शफ़ीक़ भाऊ, तुम्ही लोकांची हृदये काबीज केली ओ!
शफ़ीक़ भाऊ, तुम्ही लोकांची हृदये काबीज केली ओ!
ॲड. शेख शफीक भाऊ हे नाव ऐकताच किंवा उच्चारताच डोळ्यांसमोर उभी राहते ती एक बुटक्या चणीची हडकुडी व्यक्ती. शारीरिक उंची अत्यंत सामान्य तर शरीर प्रकृती ही अगदीच सडपातळ मात्र समाजातील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसाठी मनात ठासून भरलेली मानवता, प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाणारे अशी ओळख असलेले ॲड. शेख शफ़ीक़ भाऊ हे सध्या बीड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे.
काल दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रविवार रोजी शफ़ीक़ भाऊंच्या मातोश्री शेख ज़ाहिदा सालेह मुहम्मद यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची नमाज़-ए-जनाज़ा रात्री ११:०० वाजता तकिया मस्जिद येथे पठण करण्यात आली. त्यानंतर दफनविधी तकिया कब्रस्तान येथे करण्यात आला.
तत्पूर्वी गेल्या काही दिवसांपासून ज़ाहिदा बेगम यांची प्रकृती अत्यंत खालावल्याने त्यांना बीड शहरातील काकू-नाना रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. दवाखान्यात भरती केल्यापासून ते त्यांची प्राणज्योत मालवे पर्यंत प्रत्येक दिवशी दिवस-रात्र अक्षरशः शेकडो तरुण रुग्णालयात उपस्थित राहत होते. रात्र-रात्र जागून काढत होते. यामागे त्यांच्या मनात होते ते शफ़ीक़ भाऊंविषयी असलेले आदर आणि प्रेम.
शफ़ीक़ भाऊंनी विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक चळवळ आणि सर्वसामान्य तळागाळातील लोकांसाठी सदैव सामाजिक कार्याला प्राधान्य देऊन वाहून घेतलेले आहे. यामुळेच ते फक्त विद्यार्थी, तरुण यांच्यासाठीच नाहीतर आबाल वृद्धापर्यंत आदरणीय व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. म्हणूनच त्यांच्या आईंना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे तरुणांची सारखी रेलचेल होती.
३० ऑगस्ट रविवार रोजी रुग्णालयात त्यांचे निधन होताच ही वार्ता अगदी वाऱ्यासारखी बीड शहरासह संपूर्ण जिल्हाभरात पसरली आणि पाहता पाहता लोकांचे जत्थे च्या जत्थे ज्यात तरुणांसह प्रत्येक वयोगटातील लोकांचा भरणा होता जिल्हाभरातून शेकडोंच्या संख्येने रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयातून पार्थिवशरीर त्यांच्या घरी हलविल्यानंतर सुभाष रोड, दत्त मंदिर गल्ली, चुन गल्ली, बडी राज गल्ली अक्षरशः लोकांनी भरून गेले. आलेला प्रत्येक जण भाऊंना वैयक्तिक भेटून धीर देत होता.
भाऊंच्या घरून रात्री १०:०० वाजता निघणाऱ्या आईच्या जनाज़्याला खांदा देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय जमला होता. चुन गल्लीपासून निघालेला जनाज़ा सराफा गल्ली, धोंडीपुरा, बलभीम चौक, कारंजा टॉवर, अजिज़पुरा मार्गे तकिया मस्जिद येथे १०:४५ वाजता पोहोचला. मस्जिद मधील जनाज़ा नमाज़साठी असलेले सभागृह तुडुंब भरून गेले नंतर सभागृहाबाहेरील सहन जागा सुद्धा पुरली नाही म्हणून नमाज़-ए-जनाज़ासाठी आलेल्या अनेकांना गुलज़ारपुराच्या रस्त्यावर उभे राहून नमाज़ अदा करावी लागली. एवढ्या मोठ्या संख्येने हजारो लोक नमाज़-ए-जनाज़ा आणि दफ़नविधीसाठी हजर होते. लोकांकडून असा आदर आणि प्रेम मिळविणे सहज सोपे नाही. यामागे मोठ्या परिश्रमाचा वाटा असतो आणि ते शफ़ीक़ भाऊंनी घेतलेले आहे. म्हणूनच त्यांनी लोकांकडून आदर आणि प्रेम मिळविलेले आहे.
कोण आहेत शफ़ीक़ भाऊ!
शफिक भाऊंच्या मातोश्रींच्या निधनानंतर हजारोंचा जनसमुदाय पाहून अनेकांच्या मनात नक्कीच प्रश्न आला असेल की एवढी लोकमान्यता मिळविणारा व्यक्ती आहे तरी कोण? नाही म्हणजे शफ़ीक़ भाऊंना ओळखत नाही असा एकही व्यक्ती बीड शहरच काय संपूर्ण बीड जिल्ह्यात सुद्धा नसेल. तर हा प्रश्न शफ़ीक़ भाऊ मंत्री, खासदार, आमदार, नगराध्यक्ष एवढेच काय नगरसेवक सुद्धा कधी राहिलेले नाही. मग त्यांच्यावर प्रेम करून आदर करणारा एवढा जनसमुदाय त्यांनी कसा मिळविला हा मुख्य मुद्दा आहे.
तर यामागे आहे तो त्यांचा सर्व समावेशक दृष्टिकोन. प्रत्येकाचे सुखदुःख काहीही असो माहिती होताच धावून जाणारे शफिक भाऊ. समोर हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, दलित किंवा अन्य कोणत्याही जाती धर्मातील व्यक्ती असो, प्रत्येकाला आपले मानणारे. प्रत्येकाच्या सुखदुःखाची आस्थेवाईकपणे विचारपूस करणारे. प्रत्येकाच्या अडीअडचणीत पुढे होणारे, असे विरळे व्यक्तिमत्व म्हणजेच शफ़ीक़ भाऊ.
यामुळेच शफ़ीक़ भाऊंच्या मातोश्रींची नमाज़-ए-जनाज़ा जिथे हजारो मुस्लिम बांधव मस्जिदसह रस्त्यांवर उभे राहून पठण करीत होते, त्याचवेळी मुस्लिमेत्तर शेकडो बांधव नमाज़ पूर्ण होईपर्यंत स्तब्ध उभे होते. यात सर्वसामान्यांसह अनेक गणमान्य व्यक्तींचाही समावेश होता. मग ते समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असो की, राजकीय क्षेत्रातील. प्रत्येक जण आपल्या या लाडक्या शफ़ीक़ भाऊंच्या मातोश्रींना शेवटचा निरोप देण्यासाठी आणि शफ़ीक़ भाऊंना धीर देण्यासाठी जातीने उपस्थित होता.
भविष्यात शफ़ीक़ भाऊ गोपीनाथराव मुंडे होऊ शकतील का?
शफ़ीक़ भाऊ ९०% समाजकारण आणि फक्त १०% राजकारण करणारे म्हणून ओळखले जातात. या बळावरच त्यांनी प्रत्येक जाती-धर्मांतील लोकांच्या हृदयात आपले एक विशिष्ट असे स्थान निर्माण केलेले आहे. समाजात वावरताना आपण पाहतो की, राजकारण असो की समाजकारण सर्वसमावेशक दृष्टिकोन करणारे काही मोजकेच लोक असतात.
यात बीड जिल्ह्यापुरता जरी विचार केला तरी दिवंगत गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं स्थान एकमेवाद्वितीय होते. त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळेच ते जरी तहयात भारतीय जनता पक्षात कार्यरत राहिले होते तरीही त्यांनी कधीच कोणत्याही जाती-धर्मात भेदाभेद केला नाही. म्हणूनच त्यांना सर्वमान्य नेते म्हणून तहहयात ओळखले गेले. त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षे उलटूनही आजही ते प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांमध्ये आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून विराजमान आहेत.
अशाच प्रकारे शफ़ीक़ भाऊ सुद्धा सदैव सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवून चालणारे आणि वागणारे म्हणून ओळखले जातात. गोपीनाथराव मुंडे नेहमी भाजपकडून निवडणूक लढवायचे आणि मोठ्या मताधिक्याने निवडून यायचे. ज्यात इतर समाजासह मुस्लिम समाजाचीही एक गठ्ठा मते त्यांना मिळायची. याची जाण सुद्धा त्यांना होती म्हणूनच पंतप्रधान पदावर विराजमान असलेल्या नरेंद्र मोदींसारख्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यालाही त्यांनी निवडणूक काळात प्रचार करण्यासाठी बीड जिल्ह्यात येण्यापासून रोखले होते. ही बाब लक्षात घेता गोपीनाथराव मुंडे यांचा दृष्टिकोन सर्व समाजांसाठी किती व्यापक होता हे सहज लक्षात येते.
असाच दृष्टिकोन शफ़ीक़ भाऊंचा सुद्धा आहे. मात्र ते ज्या एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्या पक्षाला फक्त मुस्लिमांचा पक्ष म्हणून पाहिले जाते. जसे भाजपला कट्टर हिंदुत्ववादी म्हणून पाहिले जाते. असे असले तरी गोपीनाथराव मुंडे सारख्या व्यक्तीकडे पाहून मुस्लिम समाज नेहमी त्यांना एक गठ्ठा मतदान करीत असे. त्यांना निवडून आणण्यात मोठा हातभार लावत असे. असेच मोठेपण पुढे चालून शफ़ीक़ भाऊ जर आमदारकी किंवा खासदारकीची निवडणूक लढू लागले तर मुस्लिमेत्तर समाज दाखवेल का?
कारण मुस्लिम समाजाने गोपीनाथराव मुंडे साठी भाजप सारख्या पक्षाकडे दुर्लक्ष करून त्यांना आपले नेते मानले व नेहमी मतदान रुपी सहकार्य केले. असेच मतदान रुपी सहकार्य शफ़ीक़ भाऊंसाठी भविष्यात मुस्लिमेत्तर समाजाकडून मिळू शकेल काय? आणि ते भविष्यात गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखे राजकारणात सर्व समावेशक नेते होऊ शकतील का? असे प्रश्न त्यांच्या मातोश्रींच्या निधनात जमलेल्या मुस्लिम बांधवांच्या हजारों आणि मुस्लिमेत्तर बांधवांच्या शेकडोंच्या उपस्थितीमुळे अनायासे मनात उभे राहिले आहे.
कारण ते सुद्धा विद्यार्थी दशेपासूनच अनेक वर्षे गोपीनाथराव मुंडे यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली भाजपमध्ये कार्यरत राहिल्याने त्यांची जडणघडण सुद्धा मुंडे साहेबांसारखीच झालेली आहे. म्हणूनच त्यांनाही म्हणावेसे वाटते - शफ़ीक़ भाऊ, तुम्ही लोकांची हृदये काबीज केली ओ!
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*




कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा