Breaking News

"त्या" दोघांपासून अभिजीत दिपके यांच्या जीवितास धोका! प्रशांत वासनिक यांची पोलीस महासंचालकांकडे तक्रार

"त्या" दोघांपासून अभिजीत दिपके यांच्या जीवितास धोका!प्रशांत वासनिक यांची पोलीस महासंचालकांकडे तक्रार

बीड।एस.एम.न्युज़

पि.एस.आय. सुरेश सांगळे, वाळूज एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि तथाकथित पोलीस बॉईज संघटनेचा प्रदेशाध्यक्ष राहुल दुबाले या दोघांपासुन विद्यार्थी आंदोलक अभिजीत दिपके यांच्या जीवितास धोका असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वासनिक यांनी पोलीस महासंचालकांना पाठविलेल्या निवेदनातून केली असून या दोघांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. तसेच अभिजीत दिपके यांच्या संरक्षणात वाढ करावी अशी मागणीही केली आहे.
               याविषयी पोलीस महासंचालकांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दिनांक ०८/०८/२०२६ रोजी तथाकथित महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा अध्यक्ष राहुल दुबाले या व्यक्तीने इलेक्ट्रॉनिक मीडियावर जाहीरपणे अभिजीत दिपके यांना धमकी दिली की, अभिजीत दिपके ला रस्त्याने फिरु देणार नाही. विद्यार्थी आंदोलक अभिजीत दिपके यांच्या घरी वाळूज एम.आय.डी.सी. पोलीस ठाणेचे पी.एस.आय. सुरेश सांगळे हे जाऊन त्यांना भेटीस येणाऱ्या लोकांना दमदाटी करुन अडवाअडवी करु लागल्यामुळे अभिजीत दिपके यांनी सदर पि.एस. आय. यांना विचारपूस केली की, तुम्ही या ठिकाणी काय करता व लोकांना का आडवता, त्यावर बीड मधुन तथाकथित पोलीस बॉईज संघटनेचा प्रदेश अध्यक्ष राहुल दुबाले सोशल मीडीयावर जाहीरपणे वक्तव्य करतो की, पोलीसांना उलट सुलट बोलाल तर हात तोडू व रस्त्याने फिरु देणार नाही. अशी जाहीरपणे धमकी दिली आहे.
                यावरुन पि.एस.आय. सुरेश सांगळे व राहुल दुबाले या दोघांनी मिळून अभिजीत दिपके यांच्या विरुध्द घातपात करण्याचा कट केल्याचे उघड होत आहे. राहुल दुबाले हा व्यक्ती स्वतःच्या कमरेला पिस्तुल लावून सर्वत्र दहशत माजवण्याचे काम करत आहे. तसेच हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याने व दिल्ली या ठिकाणी अभिजीत दिपके यांच्या विद्यार्थी आंदोलनावर केंद्रात असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पोलिसांच्या व खाजगी गुंडांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज केला यावरुन असे सिध्द होते की, राहुल दुबाले व पि.एस.आय. सुरेश सांगळे हे दोघेजण भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या सांगण्यावरुन अभिजीत दिपकेंच्या घरावर हल्ला करण्याच्या तयारी मध्ये होते. असा आरोपही प्रशांत वासनिक यांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे.

पि.एस.आय. सुरेश सांगळे यांना निलंबित करून चौकशी करा

या प्रकरणात पि.एस.आय. सुरेश सांगळेला निलंबित करुन ते विद्यार्थी आंदोलक अभिजीत दिपके यांच्या घरी कोणत्या कारणास्तव गेले होते? ते जर शासकीय कर्तव्यावर असते तर त्यांनी पोलीस डायरीमध्ये तशी नोंद केली आहे काय? याची चौकशी करावी. अशी मागणी ही प्रशांत वासनिक यांनी केली आहे.

राहुल दुबाले वर आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करा

बीड येथील तथाकथित पोलीस बॉईज संघटनेचा प्रदेशाध्यक्ष राहुल दुबाले याला शस्त्र परवाना कोणी व कोणत्या कारणास्तव दिला? याची चौकशी करावी. तो तलवार तसेच पिस्तुल जाहीरपणे वापरताना दिसत आहे. यावरुन त्याच्याकडे भरमसाठ शस्त्र साठा असल्याचे दिसते. तो मोठी दंगल घडवून आणु शकतो म्हणून त्याची व त्याच्या घराची झडती घेऊन त्याच्यावर आर्म ॲक्ट नुसार गुन्हा नोंद करावा. अशी मागणी ही प्रशांत वासनिक यांनी केली आहे.

पोलिसांनी स्वतःच्या रक्षणाकरिता दुबाले सारखा गुंड पाळला आहे का?

पोलिसांविरोधी कारवाई करणाऱ्यास धडा शिकवायला पोलिस सक्षम असताना पोलिसांना कोणी काही बोलणाऱ्याचे हात तोडणारा राहुल दुबाले कोण?त्याच्यासारखे गुंड बीड पोलिसांनी त्यांच्या रक्षणाकरिता पाळले आहेत काय? अशी बीड पोलीस अधीक्षक यांना विचारणा करुन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी ही प्रशांत वासनिक यांनी केली आहे.

सांगळे - दुबाले यांची कॉल रेकॉर्डिंग तपासा

पि.एस.आय. सुरेश सांगळे व राहुल दुबाले यांचा मागील एक महिन्यातील कॉल रेकॉर्ड तपासावा तसेच पोलीस या नावाचा वापर करुन खाजगी संघटना काढता येते का? याची चौकशी करावी. अशी मागणीही प्रशांत वासनिक यांनी केली आहे.

स्वातंत्र्यदिनी (१५ऑगस्ट) रोजी आंदोलनाचा इशारा!

येत्या १५ ऑगस्ट २०२६ च्या आत सदरच्या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करावी व अभिजीत दिपके यांना फिरु देणार नाही, अशी धमकी राहुल दुबाले याने दिल्याने येथुन पुढे विद्यार्थी आंदोलक अभिजीत दिपके यांना हस्ते पर हस्ते कोणताही घातपात झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार पि.एस.आय. सुरेश सांगळे व राहुल दुबाले हे दोघे राहतील. त्याच बरोबर मी स्वतः ही तक्रार दिल्याने पि.एस.आय. सुरेश सांगळे व राहुल दुबाले हे दोघे माझ्या विरोधात देखील कट कारस्थान आणि घातपात करु शकतात म्हणून या दोघांनाच जवाबदार धरुन त्यांच्यावर कार्यवाही करावी. अन्यथा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही प्रशांत वासनिक यांनी निवेदनातून दिला आहे.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत