Breaking News

*निस्वार्थी अजातशत्रू अवलियाला पुण्यतिथी निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली*




*निस्वार्थी अजातशत्रू अवलियाला पुण्यतिथी निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली*

हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी नाव असलेला निस्वार्थी, अजातशत्रू, अवलिया माणूस वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी प्रथमच आलेल्या हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने आपल्यातून निघून गेलेल्या घटनेला रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी पूर्ण चार वर्षे होत आहेत. चार वर्षांपूर्वी नियतीने आकस्मिकपणे या साध्या, सरळ, सोज्वळ, भावनिक आणि माणुसकी जपणाऱ्या अवलिया माणसाला आपल्यातून हिरावून नेले होते. हा माणूस समज आल्यापासून सातत्याने समाजाविषयी असलेल्या पोटतिडकीने समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी नेहमी पुढाकार घ्यायचा परंतु पाठीमागे कुणाची दानत नव्हती आणि कुटुंबात ही एकटा पुरुष व कफल्लकता पाचवीला पुजलेली असल्याने अनेक कार्यकर्ते या माणसाकडे आले आणि गेले परंतु कुणीही टिकून राहिले नाही. म्हणून हा माणूस राजकारण आणि समाजकारणात एकटाच मुशाफिरी करत राहिला. मृत्यूपूर्वी काही वर्ष एआयएमआयएम पक्षाने या माणसातील वक्त्याला बऱ्यापैकी मंच उपलब्ध करून दिला होता. मान-सन्मान दिला एवढाच काय तो अपवाद. नाहीतर वयाचे अर्धशतक पार करेपर्यंत आर्थिक कफल्लकतेमुळे या माणसाच्या नशिबी दुर्लक्षित जिणेच आले.
अशा या अवलिया माणसाच्या संपर्कात मी सन २०१६ साली प्रथमच आलो होतो. रेड्डी साहेब माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठे असल्याने मला माझ्या मोठ्या भावासारखे झाले. म्हणून मी आदराने नेहमी त्यांना रेड्डी साहब याच नावाने संबोधायचो. तसे मी माझ्या लहानपणापासून त्यांना ओळखायचो मात्र त्या अगोदर कधी आमचे बोलणे झाले नव्हते. मी २०१४ सालापासून वृत्तपत्रांमध्ये मुक्तपत्रकार म्हणून बातम्या आणि लेख लिहिण्यास सुरुवात केली, तेव्हापासून वृत्तपत्रात प्रकाशित होत असलेल्या माझ्या बातम्या व लेख रेड्डी साहेबांनी आवर्जून वाचले. आणि २०१६ च्या जानेवारी महिन्यामध्ये असाच एक दिवस बशीरगंज चौकात असलेल्या माजी नगरसेवक जमीलभाई यांच्या पान दुकानावर माझा लेख प्रकाशित झालेले दैनिक लोकदिशा हे वृत्तपत्र घेण्यासाठी गेलो असता तिथे रेड्डी साहेब माझ्याजवळ आले होते आणि त्यांच्या स्वभावानुसार प्रथम स्वतःची ओळख करून दिली. मी त्यांना म्हटले, मी आपल्याला लहानपणापासून ओळखतो परंतु आपले कधी बोलणे झाले नाही. यावर त्यांनी सांगितले की, मी तुमच्या आजोबा पासून सर्वांना ओळखतो तुम्ही लिहिलेल्या बातम्या व लेख ही वाचतो. चांगलं लिखाण करता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही मी चंपावतीरत्न पुरस्काराचे वितरण करणार आहे. त्यात यावेळी आदर्श पत्रकारिता पुरस्कारासाठी तुमची निवड केली आहे. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्यांनी इतर पुरस्कारदात्यांसारखे माझ्याकडून ना प्रस्ताव मागितले, ना अर्ज मागितला. शिवाय मी कुठल्याही वृत्तपत्राशी जोडला गेलेलो नसतानाही फक्त माझ्या लिखाणाची नोंद घेत त्यांनी माझी चंपावतीरत्न पुरस्कारासाठी निवड करून २०१६ च्या मार्च महिन्यात हॉटेल नीलकमल येथे पुरस्कार वितरण समारंभामध्ये मला पुरस्कार देऊन सन्मानित केले. तेव्हापासून त्यांचे व माझे ऋणानुबंध जुळले ते त्यांच्या जग सोडेपर्यंत कायम राहिले.
रेड्डी साहेब राजकारण आणि समाजकारण अशा दोन्ही मध्ये नेहमी सततपणे सक्रिय राहायचे. जनहितास्तव कोणतेही आंदोलन असो, कोणत्याही पक्षाचे असो, जनतेच्या भल्यासाठी असेल तर ते सर्वात अगोदर त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जातीने हजर राहायचे. जनहितासाठी ते कधीही पक्षीय राजकारणात अडकले नाही. 'जिथे जनहित तिथे हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी उपस्थित', असा त्यांचा होरा असायचा.
परळी-बीड-अहेमदनगर या रेल्वे लाईन साठी सुद्धा त्यांच्या हयातीत जेवढी आंदोलने झाली, त्या सर्व आंदोलनांमध्ये त्यांनी हिरिरीने सक्रिय सहभाग नोंदविला होता. आज आपल्या बीड शहरात रेल्वे स्थानक झाले आहे. रेल्वेची चाचणी होऊन रेल्वे येऊन गेली आहे. पुढील काही वर्षात बीड ते परळी रेल्वे लाईन सुद्धा जोडली जाणार आहे. एकदाची परळी-बीड-अहेमदनगर ही रेल्वे लाईन पूर्ण झाली की मग नियमितपणे या रेल्वे लाईन वर रेल्वे वाहतूक सुरू होणार आहे परंतु हे सर्व पाहण्यासाठी आता प्रत्येक रेल्वेच्या आंदोलनात सहभाग नोंदविणारे हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी आपल्यात नाहीत याचे दुःख वाटते.
हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांनी अत्यंत अल्पसंख्य असलेल्या ख्रिश्चन समाजासाठी, समाजाच्या उद्धारासाठी मदर टेरेसा आर्थिक विकास महामंडळ निर्माण करून द्यावे, याकरिता बीड ते मुंबई मंत्रालयापर्यंत पायी मोर्चा सुद्धा काढला होता.
त्यांच्यातील कसलेल्या वक्त्याला खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आणलेल्या एआयएमआयएम पक्षाने सुद्धा आपल्या या दिवंगत प्रवक्त्याला समाजात कायम अमरत्व प्रदान करण्यासाठी दरवर्षी दिनांक २० एप्रिल रोजी त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या नावाने काहीतरी भरीव असे कार्य सुरू करावे. जीवन जगताना आपण पाहतो की, राजकारणातील आर्थिक दृष्ट्या अनेक मातब्बर आणि गब्बर लोकांचे निधन होते तेव्हा संबंधित पक्ष त्यांच्या जयंती किंवा पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. रेड्डी साहेब आर्थिक दृष्ट्या कधीही मातब्बर किंवा गब्बर झाले नव्हते. मात्र त्यांची वैचारिक पातळी आणि त्यांचे भले मन खूप मोठे होते. ते विचाराने आणि मनाने अत्यंत श्रीमंत होते. अशा या सुहृदयी व्यक्तिमत्त्वाच्या पुण्यतिथी निमित्ताने एआयएमआयएम पक्षाने हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांच्या नावाने ठळक असे काहीतरी चांगले कार्य सुरू करावे. समाजाला त्यांचा विसर पडू देऊ नये. नाहीतर आपल्याकडे एक रीत आहेच, जी सडक या हिंदी चित्रपटात गाण्याच्या ओळीत अधोरेखित केली होती. त्याचा उल्लेख येथे करू इच्छितो "ये कैसा मुल्क है, ये कैसी रीत है. याद करते है हमें, लोग क्यूँ मरने के बाद.
हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी सारखा निस्वार्थी अजातशत्रू अवलिया आपल्यातून दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी रात्री ०९.०० वा. दरम्यान जग सोडून गेला होता. रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी त्यांची चौथी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने रेड्डी साहेबांना या लेखाद्वारे शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण करतो.

लेखन - *एस.एम.युसूफ़*

संपर्क - *९०२१ ०२ ३१२१*
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत