बीडच्या उर्दू घराचे काम लवकरच सुरू करणार; पालकमंत्री सुनेत्रा ताई पवार यांचे आश्वासन!
बीडच्या उर्दू घराचे काम लवकरच सुरू करणार
पालकमंत्री सुनेत्रा ताई पवार यांचे आश्वासन!
बीड।एस.एम.न्युज़ - शहरातील उर्दू भाषिक नागरिक, साहित्यिक, पत्रकार, विद्यार्थी तसेच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी मंजूर असलेल्या उर्दू घराच्या प्रलंबित कामाला गती देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड येथील शेख फारुख यांनी पालकमंत्री मा. सौ. सुनेत्राताई पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
बीड शहरासाठी उर्दू घर मंजूर झाले असून, त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध नसल्यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीला विलंब होत आहे. याबाबत शेख फारुख यांनी पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन साद केले.
या निवेदनात बशीरगंज ते जुने एस.पी. कार्यालय मार्गावरील जिल्हा परिषदेच्या जुन्या बोर्डिंगची जागा उर्दू घरासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर जागा शहराच्या मध्यवर्ती भागात असून, त्यातील सुमारे २,००० चौरस फूट जागा उर्दू घरासाठी उपलब्ध करून देता येऊ शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
उर्दू घराच्या माध्यमातून उर्दू भाषा, साहित्य, शिक्षण, पत्रकारिता, कला, संस्कृती तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याने हा प्रकल्प बीड शहरासाठी महत्त्वाचा असल्याचे शेख फारुख यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
निवेदनाची दखल घेत पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी उर्दू घराच्या कामाकडे लवकरात लवकर लक्ष देऊन काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. तसेच शेख फारुख यांनी सुचविलेल्या जुन्या बोर्डिंगच्या जागेबाबतही संबंधित बाबींचा विचार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बीडच्या उर्दू घराचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. आता संबंधित प्रशासनाकडून जागेची पाहणी करून आवश्यक ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा