'ब्लर कॅनव्हास’ चित्रपटाद्वारे एजाज अलींनी उघड केले सफाई कामगारांचे वास्तव
'ब्लर कॅनव्हास’ चित्रपटाद्वारे एजाज अलींनी उघड केले सफाई कामगारांचे वास्तव
व्यवस्थेच्या अन्यायाविरुद्ध सफाई कामगारांच्या संघर्षाचा ज्वलंत विषय
अबूजर फिल्म्सची सामाजिक आशयाची प्रभावी निर्मिती
‘स्वच्छ भारत’ आणि ‘स्मार्ट सिटी’च्या घोषणांनी शहरांचे चित्र बदलत असताना, त्याच शहरांचे आरोग्य जपणाऱ्या सफाई कामगारांच्या आयुष्यातील संघर्ष, उपेक्षा आणि आर्थिक विवंचना अधोरेखित करणारा ‘ब्लर कॅनव्हास’ हा मराठी चित्रपट नुकताच ‘Praniti Film’ या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे.
अबूजर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटातून नगरपरिषदेतील सफाई कामगारांचे रखडलेले वेतन, कुटुंबाची उपासमार, सामाजिक अवहेलना आणि व्यवस्थेच्या उदासीनतेचे वास्तव प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
आता पर्यन्त या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत,तर याच चित्रपटातील मुख्य नायिका सोनाली शहाणे हिला बेस्ट ऍक्टर चा पुरस्कार ही मिळाला आहे
या चित्रपटाची निर्मिती एजाज अली आणि कुलसिन कुलविंदर सिंग यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा प्रवीण वडमारे यांनी सांभाळली आहे. लेखक एजाज अली यांनी अत्यंत परखड संवादांच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या वेदना आणि त्यांच्या जगण्यातील विदारक वास्तव प्रेक्षकांसमोर आणले आहे.
चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे सफाई कामगारांना केवळ परिस्थितीचे बळी म्हणून न दाखवता, आपल्या हक्कांसाठी संघटित होऊन संघर्ष करणारा स्वाभिमानी वर्ग म्हणून चित्रित करण्यात आले आहे. सलग आठ-आठ महिने वेतन न मिळाल्याने निर्माण झालेली आर्थिक कोंडी, आजारी वडिलांच्या औषधांचा प्रश्न, मुलांच्या गरजा आणि संसाराचा गाडा चालवताना होणारी परवड या प्रसंगांतून चित्रपटाची कथा पुढे सरकते. अखेरीस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या विचाराने प्रेरित होऊन कामगार आपला लढा लढतात.
दिग्दर्शक प्रवीण वडमारे यांनी कोणताही अनावश्यक भावनिक मुलामा न देता वास्तववादी पद्धतीने चित्रपट साकारला आहे. विशेषतः कामगारांचा संघर्ष यशस्वी झाल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे येणाऱ्या राजकीय नेतृत्वाचे चित्रण व्यवस्थेतील दांभिकतेवर भाष्य करणारे ठरते.
महेंद्र खिल्लारे यांनी महेंद्र या प्रमुख भूमिकेतून कामगारांचा आक्रोश आणि संघर्ष प्रभावीपणे साकारला आहे. सोनाली शहाणे, प्रशांत जाधव, लक्ष्मीकांत दोडके आणि पूजा लवाटे यांनीही आपल्या भूमिकांना उत्तम न्याय दिला आहे. याशिवाय रणजीत वाघमारे, महादेव सवाई, ज्योती जावळे, अतुल ठोकळ, जतीन वाघमारे, रवी धुताडमल, हिरा ठाकूर, पल्लवी गायकवाड, सुरेखा डोंगरदिवे, अमोल गायकवाड, प्रगती सूर्यवंशी, बालकलाकार अबुजर अली आणि शाहीर विलास सोनवणे यांच्यासह संपूर्ण कलाकार चमूने चित्रपटाला बळ दिले आहे. प्रशांत रुईकर यांनी साकारलेली आजारी वडिलांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरते.
शरद शिंदे, दीपक दळवी आणि अनिल कैवाडे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे. दीपक जमधाडे, नितीन प्रधान आणि पवन शिंदे यांनी गीत-संगीत व गायनाची बाजू सांभाळली तर कार्यकारी निर्माता म्हणून राम पाळवदे आणि कबीर जाधव तर कला दिग्दर्शक म्हणून लक्ष्मीकांत दोडके यांनी काम पाहिले
मर्यादित साधनसामग्री आणि नियंत्रित बजेटमध्येही सामाजिक बांधिलकी जपणारा विषय प्रभावीपणे पडद्यावर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटातून दिसून येतो.
शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांच्या आयुष्यातच जर अस्वच्छता, उपासमार आणि अन्याय असेल, तर स्मार्ट शहरांच्या संकल्पनेला खरा अर्थ काय, असा मूलभूत प्रश्न ‘ब्लर कॅनव्हास’ उपस्थित करतो.
केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता समाजातील दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा, असे आवाहन चित्रपटाच्या माध्यमातून एजाज अली यांनी केले आहे.
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा