बीड शहर बस वाहतूकीचा षटकार; चुकीच्या मागणीला द्या फटकार! शहरांतर्गत प्रवास त्रासयुक्त नको, त्रासमुक्त हवा!
बीड शहर बस वाहतूकीचा षटकार; चुकीच्या मागणीला द्या फटकार!
शहरांतर्गत प्रवास त्रासयुक्त नको, त्रासमुक्त हवा!
बीडमध्ये रेल्वे आली आणि काहीजण शहरवासीयांना त्रासदायक ठरणारी मागणी निवेदनाच्या माध्यमातून तर काहीजण सह्या वगैरेंच्या माध्यमातून बीड शहर वाहतूक बस करिता करू लागले आहेत. ही त्रासदायक मागणी एस.टी.बस स्थानकामधून रेल्वे स्थानकापर्यंत शहर बस सोडण्याची आहे. या मागणीवर हसावे कि रडावे तेच आता कळेनासे झाले आहे.
कारण बस स्थानकापासून रेल्वे स्थानक हे फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे मात्र ज्या सहा भागातून बीड शहर वाहतूक बस सुरू करणे आवश्यक आहे त्या प्रत्येक भागातून रेल्वे स्थानकाचे अंतर जवळपास ५ ते ८ किलोमीटर पर्यंत आहे. म्हणजेच बस स्थानकावरून जर शहर वाहतूक बस मध्ये बसून रेल्वे स्थानकावर गेले तर फक्त चार किलोमीटर ची सेवा मिळेल मात्र ती घेण्याकरिता दोन ते चार किलोमीटर पर्यंत अंतर असलेले बस स्थानकाचे अंतर इतर वाहनाने पार करावे लागेल. याला काय अर्थ आहे.
एस.टी.बस स्थानकातून शहर वाहतूक बस ही फक्त जालना रोड वरून रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक वेळेस ठीक आहे परंतु बाकीच्या मार्गावरून रेल्वे स्थानकावर जाणाऱ्यांचे काय? याचा विचार प्रत्येकाने आपल्या सद्सद् विवेक बुद्धीचा वापर करून करणे आवश्यक आहे.
एस.टी.बस स्थानकातून शहर वाहतूक बस सोडा या चुकीच्या मागणीमध्ये नेमके कुणाचे भले होणार? हाही एक संशोधनाचा विषय आहे. किंवा अशी मागणी करणाऱ्यांचे काही इप्सित यात दळले आहे की, ही मागणी पुढे रेटून रास्त मागणी मान्य होऊ द्यायची नाही, याचे षडयंत्र आहे, हे कालांतराने समोर येईलच मात्र तोपर्यंत जनता जनार्दनाने आपल्या सद्सद् विवेक बुद्धी चा वापर करून चुकीच्या मागणीला फटकार लावावा आणि शहरांतर्गत ज्या मोठ्या सहा मार्गावरून बीड शहर वाहतुक बस धावू शकते ती मंजूर करून घेण्यासाठी पुढे येऊन शासन-प्रशासनाकडे षटकार मारावा. तेव्हाच खाली नमूद केलेल्या सहा मार्गावरून शहर वाहतूक बस धावेल आणि बीड शहरवासीयांना रेल्वे स्थानकावर जाण्याकरिता त्रासयुक्त नाही तर त्रास मुक्त सेवा मिळेल, हे नक्की.
बीड शहर वासियांना रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी शहर बस वाहतुकीची नितांत आवश्यकता आहे. ती तुम्हाला तुम्ही राहता त्या भागातून पाहिजे की तिथून बस स्थानकापर्यंत अन्य वाहनाने येऊन बस स्थानकातून रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी पाहिजे? याचा सद्सद् विवेक बुद्धीने विचार करा आणि तुम्ही जिथे राहता त्या भागातून रेल्वे स्थानकापर्यंत शहर वाहतूक बस मिळविण्यासाठी संघर्ष करा. एस.टी. बस स्थानकापासून रेल्वे स्थानकापर्यंत साठी नकोय. अशाप्रकारे मजल दर मजल करत रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यात काहीही हशील नाही. तुम्ही जिथे राहता तिथूनच तुम्हाला बस मिळावी म्हणजे तुम्ही रेल्वे स्थानकापर्यंत विनासायास पोहोचू शकता. याकरिता आम्ही पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी आणि एस.टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक यांना दिलेल्या निवेदनातून खालील मार्गावरून शहर बस वाहतूक सुरू करून रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्याची मागणी केलेली आहे.
*१) शासकीय तंत्रनिकेतन (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक) पासून नाळवंडी नाका-तेलगाव नाका-बार्शी नाका-शिवाजीनगर पोलीस ठाणे चौक-पंचशील नगर-पालवन चौक मार्गे रेल्वे स्थानक.*
*२) एमआयडीसी एरिया पासून रामतीर्थ-मन्सूर शाह दरगाह-नवा मोंढा रोड-जालना रोड-एस.टी.स्टँड-छत्रपती शिवाजी महाराज चौक-जुना नगर नाका-यशवंतराव चव्हाण नाट्यगृह-तुळजाई चौक-आशा टॉकीज चौक-धानोरा रोड-पालवन चौक मार्गे रेल्वे स्थानक.*
*३) आनंदवाडी पासून जालना रोड-एस.टी.स्टँड-छत्रपती शिवाजी महाराज चौक-धानोरा रोड-पालवन चौक मार्गे रेल्वे स्थानक.*
*४) करपरा नदीपासून पांगरी रोड-अंबिका चौक-राजीव गांधी चौक-जुना नगर नाका-यशवंतराव चव्हाण नाट्यगृह-पंचशील नगर रोड-पालवन चौक मार्गे रेल्वे स्थानक.*
*५) चऱ्हाटा फाटा चौक पासून बालेपीर-पोलीस मुख्यालय-धानोरा रोड-पालवन चौक मार्गे रेल्वे स्थानक.*
*६) शहिंशाह वली दरगाह पासून कंकालेश्वर मंदिर चौक-मोमीनपुरा बायपास रोड-बार्शी नाका-शिवाजीनगर पोलीस ठाणे चौक-पंचशील नगर रोड-पालवन चौक ते रेल्वे स्थानक*(नव्याने समाविष्ट केला आहे)
बीड शहरातील विविध भागातून रेल्वे स्थानकात जाण्यासाठी *मार्गांचा हा षटकार मारा* मग शहर बस वाहतूक सह बीड रेल्वेही कशी यशस्वी होते बघा.
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा