खाकीतल्या माणुसकीचे दर्शन
बीड।एस.एम.न्युज़
वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि दिलीपकुमार खेडकर यांनी माणुसकी दाखवत दोन लहान मुलींसह भटकणाऱ्या मातेला सुरक्षित निवारा मिळवून दिला.
बीड शहर वाहतूक शाखेची सतर्कता आणि संवेदनशीलता यामुळे आज एका असहाय्य मातेसह तिच्या दोन चिमुरड्या मुलींना सुरक्षित आधार मिळाला आहे. घरगुती वादातून रस्ता हरवलेल्या या कुटुंबाला पोलिसांनी केवळ सुरक्षित निवाराच मिळवून दिला असे नाही तर पुढील कायदेशीर संरक्षणाचीही जबाबदारी स्वीकारली आहे.
घटनेचा थोडक्यात तपशील
आज दि. ४ मे २०२६ रोजी जालना येथील रहिवासी असलेल्या श्रीमती जनाबाई अमोल केंद्रे (वय २८ वर्षे) या आपल्या ७ आणि ३ वर्षांच्या दोन लहान मुलींसह बीड शहरातील रस्त्यांवर अत्यंत चिंताग्रस्त आणि व्याकुळ अवस्थेत फिरत होत्या. वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सखाराम घोलप, वसीम शेख आणि दत्ता कदम हे कर्तव्यावर असताना त्यांच्या नजरेस ही बाब पडली. त्यांनी तात्काळ विचारपूस केली असता, सदर महिला कौटुंबिक त्रासामुळे घर सोडून आली असून ती निवाऱ्याच्या शोधात असल्याचे समजले.
सपोनि दिलीपकुमार खेडकर यांची तत्परता
अंमलदारांनी या घटनेची माहिती तात्काळ वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि दिलीपकुमार खेडकर यांना दिली. खेडकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सदर महिलेची आस्थेने चौकशी केली. एक तरुण महिला आणि दोन लहान मुली रस्त्यावर असुरक्षित राहिल्यास त्यांच्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची सामाजिक जाण असल्याने खेडकर यांनी त्यांना आपल्या पोलीस वाहनातून 'जिव्हाळा बेघर निवारा केंद्र' येथे नेले.
पुढील कार्यवाही
'जिव्हाळा' केंद्राच्या संचालकांशी व व्यवस्थापकाशी संवाद साधून महिलेची व मुलांची राहण्याची व भोजनाची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. जिव्हाळा बेघर निवारा संचालक अभिजीत वैद्य, राजू वंजारे, छाया सरोदे, यश वंजारे सदर महिलेची सर्व माहिती लिहून त्यांना रीतसर जिव्हाळा केंद्रामध्ये दाखल करून घेतले. या प्रकरणाची सविस्तर माहिती बीड शहर पोलीस स्टेशनला लेखी स्वरूपात कळवण्यात आली आहे. जेणेकरून, जालना जिल्ह्यात जर या महिलेबाबत कोणतीही 'मिसिंग' तक्रार असेल, तर त्याद्वारे तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधता येईल आणि तिला कायदेशीर न्याय मिळवून देता येईल.
"पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नसून, समाजातील शेवटच्या घटकाला सुरक्षा प्रदान करण्यासाठी सदैव तत्पर असते. सदर महिलेला सुरक्षित वातावरणात पोहोचवणे हे आमचे कर्तव्य होते." असे मनोगत यावेळी खेडकर यांनी व्यक्त केले.
बीड शहर पोलिसांनी दाखवलेल्या 'खाकी'मधील माणुसकीच्या दर्शनाबद्दल शहरात त्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा