एसआयआर प्रक्रियेवर एखाद्या अभ्यासू चिकित्सकाने पीएचडी करावी
एसआयआर प्रक्रियेला तोंड देताना नागरिक त्यातही विशेष करून महिलावर्ग अत्यंत त्रस्त झालेले दिसून येत आहे. ही अवस्था पाहता एखाद्या अभ्यासू चिकित्सकाने एसआयआर प्रक्रियेवर पीएचडी करावी.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी एसआयआर प्रक्रिया राबविली जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविली जात असल्याचे म्हटले जात आहे. यावर काही नागरिकांनी माहिती अधिकारांतर्गत भारतीय निवडणूक आयोगाकडे एसआयआर प्रक्रिया कशासाठी राबविली जात आहे? याची माहिती मागितली असता निवडणूक आयोगाने आमच्याकडून ही प्रक्रिया राबविली जात नसल्याचे उत्तर दिल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
मग प्रश्न पडतो की, एसआयआर प्रक्रिया नेमके कोण राबवित आहे? कारण केंद्र व राज्य शासनाच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया भारतीय निवडणूक आयोग राबवित असल्याचे सांगितले जाते तर दुसरीकडे निवडणूक आयोग ही प्रक्रिया राबवित नसल्याचे म्हणत असल्याचे समोर येत आहे. यामुळे प्रश्न पडतो की, समस्त भारतीयांना अत्यंत क्लिष्ट, त्रासदायक व भंडावून सोडणारी ही एसआयआर प्रक्रिया राबविण्याचा अट्टाहास कशासाठी चालविला जात आहे? आणि कुणाकडून? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?
काही वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने जेव्हा आधार कार्ड बनविण्याची प्रक्रिया सुरू केली होती तेव्हा म्हटले होते की, आधार कार्ड भारतीय नागरिकत्वाचा भक्कम व ठोस पुरावा म्हणून कामी येईल. शासकीय-प्रशासकीय विविध योजनांसाठी सुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. आधार कार्ड ला भारतीय नागरिकत्वाचा भक्कम पुरावा म्हटले जायचे. मात्र आज त्याच आधार कार्ड ला अगदी नगण्य स्वरूप देण्यात आले आहे.
आता मतदारांसाठी (संपूर्ण भारतीयांसाठी नव्हे) एसआयआर प्रक्रिया राबविली जात आहे. ज्यात फक्त जो मतदार जिथे वास्तव्यास आहे तेथील मतदार यादीत त्याचे नाव या प्रक्रियेनंतर समाविष्ट करण्यात येणार आहे. म्हणजे फक्त मतदारसंघापूर्ते मर्यादित असलेले एसआयआर पुढे चालून किती महत्त्वाचे राहणार हाही एक संशोधनाचा विषय ठरणार आहे.
म्हणून भारतीय नागरिकांना खरेच याची आवश्यकता आहे का? याचा छडा लावणे आवश्यक आहे. या प्रक्रियेची सत्य वस्तुस्थिती भारतीय नागरिकांसमोर येणे गरजेचे आहे. याकरिता एखाद्या अभ्यासू चिकित्सकाने एसआयआर प्रक्रियेवर पीएचडी करावी.
ताजा कलम - विद्यार्थी आणि शिक्षणाची होतेय बोळवण
एसआयआर प्रक्रिया राबविण्याकरिता नियुक्त करण्यात आलेले बीएलओ हे जास्तीत जास्त शिक्षकी पेशा असलेले आहेत. मोठ्या प्रमाणात या प्रक्रियेमध्ये शिक्षक गुंतल्याने शाळेसह विद्यार्थी आणि शिक्षणाची बोळवण होत आहे. मात्र याचे कुठलेही सोयर सुतक शासनासह प्रशासनाला नसल्याचे दिसून येते.
लेखन - एस.एम.युसूफ़
(मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा