Breaking News

मुलगी व मुलासोबतच सूनही पोलीस दलात

मुलगी व मुलासोबतच सूनही पोलीस दलातइस्माईल व फिरोज शेख यांची मेहनत आणि जिद्दीचे फळ

इस्माईल शेख यांची मुलगी शायिस्ता शेख, मुलगा फिरोज शेख आणि सून सून्नाबी शेख हे तिघेही महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झालेत. बीड जिल्ह्याच्या शिरूर कासार तालुक्यातील वंजारवाडी सारख्या एका अत्यंत छोट्याशा गावात राहणारे इस्माईल शेख यांनी मोठ्या मेहनतीने व जिद्दीने आपल्या मुली व मुलाला शिक्षण दिले. या दोघांनीही चांगले शिक्षण घेऊन पोलीस भरतीची तयारी केली. भरती निघताच या दोघांचीही महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली. एवढेच नाही तर सून सुन्नाबी हिला सुद्धा आपल्या मुली व मुलाप्रमाणेच स्वतःच्या पायावर उभे राहण्याकरिता प्रोत्साहन देऊन तिलाही पोलीस भरतीत उभे केले. अन् तिही महाराष्ट्र पोलीस दलात शिपाई पदावर निवडली गेली. इस्माईल शेख यांच्या जिद्दीमुळे मुलगा फिरोज याने बहिणीसह स्वतःच्या पत्नीलाही आपल्या बरोबरीने शिक्षण देऊन पोलीस बनविले. यामुळे पिता-पुत्राची जिद्द व मेहनत वंजारवाडी गावात चर्चेचा विषय ठरली आहे. इस्माईल शेख यांच्या कुटुंबीयांकडून इतरांनी आदर्श घ्यावा. याकरिता त्यांच्या कुटुंबाची कथा या लेखाच्या माध्यमातून वाचकांसमोर थोडक्यात मांडली आहे.

इस्माईल शेख हे नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो कष्ट, संघर्ष आणि जिद्दीचा प्रवास. वाडीमध्ये आम्ही शाळेत असताना रायमोहा ते वंजारवाडी रिक्षा चालवत संसाराचा गाडा ओढणारा हा माणूस, नंतर पानटपरी टाकून उभा राहिला, वेळ आली तेव्हा ड्रायव्हर म्हणूनही काम केले; पण परिस्थितीसमोर कधीच हार मानली नाही.
हातावर पोट असलं तरी डोक्यात एकच स्वप्न होतं - माझी मुलं शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत. त्या स्वप्नासाठी त्यांनी घाम गाळला, कष्ट सोसले, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. आज त्याच मेहनतीच्या बळावर त्यांची दोन्ही मुले पोलीस दलात सेवेत आहेत आणि सूनही पोलिस खात्यात नोकरी करत आहे. ही केवळ एका कुटुंबाची यशोगाथा नाही, तर वाडीमधील प्रत्येकासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.
               मोठेपणा हा पैशात नसतो, तर विचारात, शिक्षणात आणि कष्टात असतो, हे इस्माईल शेख यांनी दाखवून दिलं. आजच्या पिढीने मोबाईलमध्ये वेळ घालवण्यापेक्षा अशा संघर्षातून शिकायला हवं. कारण परिस्थिती कधीच अडथळा नसते, जिद्द नसणे हा खरा अडथळा असतो.
शेख कुटुंबाचे वास्तव
मुलगी, मुलगा व सून एकाच परीक्षेत पोलीस दलात दाखल होण्याअगोदर हातावरचं पोट. हॉटेल मध्ये काम, ड्रायव्हिंग सह हाती पडेल ते काम करून कुटुंबांची उपजीविका भागविणारे इस्माईल शेख यांच्या कुटुंबातील एक नाही तर तिघांचा पोलीस दलात समावेश झाला आहे.
वंजारवाडी गाव तसे दोन ते तीन हजार लोकसंख्या त्यातून ९०% समाज ऊस तोडी करणारा. गावातील वंजारी समाजाच्या नोकरीचे प्रमाण पाहून शेख कुटुंब कधी गावाचे, वाडीचे कुटुंब झाले कळलेच नाही. गावातील अधिकारी, शिक्षक, फौजी आणि पोलीस मधील सोबतची मुलं-मुली नोकरीला लागतात म्हणून या कुटुंबातील सर्व समावेशक असणाऱ्या फिरोज इस्माईल शेखला ही गोष्ट लक्षात आली आणि त्याने स्वतःसह बहीण व पत्नीलाही प्रोत्साहन देत पोलीस भरती करिता तयार केले. याकरिता त्याने कोणतीही मदत मागितली तरी वंजारवाडी मागे नाही हटली. आज याच गोष्टीचे फलित म्हणून तिघांना पोलीस विभागात नोकरी मिळाली. गाव सोडून जर इतर ठिकाणी असते तर नक्कीच नोकरी ऐवजी त्यांनी कोणता तरी व्यवसाय केला असता. पण शिक्षणाचे महत्व गावाने दाखवल्याने आज वंजारवाडी गावाचे हे आमचं कुटुंब यशस्वी झाले.
सलाम यांच्या कर्तृत्वाला. सलाम इस्माईल चाचा आणि फिरोज यांच्या सहनशक्तीला आणि नतमस्तक आम्ही शायिस्ता आणि सुन्नाबी यांच्या धाडसाला
मुस्लिम समाजात नोकरीचे प्रमाण कमी. तरी संगत अभ्यासू पोरांची असल्याने ही पोरं आज कुटुंबातील  नोकरदार बनली. वंजारवाडीत पहिले कुटुंब ज्यात एकाच भरतीत तिन्ही पोलीस झाले.

लेखन - प्रा.संभाजी सूर्यभान सानप

संकलन - एस.एम.युसूफ़

(मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार - एस.एम.न्युज़)

👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत