आमदार संदीप क्षीरसागर यांना खुले पत्र
आमदार संदीप क्षीरसागर यांना खुले पत्र
मा. आमदार साहेब
स.न.वि.वि.
आज २३ जानेवारी आहे. याच तारखेला २०२३ साली आपण आमच्या विनंतीला मान देत आपल्या जिवाभावाच्या माजी आमदारासह बीड शहरातील मोमीनपुरा स्थित जवळपास साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक महेदवीया दायरा कब्रस्तानला भेट देत पाहणी करून याची देही याची डोळा कब्रस्तानची बकाल अवस्था बघितली होती. तेव्हा आपल्या सोबत असलेल्या लवाजम्यासह महेदवीया समाजाच्या शिष्टमंडळासमोर आपण माझ्या खांद्यावर हात ठेवून फक्त आश्वासनच नाही तर वादा केला होता की, कब्रस्तानची बकाल अवस्था दूर करून पडझड झालेल्या संरक्षण भिंतींचे नूतनीकरण आमदार फंडातून करून देतो. आपल्या या वायद्याला २३ जानेवारी २०२६ रोजी पूर्ण ३ वर्षे झाली आहेत. ३ वर्षात कब्रस्तान ची बकाल अवस्था ना दूर झाली, ना पडझड झालेल्या संरक्षक भिंतींचे नूतनीकरण झाले. एवढेच काय या पाहणी दौऱ्यानंतर आतापर्यंत याविषयी आपल्याशी बोलण्याकरिता जेवढ्या वेळा आपल्या भ्रमणध्वनीवर कॉल केले तेही आपण कधी रिसिव्ह केले नाही. तसेच आपल्या व्हाट्सअप ला अनेकदा संदेश टाकूनही ते सुद्धा आपण पाहिले की नाही कळाले नाही.
आमदार साहेब, एखाद्या सामाजिक-सार्वजनिक मालमत्तेची झालेली दुरावस्था दूर करण्याकरिता जर एक आमदार म्हणून आपण योग्य ते कार्य करत नसताल तर आपला व आपल्या पदाचा आम्हा जनतेसाठी उपयोग तो काय? असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.
आमदार साहेब, आपल्या आमदारकीची अजूनही बरीच वर्षे बाकी आहेत. यामुळे आपण मनात आणले तर जेमतेम काही लाखांचे असलेले आमच्या महेदवीया दायरा कब्रस्तान चे काम चुटकीसरशी होईल. आवश्यक आहे ती फक्त आपली इच्छा. आपली इच्छा असेल तर हे कार्य फलद्रूप होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून या खुल्या पत्राद्वारे पुन्हा एकदा या प्रश्नाचे स्मरण करून देत आहे.
ताजा कलम - महेदवीया समाजाने मोकाट भटक्या कुत्र्यांपासून कब्रस्तानच्या रक्षणासाठी काही दिवसांपूर्वी भिंतींच्या जागी पत्र्यांचे पार्टिशन उभारले. संरक्षक भिंतींच्या जागी पत्र्यांचे पार्टिशन उभारलेले महेदवीया दायरा कब्रस्तान हे फक्त बीड शहरच नाही तर बहुदा आपल्या भारत देशातील एकमेव कब्रस्तान असेल कळावे.
आपला
*एस.एम.युसूफ़*
विश्वस्त - *महेदवीया समाज*
मुख्य संपादक - *एस.एम.न्युज़*
तथा *मुक्तपत्रकार*
संपर्क - ९०२१ ०२ ३१२१

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा