-नाना विकास आघाडी चे जनक म्हणून विद्यमान आमदारांनी द्यावे. राष्ट्रवादी, ए.आय.एम.आय.एम. शिवसेना आणि आघाडीमुळे बीड शहर पार पिछाडी वर गेला असून शहराची पूर्णतः बिघाडी झाली आहे. ही सत्य वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. तसेच राष्ट्रवादीकडून निवडून आलेले १९ नगरसेवक राष्ट्रवादीचे की शिवसेनेचे ? याचे उत्तरही  विद्यमान नगराध्यक्षांनी  जनतेला द्यायला हवे. ए.आय.एम.आय.एम. च्या नगरसेवकांची अवस्था ही या दोन्हींपेक्षा वेगळी नाही. पक्षविरोधी कारवाया केल्याने (एक वगळता) ते पक्षाचेही राहिलेले नाहीत. तसेच आघाडी व राष्ट्रवादी सोबत वेळोवेळी तळ्यात-मळ्यात केल्याने ते नेमके कुणाचे ? हे दस्तुरखुद्द त्यांनाही आता मतदारांसमोर सांगता येणार नाही. अशी अवस्था आहे. एकंदरीत या तिन्हीही प्रतिस्पर्ध्यांनी  गेल्या ४६ महिन्यात (३ वर्ष, १० महिने) बीड नगर परिषदेत चालविलेल्या खेळामुळे बीड शहरातील मतदारांसाठी आवश्यक असलेले एकूण एक प्रश्न ज्यात प्रामुख्याने  दळणवळणासाठी आवश्यक असलेले चांगले रस्ते, चांगल्या मजबूत नाल्या व मोठे नाले, वीज, पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्याचे प्रश्न अधांतरीच पडून आहेत. त्याकडे पाहायचे,ते सोडवायचे किंवा दूर करायचे प्रयत्न या तिन्ही प्रतिस्पर्ध्यांच्या नगरसेवकांसह  नगराध्यक्ष सुद्धा करत नाही. म्हणून गेल्या ४६ महिन्यात बीड शहराची ओळख खड्ड्यांचे शहर, गलिच्छतेचे शहर व चिखलमय बीड अशी झालेली आहे. ही बाब या सर्वांना मतदान केलेल्या मतदारांचे दुर्दैव आहे. हे दुर्दैव म्हणजेच शहरात राहून ही मतदारांचा वनवास संपायला अजून १४ महिन्यांचा काळ बाकी असून तो सहन करा. असे प्रतिपादन पत्रकार एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या पत्रकातून केले आहे.

                    आपला

एस.एम.युसूफ
पत्रकार, बीड.
संपर्क - 9021 02 3121.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत