Breaking News

ज्ञानाचा दीप तेवत ठेवणारे सेवाभावी ग्रंथपाल असंख्य तरुणांचे भविष्य घडवणारे श्री. उत्तम राठोड सेवानिवृत्त

ज्ञानाचा दीप तेवत ठेवणारे सेवाभावी ग्रंथपाल

असंख्य तरुणांचे भविष्य घडवणारे श्री. उत्तम राठोड सेवानिवृत्त

(एस.एम.न्युज़ परिवाराकडून नावाप्रमाणेच उत्तम असलेल्या उत्तम राठोड सरांना सेवानिवृत्ती नंतरच्या जीवनासाठी खूप-खूप हार्दिक शुभेच्छा. त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अल्लाहकडे ही दुवा करतो - एस.एम.युसूफ़)

काही व्यक्ती आपल्या पदामुळे मोठ्या होत नाहीत, तर आपल्या कार्यामुळे समाजाच्या मनात अढळ स्थान निर्माण करतात. चंपावती विद्यालय, बीड येथील ग्रंथपाल श्री. उत्तम राठोड हे असेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. दि. ३१ जुलै २०२६ रोजी नियत वयोमानानुसार ते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असले, तरी त्यांनी ज्ञान, संस्कार आणि समाजसेवेच्या माध्यमातून घडवलेली माणसं हीच त्यांच्या आयुष्याची खरी ओळख ठरणार आहे.
                  हरमकी तांडा (कुप्पा), ता. वडवणी या ग्रामीण भागातून आलेल्या श्री. राठोड यांनी स्वतः संघर्षातून शिक्षण पूर्ण केले. आयुष्यातील अडचणींना खंबीरपणे सामोरे जात त्यांनी ग्रंथपाल म्हणून जबाबदारी स्वीकारली. मात्र त्यांनी ही जबाबदारी केवळ नोकरी म्हणून न पाहता समाजसेवेचे प्रभावी माध्यम बनवले.
             ग्रंथालयातील पुस्तकांची निगा राखण्याबरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांनाही जपले. योग्य पुस्तकांची निवड, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन, उच्च शिक्षणाची माहिती, नोकरीच्या संधी, शिष्यवृत्ती, कौशल्यविकास अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया आणि करिअर नियोजन याबाबत त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना निःस्वार्थ मदत केली. अनेक विद्यार्थ्यांना स्वतः पुढाकार घेऊन आवश्यक व्यक्तींशी जोडले, तर काहींना आर्थिक आणि मानसिक आधारही दिला.
                 त्यांच्या या अथक प्रयत्नांचे फलित आज स्पष्टपणे दिसून येते. हरमकी व बाराभाई तांडा परिसरातील सुमारे ३० युवक शिक्षक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस, अभियंते, पशुवैद्यकीय अधिकारी तसेच विविध शासकीय आणि निमशासकीय विभागांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. या प्रत्येक यशामागे श्री. राठोड यांचे मार्गदर्शन, प्रेरणा आणि विश्वासाचा मोठा वाटा असल्याचे अनेकजण आवर्जून सांगतात.
                त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची माणुसकी. समाजातील कोणतीही व्यक्ती अडचणीत असेल, तर तिच्या मदतीसाठी सर्वप्रथम धावून जाणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. गरजू रुग्णांना दवाखान्यात मदत करणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणे, सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेणे आणि प्रत्येकाशी आत्मीयतेने वागणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य राहिले आहे.
                 विशेष म्हणजे त्यांनी कधीही समाज, जात, धर्म किंवा आर्थिक परिस्थितीचा भेदभाव केला नाही. "गरजूंना मदत करणे हेच खरे कर्तव्य" या विचाराने त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यामुळे जिल्ह्यातील विविध समाजघटकांतील असंख्य युवक आज त्यांना आपला मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान मानतात. आजच्या स्पर्धात्मक आणि स्वार्थी वातावरणात प्रसिद्धी, पद किंवा आर्थिक लाभापेक्षा समाजहिताला प्राधान्य देणारी माणसं दुर्मिळ झाली आहेत. श्री. उत्तम राठोड यांनी मात्र आयुष्यभर ज्ञानदान, सेवाभाव आणि माणुसकीची मूल्ये जपली. त्यांनी कमावलेली माणसं, विद्याथ्यांचे प्रेम आणि समाजाचा विश्वास हीच त्यांच्या आयुष्याची सर्वात मोठी संपती आहे.
                उद्यापासून त्यांच्या शासकीय सेवेला पूर्णविराम मिळणार असला, तरी त्यांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा आणि समाजकार्याचा प्रवास थांबणार नाही, अशी अपेक्षा त्यांच्या सहकाऱ्यांसह असंख्य विद्यार्थी आणि नागरिक व्यक्त करत आहेत.
                सेवानिवृत्ती हा त्यांच्या कार्याचा शेवट नसून, समाजसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरो. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आनंद आणि समाधान लाभो, तसेच त्यांच्या हातून समाजहिताचे कार्य यापुढेही अखंड सुरू राहो, हीच सर्वांची मनः पूर्वक सदिच्छा. ज्ञानाचा दीप तेवत ठेवणाऱ्या या सेवाभावी ग्रंथपालाला समाजाचा मानाचा मुजरा !
*साभार - सायं. दैनिक वास्तव*
(लेखन - अरविंद ओव्हाळ)
निवासी संपादक, सायं. दै. वास्तव मो.९४२१३३७६८९

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.

___________________________________________
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत