Breaking News

किती हा दैवदुर् "विलास"!

 

                        किती हा दैवदुर् "विलास"!

स्वतंत्र भारतात ७९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एकदाची बीडला रेल्वे आली आणि बीडहून पुणे व पुणेहून बीड अशी प्रवासी वाहतूक सुरू झाली. मात्र या रेल्वे मार्गासाठी भरीव आणि ठोस असे पाऊल उचलणारे राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांची साधी आठवण सुद्धा कोणी नाही काढली.
                       आपला भारत देश स्वतंत्र होण्याअगोदर पासून निजाम काळात हैदराबाद ते परळी हा रेल्वे मार्ग निजाम सरकारने सुरू केला होता. बीड जिल्हा मात्र रेल्वे मार्गाच्या नकाशावर परळी वगळता कुठेही नव्हता. हा रेल्वे मार्ग व्हावा याकरिता बीड जिल्हा रेल्वे कृती समिती, स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक, तत्कालीन खासदारांनीही वेळोवेळी आवाज उठविले. लोकप्रतिनिधी वगळता इतरांनी वेळोवेळी आंदोलनेही केली. बीड जिल्ह्याला रेल्वे हवी म्हणून अनेकदा दिल्लीच्या वाऱ्या केल्या. सातत्याने मागणी केली. आज यापैकी अनेकांची नावे अनेकजण आठवणीने काढत आहेत. मात्र हा रेल्वे मार्ग व्हावा याकरिता ठोस आणि भक्कम पाऊल उचलणारे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव कोणाच्या ध्यानीमनी ही येत नाहीये. ही फार मोठी शोकांतिका आहे.
                 परळी-बीड-अहेमदनगर आताचे अहिल्यानगर हा रेल्वे मार्ग व्हावा, याकरिता मुख्यमंत्री पदावर असताना विलासराव देशमुख यांनी केंद्रासोबत यशस्वी वाटाघाटी करत या रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेल्या निधीतील ५०% खर्च केंद्राने करावा आणि ५०% खर्च महाराष्ट्र सरकार उचलेल असा निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणीही केली. यामुळे या रेल्वे मार्गाच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आणि ते पूर्णत्वास आले. सद्यस्थितीत जरी बीड-परळी रेल्वे मार्ग अजून जोडला गेला नसला तरी तो पुढील वर्षी पर्यंत जोडला जाणारच आहे आणि परळी ते मुंबई असा प्रवास बीड जिल्हावासियांना आरामदायक व माफक दरात करता येणार आहे. जर विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना "फिफ्टी-फिफ्टी" चा निर्णय घेतला नसता किंवा त्याची अंमलबजावणी केली नसती तर आज बीड मधून रेल्वे धावली असती की नाही हे सांगता आले नसते.
              लोकहितासाठी अनेक जण शासन-प्रशासनाकडे वेगवेगळ्या मागण्या करत असतात. त्या सर्वच पूर्ण होतात असेही नाही मात्र त्या मागण्या लावून धरलेल्यांची नावे लोकांच्या लक्षात राहतात. हे खरे असले तरी जो कोणतेही काम करण्यासाठी भक्कम आणि ठोस पाऊल उचलून आर्थिक तजवीज करतो, त्यात त्याचा सिंहाचा वाटा असतो. अशा व्यक्तीचे विस्मरण पडावे म्हणजे ती कृतघ्नता ठरते.
                  आज घडीला बीड रेल्वेचे शिल्पकार म्हणून काहीजण बीड लोकसभा मतदारसंघात होऊन गेलेल्या काही खासदारांच्या नावांचा भडीमार सोशल मीडियासह प्रसार माध्यमातून करू लागले आहेत. ज्यांच्या नावाचा आज उदोउदो करण्यात येऊ लागला आहे. एक तर ते राजकारणातील मातब्बर-गब्बर घराण्यातील आहेत किंवा ते विद्यमान सत्ताधारी पक्षात आहेत.
                 विलासराव देशमुख आज आपल्यात नाहीत. त्यांचे पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे राजकारणात सक्रिय आहेत पण हे दोन्ही पुत्र विद्यमान सत्ताधारी पक्षाचे नाहीत. मात्र त्यांच्या पत्नी किंवा तिसरे पुत्र अभिनेते रितेश देशमुख ज्यांचा चेहरा मोहरा पूर्णतः विलासरावांसारखाच आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटात राजेंची भूमिका मोठ्या तडफेने साकारली होती. विलासरावांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या पत्नी व रितेश देशमुख यांनाही उद्घाटन समारंभात निमंत्रित करता आले असते. परंतु आज राजकारणात नीतिमत्ता राहिली नसल्याचे सगळीकडे दिसून येत आहे.
                     बीड रेल्वेच्या उद्घाटनानिमित्ताने विलासराव आणि अंतुले यांच्यातील नितीमत्तेचा एक किस्सा सहजच मनात आला. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असताना तत्कालीन मुख्यमंत्री अब्दुल रहेमान अंतुले यांना विलासराव देशमुख आमदार असताना त्यांनी एका कार्यक्रमासाठी लातूरात बोलविले होते. तेव्हा विलासरावांनी भाषण करताना सांगितले, 'अंतुले साहेब मला मंत्रिमंडळात मंत्री पद दिले नाही, निदान आम्हाला लातूर जिल्हा द्या'. तेव्हा लातूर हा उस्मानाबादचा तालुका होता. विलासरावांच्या या मागणीला सभेतच उत्तर देताना "अंतुले यांनी, विलासराव तुम्हाला लातूर जिल्हा दिला" असे ताबडतोब सांगितले आणि लातूर जिल्हा झाला.
                 कालांतराने लातूर जिल्हा निर्माण होऊन २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने विलासराव देशमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना लातूरात विशेष कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमासाठी विलासरावांनी अंतुले यांना मानाने बोलावले आणि त्यांच्या कार्याची जाण ठेवून ऋण व्यक्त करत त्यांचा हृदयी सत्कार केला होता. तेव्हा सत्कार स्वीकारल्यानंतर कार्यक्रमात बोलताना अंतुलेंनी विलासरावांना उद्देशून म्हटले होते, "विलासराव आज राजकारणात कुणी २५ दिवस लक्षात ठेवत नाही ओ आणि तुम्ही माझी २५ वर्षानंतरही आठवण ठेवली" असे म्हणून त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. अशी होती तेव्हाच्या नेत्यांची नीतिमत्ता. असे हे दोन्ही नेते आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे उत्तुंग कर्तुत्व सर्वपरिचित आहे.
                 अशा विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून बीड च्या रेल्वे मार्गासाठी ५०% खर्चाची तरतूद राज्य सरकारचे प्रमुख म्हणून केली होती. त्यांच्यानंतर आलेल्या प्रत्येक राज्य सरकारला सुद्धा त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे पालन करावे लागले. रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या ५०% खर्च हा केंद्र सरकार सोबत राज्य सरकारलाही उचलावा लागला. एकूण खर्चाचा "फिफ्टी-फिफ्टी" वाटा केंद्रासोबत राज्याला उचलायला लावणारे विलासराव देशमुख यांचे साधे नावही ही रेल्वे सुरू झाल्यानंतर कुणी घ्यायला तयार नाही. कारण ते ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करीत होते तो काँग्रेस आय पक्ष आता विद्यमान सत्ताधारी राहिला नाही. एवढंच नाही तर प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सुद्धा त्या पक्षाची अवस्था डळमळीत झालेली आहे. बहुतेक यामुळेच या रेल्वे मार्गाचे खरे शिल्पकार म्हणून ज्या विलासराव देशमुख यांची आठवण सदैव व्हायला हवी ती होत नाहीये. किती हा दैवदुर् "विलास" म्हणावा.

लेखन - एस.एम.युसूफ़

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत