Breaking News

चिंचोलीकर मामांची चुणूक

 चिंचोलीकर मामांची चुणूक

असेही होते तेव्हाचे कायदे आणि नियम

सायकलला देखील लायसन लागत होते

बीड (गोरखनाथ चिंचोलीकर) - भारताला स्वातंत्र्य मिळाले तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली. प्रजासत्ताक देश म्हणून भारत नावारूपास आला. देशाच्या घटनेनुसार प्रत्येकाला जेवढे अधिकार, स्वातंत्र्य दिले तेवढेच जनतेसाठी नियम आणि कायदे लागू करण्यात आले. आश्चर्य वाटेल ! ब्रिटिश काळात देखील नियम आणि कडक कायदे होते. त्यापैकी कित्येक कायदे व नियम पुढे देखील लागू होते. असाच एक नियम आणि कायदा कसा होता? हे एका व्हाट्सअप ग्रुप वर आलेल्या परवान्याच्या स्वरूपातून समोर आले आहे. त्याकाळी सायकल चालवण्यासाठी देखील परवाना लागत होता. हे ऐकून किंवा वाचून आजच्या चाळीस पन्नास वर्षे वयाच्या कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
व्हाट्सअप ग्रुप वर आलेला सायकलचा परवाना, अरविंद देशपांडे नामक व्यक्तीचा असून २२ कुलाबा बॉम्बे-५ असा पत्ता आहे. तर जी सायकल वापरली जात होती ती हर्क्युलस कंपनीची असल्याचे नमूद केले आहे. महत्त्वाचे म्हणजे सायकल नंबर फ्रेम एक ५८७३२ असा उल्लेख दाखवलेला आहे तर १४ एप्रिल १९५६ दिनांक दर्शवली आहे. लांबचा काळ नाही अगदी ४० वर्षांपूर्वी शहरी भागाचे सोडा तालुक्याच्या ठिकाणी देखील २० ते २५ लोकांजवळ स्वतःच्या सायकली असायच्या. विशेष म्हणजे ज्यांना सायकल चालवता येत होती असे लोक सायकल मार्ट मधून किरायाने सायकल घ्यायचे परंतु या अगोदर मात्र सायकल चालवण्यासाठी नियम आणि अटी असायच्या. सायकल चालवणाऱ्याला देखील मुंबई-पुणे सारख्या ठिकाणी परवाना काढून घ्यावा लागत असे. जुने लोक सांगतात तसे बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या तरुण पोराला सायकल चालवताना पाहिल्यानंतर पोलीस लोक त्याला जाब विचारीत असत. एवढेच काय अलीकडच्या वीस पंचवीस वर्षाखाली डबल सीट सायकल चालवली तर पोलीस लोक खटला भरत असत. विशेष म्हणजे त्याकाळी ज्यांच्याकडे सायकल होती त्यांच्या सायकलला दिवा असणे बंधनकारक होते अन्यथा कारवाई होत असे. त्यामुळे त्याकाळी प्रायव्हेट सायकलला दिवा पाहायला मिळायचा मग तो कोणत्याही स्वरूपाचा का असेना. आज परिस्थिती बदलली आहे. सायकल मार्ट बंद झाले, नव्हे तर शाळकरी मुला व्यतिरिक्त कोणीही सायकल चालवीत नाही. जे कोणी सायकल चालवित आहेत ते कुठेतरी व्यायाम व्हावा म्हणून चालवतात. आज सायकलची जागा मोटार सायकलने घेतली आहे. घराघरात तीन-चार मोटारसायकली दिसून येतात परंतु नियमाची तशी अंमलबजावणी स्वतः करून घेत नाहीत. दुचाकी चालवण्यासाठी परवाना लागतो परंतु वयात न आलेली मुलं देखील भरधाव वेगात दुचाकी चालवतात. आई-वडिलांना कुतूहल वाटते पण परवान्यशिवाय दुचाकी चालवणे किती घातक आहे हे एखादी दुर्घटना घडल्यानंतर समजते. कमी वयाची मुलं मोटार सायकल चालविताना मिळून आल्यास त्यांनाच नाहीतर त्यांच्या पालकांना शिक्षा व दंड करण्याचे प्रयोजन कायद्यात आहे. परंतु अंमलबजावणी मात्र कुठेही होत नाही जशी सायकलसाठी त्याकाळी होत होती. मागच्या पंधरा-वीस वर्षाखाली कुलूप तोडून सायकली चोरी जायच्या आज सायकलला कोणी विचारीत नाही. परंतु मोटरसायकली मात्र चोरीस जात आहेत. त्यावर प्रतिबंध घालायला पोलीस यंत्रणेला यश आलेले नाही. जशी त्याकाळी सायकल चालवण्यासाठी परवानगी आवश्यक होती तशी आज मोटार सायकल साठी देखील आवश्यक आहे, परंतु मोठा फरक आहे. त्यावेळी नियमाचे पालन केले जात होते, कायदा पाळला जात होता. आज मात्र तशी परिस्थिती दिसून येत नाही म्हणूनच ग्रुप वर आलेला सायकल चालविण्याचा परवाना पाहून आश्चर्य वाटते. तेव्हाचे कायदे आणि नियम आज देखील आहेत परंतु नियम आणि कायद्याची भीती घेणारे मात्र नाहीत.

साभार - दैनिक पार्श्वभूमी

👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत