Breaking News

*चंपावतीरत्न पुरस्काराचे नामविस्तार आणि आयोजनासाठी सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज*


*चंपावतीरत्न पुरस्काराचे नामविस्तार आणि आयोजनासाठी सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज*

दिवंगत अजातशत्रू अवलिया हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांच्याकडून देण्यात येणाऱ्या चंपावतीरत्न पुरस्काराचे त्यांच्या मृत्यू पश्चात "हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी चंपावतीरत्न पुरस्कार" असे नामविस्तार करून ते वितरित करण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे.
हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी हे समज आल्यापासून सामाजिक चळवळींमध्ये सहभागी झाले होते. सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या समाजविरोधी निर्णयाचा ते सदैव कडाडून विरोध करत असायचे. यामुळे त्यांना डाव्या विचारसरणीचा म्हणून ओळखले जायचे. तरुणपणी ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात कॉम्रेड अतहर बाबर, सय्यद मोईनुद्दीन मास्टर, ॲड. उषा दराडे, प्रा. सुशीला मोराळे, नामदेवराव चव्हाण यांच्यासोबत अनेक वर्षे सक्रिय होते. 

यापैकी अतहर बाबर यांचे अनेक वर्षांपूर्वी निधन झाले तर नामदेवराव चव्हाण वगळता इतरांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केला. हे सर्वजण आजही राजकारणात सक्रिय आहेत. डाव्या पक्षातील या घडामोडी नंतर हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी व्यथित झाले होते. म्हणून त्यांनीही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोडून स्वतः समांतर काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. 

आज लोकांना आश्चर्य वाटेल रेड्डी साहेबांच्या याच समांतर काँग्रेस पार्टी मध्ये आष्टी-पाटोदा मतदार संघातून अनेकदा निवडून आलेले माजी आमदार भीमराव धोंडे सुद्धा होते. रेड्डी यांचे व्यक्तिमत्व असे होते की, त्यांना राजकीय वाटाघाटी जमत नसायच्या. ते सदैव आपल्या तत्त्वांवर, निश्चयावर ठाम राहायचे. यामुळे त्यांना या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात असे करणे कधीही जमले नाही म्हणून ते एकटेच राहिले. 

त्यांच्यातील परखड वक्ता समाजासाठी असलेली त्यांची तळमळ वाया जाऊ नये म्हणून एआयएमआयएम पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी त्यांना विनंती करून पक्षात यायचे निमंत्रण दिले होते. रेड्डी साहेबांना या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर अल्हाज असदुद्दीन ओवैसी यांचे परखड विचार आवडायचे त्यात निजाम यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे त्यांनी एआयएमआयएम पक्षात निधन होण्याच्या काही वर्षांपूर्वी पक्ष प्रवक्ता म्हणून प्रवेश केला होता. तिथेही त्यांनी आपल्या सडेतोड आणि परखड भाषणांनी मैदान मारले होते. त्यांच्या या खुबीमुळे अल्पावधीतच ते बीड शहरापासून ते जिल्हाभरात आणि जिल्ह्यापासून ते हैदराबाद पर्यंत नावाजले गेले होते. 

एकीकडे त्यांची वाटचाल अशी सुरू असताना दुसरीकडे समाजातील प्रत्येक क्षेत्रात समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचे कार्य समाजासमोर यावे, त्यांच्या चांगल्या कार्याचा समाजाला परिचय व्हावा, त्यांच्या पाठीवर समाजाच्या कौतुकाची थाप पडावी. या दृष्टिकोनातून ते चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना दरवर्षी चंपावतीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करायचे. 

विशेष म्हणजे या चंपावतीरत्न पुरस्कारासाठी त्यांच्याकडे कोणाचीही शिफारस किंवा पैसा चालायचा नाही. समाजात वावरताना ते स्वतःच ज्याला पुरस्कार द्यायचे आहे, त्याच्यावर नजर ठेवून त्याची पारख करायचे. स्वतःचे समाधान झाल्यावरच ते अशा व्यक्तीला चंपावतीरत्न पुरस्कार द्यायचे. चार वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाल्याने चंपावतीरत्न पुरस्कार सोहळा थांबला आहे. 

हा पुरस्कार सोहळा बंद होऊ नये. निदान या पुरस्कार सोहळ्यानिमित्ताने तरी हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांचे स्मरण समाजात सदैव रहावे. समाजात चांगले कार्य करणाऱ्यांचे या पुरस्काराच्या माध्यमातून कौतुक व्हावे म्हणून चंपावतीरत्न या पुरस्काराचे 'हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी चंपावतीरत्न पुरस्कार' असे नामविस्तार करून ते दरवर्षी रेड्डी साहेबांच्या जयंती किंवा पुण्यतिथी दिना दिवशी वितरित करण्यात यावे. यासाठी तळमळीच्या सामाजिक संघटनांनी पुढे यावे.

लेखन - *एस.एम.युसूफ़*
संपर्क - *९०२१ ०२ ३१२१*

-------------------------------------------------------

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत