Breaking News

*इस्लामोफोबिया* लेखक : अर्शद शेख


 *इस्लामोफोबिया*

लेखक : अर्शद शेख

ईश्वर सृष्टीचा एकमेव निर्माता आहे. सारी मानवजात त्याचीच निर्मिती आहे. त्यामुळे ईश्वराने दिलेला धर्म सत्य, प्रेम, करुणा, दया, न्याय, अहिंसा आणि शांतीवर आधारित असणे अनिवार्य आहे. ईश्वर तमाम चुकांपासून पवित्र आहे, म्हणून ईश्वरीय धर्म अचूक आणि परिपूर्ण असलाच पाहिजे. ईश्वर अन्याय आणि अत्याचाराच्या सर्व स्वरूपांपासून मुक्त असल्यामुळे त्याने दिलेला धर्म सर्व प्रकारच्या अन्याय, अत्याचार आणि शोषणापासून मुक्त असणे अपेक्षित आहे. थोडक्यात ईश्वरीय धर्म समस्त उणिवा आणि दुराचारापासून मुक्त असावा, तसेच सर्व चांगुलपणा त्यात समाविष्ट असावा. त्याने माणसाच्या सफलतेचा, शांती आणि सुरक्षेचा मार्ग प्रशस्त करावा.

जर इस्लामचा दावा आहे की हा ईश्वरीय धर्म आहे, तर निश्चितच अधोरेखित सर्व कसोटीवर तो पूर्ण उतरायलाच हवा. इस्लामी जीवन व्यवस्थेचा निरपेक्षपणे अभ्यास केल्यास आपल्याला कोणतीच शंका राहणार नाही की, इस्लाम हा ईश्वरीय धर्म आहे.

असे असताना संपूर्ण जग आज 'इस्लामोफोबिया' अर्थात इस्लामच्या भीतीने ग्रस्त आहे. सत्य, शांती, समता, स्वातंत्र्य आणि न्यायावर आधारित या मानवतावादी जीवनव्यवस्थे विषयी एवढी अनामिक भीती, पूर्वग्रह किंवा द्वेष का असावा? हा निश्चितच चिंतनाचा विषय आहे. एक शांतीपूर्ण ईश्वरीय जीवनप्रणाली मानवासाठी भीती आणि असुरक्षितेचे कारण कसे ठरू शकते?

जीवन ही सद्विवेकबुद्धीची परीक्षा आहे. आचार-विचाराचे स्वातंत्र्य दिल्याशिवाय ही परीक्षाच मुळात अर्थहीन ठरते. स्वतः ज्या ईश्वराने मानवाला आचार-विचारांचे स्वातंत्र्य दिले, त्याला धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य दिले, किंबहुना सृष्टीच्या निर्मिकाच्या विरुद्ध बंडखोरीचे देखील स्वातंत्र्य दिले, याबाबत कुरआनने घोषणा केली की, 'धर्माच्या बाबतीत कोणतीच बळजबरी नाही.'

दस्तुरखुद ईश्वराने व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य दिले असताना, मुस्लिम का बरे इतर लोकांच्या धर्म स्वातंत्र्याचे मूलभूत हक्क हिरावून घेऊ शकतात? इस्लामी कायद्याप्रमाणे धर्माची बळजबरी निषिध्दच नसून कायदेशीर गुन्हा आहे. स्वतः प्रेषितांना देखील कोणावर धर्म लादण्याची परवानगी ईश्वराने दिली नाही. कुरआन प्रेषितांना उद्देशून सांगतो की, 'हे प्रेषित तुम्ही त्यांना उपदेश करीत रहा, आणि केवळ उपदेश करणे हेच तुमचे काम आहे. तुम्ही त्यांच्यावर रखवालदार नाहीत.'
(कुरआन ८८:२१ ते २६)
म्हणून मुस्लिम धर्मप्रचारासाठी बळजबरी करतात हा युक्तिवाद फक्त चुकीचाच नसून इस्लाम धर्माबद्दल अज्ञानाचा आहे. ज्या धर्माच्या विचारधारा दुबळ्या असतात त्यांना बळाचा वापर करावा लागतो. आणि बळजबरीने लादलेला धर्म जास्त काळ टिकू शकत नाही, हा इतिहास आहे. सम्राट अकबरने एक 'दिने-ए-इलाही' नावाचा नवीन धर्म स्थापन केला होता. परंतु त्याच्या पश्चात त्या धर्माचा एकही अनुयायी शिल्लक राहिला नाही, खुद्द त्याच्या मुलांने देखील तो धर्म स्वीकारला नाही. जगात धर्म बळजबरीने लादण्याचा प्रयोग कधीही यशस्वी झाला नाही. म्हणून इस्लाम तलवारीच्या जोरावर पसरला हा युक्तिवाद देखील तद्दन खोटा आहे.

तसेच जिहाद हे अत्यंत पवित्र कर्म आहे. ईश्वरा खातर सत्य, शांती आणि न्याय प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नाला 'जिहाद' म्हणतात. मुस्लिम तर तो आहे, ज्यांच्याकडून प्रत्येक व्यक्ती सुरक्षित असलीच पाहिजे. त्याच्याकडून कोणालाही कोणत्याही उपद्रवाची किंवा असुरक्षेची शंकादेखील नसावी. इस्लाम म्हणजे सलामती अर्थात सुरक्षा.

मध्यपूर्व आशिया ही गेल्या अनेक वर्षांपासून युद्धभूमी बनली आहे. इराण, इराक, सिरीया, लिबिया, अफगाणिस्तान इत्यादी मुस्लिम देश युद्धाच्या छायेत आहेत. ही धर्माची लढाई नसून निव्वळ अर्थकारणाची लढाई आहे. ही राष्ट्रे तेल खनिजांनी संपन्न आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ताबा मिळविण्याची ही स्पर्धा आहे. दहशतवादाचे भूत उभे करून त्याला संपविण्याच्या नावाखाली सर्रास देश बळकविण्याचा प्रयत्न आहे.

विरोधाला 'जिहाद' ठरवून त्याला धार्मिक स्वरूप दिले गेले. त्याच्याविरुद्ध लढण्याचा जणू परवाना घेऊन जगाच्या स्वयंघोषित पोलिस अमेरिकेने एकापाठोपाठ एक इराक, लिबिया, सिरीया आणि अफगाणिस्तान या मुस्लिम राष्ट्रांना उध्वस्त करून टाकले आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या तेथील सत्तेवर काबीज झाले. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नैसर्गिक संपदेवर ही राष्ट्रे चांगलाच ताव मारीत आहेत. गिरीश कुबेर यांने 'एक तेलीयाने', 'तेल नावाचा इतिहास', 'अधर्मयुद्ध' या पुस्तकांमधे तेलाच्या राजकारणाचे वास्तव समर्पकपणे मांडले आहे.

महाशक्ती नेहमीच स्वतः व्याख्या निर्धारित करीत असतात. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला देखील यांनी असाच 'दहशतवाद' ठरविला होता. आमच्या स्वातंत्र्यसेनानींना त्यांनी दहशतवादी ठरविले. त्यांच्या साम्राज्यवादाला विरोध करणारे नेहमीच दहशतवादी ठरले आहेत. प्रचंड प्रपोगंड्यातून त्यांनी नेहमीच स्वतःला जगाचा रक्षणकर्ता सिद्ध करण्यात पुरेपूर यश मिळविले.

गोबेल्सच्या नियमाप्रमाणे एक खोटी गोष्ट सातत्याने अनेक वेळेस सांगितली गेली की ती खरी वाटते. गोबेल्सच्या या सिद्धान्ताप्रमाणे अनेक वर्षे त्यांनी सातत्याने इस्लामला दहशतवादाशी जोडून असा काही बेफाम प्रपोगंडा केला की, जगाला खरे वाटू लागले आणि याचाच फायदा घेऊन अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी प्रचंड श्रीमंत असलेल्या मुस्लिम राष्ट्रांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ताबा मिळविला !

जर अन्याय आणि अत्याचाराविरोधात अमेरिका आणि मित्रराष्ट्राची खरी लढाई आहे तर जगाच्या इतर भागात जेथे अन्याय आणि अत्याचाराने शिखर गाठले आहे तेथे ही राष्ट्रे दादागिरी का करीत नाही? गेल्या अनेक वर्षांपासून तिबेट आणि तैवान चीनच्या अनधिकृत टाचेखाली आहे, म्यानमारमध्ये लष्कराने सर्व मानवाधिकारांचे हनन करत लोकशाही सरकार मोडीत काढून अनधिकृत कब्जा केला आहे, दक्षिण कोरियाच्या माथेफिरू शासकाकडून संपूर्ण जगाला धोका आहे. तसेच इथोपियात दरवर्षी भूकेने लाखो बालक मृत्युमुखी पडताहेत. जगभरात मानव अधिकारांच्या हननाच्या, दहशतवादाच्या आणि मानवी मूल्यांच्या पायमल्लींच्या अनेक ज्वलंत समस्या असून अमेरिका आणि मित्र राष्ट्राचे टार्गेट फक्त मध्य आशियायी मुस्लिम राष्ट्रच का आहेत ? अगदी वेड्या माणसाला देखील हे उघड गुपित समजेल.

या मानवतेच्या ठेकेदारांचा इतिहास मानवतेला काळिमा फासणारा आहे. सत्तेच्या लालसेपोटी याच पाश्चिमात्य राष्ट्रांनी दोन महायुद्ध घडवून आणली. या सत्तासंघर्षात जवळपास आठ कोटी निष्पाप नागरिकांचा बळी गेला, कोट्यवधी लोक अपंग झाले आणि अगणित मुले अनाथ झाली. लाखो महिला विधवा झाल्या आणि अनेक राष्ट्रे उद्ध्वस्त झाली.

याच राष्ट्रांनी भारतासह अनेक राष्ट्रांना जवळपास २०० वर्षे गुलामगिरीत ठेवले. त्यांच्या जाचापासून मुक्ती मिळवायला आम्हाला जवळपास दहा तपे लागली. हेच ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज होते यांनी जगाच्या अधिकांश भागावर अनाधिकृत कब्जा मिळविला होता आणि ज्यांच्यातून स्वतंत्र होण्यासाठी त्या त्या राष्ट्रातील अनेक पिढ्या कामाला आल्या. जगावर साम्प्रज्य करण्याचा जन्मजात अधिकार त्यांचाच आहे, बाकी सर्व गुलाम आहेत अशी त्यांची ठाम भूमिका आहे. त्यांच्या डोक्यातून हे वर्चस्ववादाचे भूत जात नाहीये.

जगात सर्वात जास्त विध्वंस, नरसंहार त्यांनीच केला आणि करत आहेत. त्यांना अस्थिरता आणि अशांती हवी आहे. कारण त्यांचा धंदाच हत्यारविक्रीचा आहे. जर जग शांत आणि स्थिर असेल तर त्यांचे हत्यार कोण घेणार? यामुळे सातत्याने ते अस्थिरता आणि अशांती निर्माण करत राहून आपली पोळी भाजत आहेत. मानवाधिकाराच्या गप्पा मारणाऱ्या या साम्राज्यवाद्यांनीच सर्वात जास्त मानवाधिकारांचे हनन केले. क्षणार्धात जगाचे विध्वंस करणारे अणुबॉम्ब यांनीच निर्माण केले आणि वापरले. स्वतःकडे Nuclear Power असताना दुसऱ्या देशाने अणुशक्त्ती बाळगू नये, असा त्यांचा अट्टाहास असतो.
जगाला औट घटकेत संपविण्याची क्षमता असणाऱ्या अणुबॉम्बचा जनक मुस्लिम होता का ? अणुबॉम्बचा वापर करून लाखो निष्पाप लोकांचा बळी घेणारी युद्धखोर राष्ट्रच आज जगाचे रक्षक व शांतीदूत असल्याचा आव आणतात ही शोकांतिका आहे.

दुसऱ्या महायुध्दात सामील झालेल्या देशात मोठ्या प्रमाणात स्त्रिया विधवा झाल्या, मुले अनाथ आणि बेवारस झाली. १९५५ च्या जनगणनेनुसार जपानमध्ये प्रत्येक पुरुषामागे आठ स्त्रियांची सरासरी होती. या युध्दाचा सर्वात जास्त फटका जर्मनीला बसला. लाखोच्या संख्येने पुरुष युध्दात मारले गेल्यामुळे अगणित स्त्रिया विधवा झाल्या. मुलींना वर मिळणे कठीण झाले. परिणामस्वरूप त्यांनी आपल्या नैसर्गिक इच्छापूर्तीसाठी अनुचित मार्गाचा अवलंब करण्यास व वेश्यांचे जीवन जगण्यास सुरुवात केली. परिस्थिती इतकी टोकाला पोहोचली की जर्मनीमध्ये अनेक स्त्रियांच्या घरावर Wanted an Evening Guest (रात्रीसाठी पाहुणा हवा आहे) असे फलक झळकू लागले.

दुसऱ्या महायुध्दाचे अत्यंत हृदयविदारक वर्णन करताना प्रख्यात पत्रकार जेम्स एम. कैमरोन लिहितात की, 'युध्द संपल्यावर मी बर्लिनला गेलो तेव्हा भग्नावस्थेतील हे शहर भुकेल्या वेश्यांनी (Hungry Whores) भरलेले होते. मी त्याला विसरायचा खूप प्रयत्न केला तरी विसरू शकलो नाही.'

यापुढे ते लिहितात "It is not so much that I have no stomach for the fight. I had no stomach for the victory."

युध्द सहन करण्याची शक्ती तर माझ्यात होती, परंतु हा विजय मी सहन करू शकलो नाही. (गार्डीयन, १० ऑक्टोबर १९८२)

एका पाश्चिमात्य विचारवंताने या वस्तुस्थितीचे अत्यंत सटीक शब्दात वर्णन केले की, "Terrorism of the Powerful is called war and war of the weak is called terrorism." अर्थात प्रबळ सत्ताधारांच्या दहशतवादाला युध्द म्हटले जाते आणि दुर्बलांनी केलेल्या युध्दास दहशतवाद ठरविण्यात येते.

परंतु विडंबना आहे की, ज्या साम्राज्यवादी पाश्चिमात्य राष्ट्रांनी आणि अमेरिकेने जगात आतंक माजविले तेच इस्लामला दहशतवादाशी जोडतात. तुफानी प्रपोगंडाच्या माध्यमातून जगात तथाकथित दहशतवादाची भीती निर्माण करतात आणि स्वतःला जगाचे पोलीस आणि शांतीचे ध्वजवाहक भासवून दुसऱ्या राष्ट्रात घुसून बळजबरी कब्जा करतात.

रणजीतलाल माधवन यांनी मल्याळममध्ये खूप छान लेख लिहिला आहे. त्यांनी लिहिले की, दरवर्षी जगात १६०० अब्ज डॉलर्सची अल्कोहोल अर्थात दारू विकली जाते. शस्त्रांस्त्राचा व्यापार जवळपास १०० अब्ज डॉलरचा आहे. सुमारे ४००अब्ज डॉलर्सचा खर्च दरवर्षी वेश्या व्यवसायावर होतो तर ११० अब्ज डॉलर्स जुगारावर उधळले जातात.

त्यांच्या रिर्पोटनुसार सोन्याची तस्करी सुमारे १०० अब्ज डॉलर्सची आणि अश्लील चित्रफितीचा (पॉर्न गेम्सचा) व्यवसाय ५४ अब्ज कोटीचा आहे. या सर्व गोष्टी इस्लामने निषिद्ध अर्थात हराम ठरविले आहेत. याचाच अर्थ असा होतो की, या व्यवसायापोटी दरवर्षी खर्च होणाऱ्या सुमारे २३८० अब्ज डॉलर्सच्या विरोधात इस्लाम उभा आहे.

भारताचे वार्षिक अर्थसंकल्प अवघे ३३६ अब्ज डॉलर्सचे आहे. जर जगाने मद्य, ड्रग्ज, शस्त्रास्त्र, वेश्या, पोर्न व्हिडोओ, इत्यादी व्यवसाय इस्लामच्या विचारधारेला अनुसरून निषिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर या धनदांडग्यांचे २३८० अब्ज डॉलर्सचे नुकसान होईल. ते इस्लामला कां बरे विरोध करणार नाही?

या साम्राज्यवादी आणि मानवताविरोधी शक्तींना सर्वात मोठे आव्हान इस्लामचेच आहे. शांती, समानता, स्वातंत्र्य आणि न्यायाचे आहे. पण ते सभ्यतेचा आव आणतात, जगाला मुर्ख बनवतात. कारण त्यांचे अस्तित्व अशांती, वर्चस्ववाद, साम्राज्यवाद आणि अन्यायावर टिकून आहे. इस्लामच्या नैसर्गिक मानवतावादी संकल्पनेला ते पराभूत करू शकत नाही म्हणून अपप्रचाराच्या माध्यमातून ते इस्लामच्या विकृतीकरणाचे प्रयत्न करताहेत. याचाच एक भाग म्हणजे इस्लामोफोबिया !

इस्लामची भीती निर्माण करून लोकांना इस्लामपासून परावृत्त करणे तसेच इस्लामविषयी द्वेष, तिरस्कार आणि राग निर्माण करण्याचे 'इस्लामोफोबिया' हे षडयंत्र आहे. अशा कटकारस्थानातून जणू ते अन्याय आणि अत्याचाराचा जगाकडून परवाना मिळवित आहेत.

भारतात देखील जातीयवादी शक्तींना 'इस्लामोफोबिया' सोयीस्कर वाटतो. वर्चस्ववाद हा त्यांचा देखील अनुवांशिक गुण आहे. सत्ता मिळविण्यासाठी बहुमताचे समर्थन लागते. लोकांना संघटित करण्यासाठी एखाद्या शत्रूची आवश्यकता असते. असुरक्षिततेपोटी लोक संघटित होत असतात. जर वास्तविक शत्रू उपलब्ध नसेल तर कृत्रिम शत्रू उभा करावा लागतो. नेमके हेच देशी वर्चस्ववाद्याने भारतात केले आणि सत्तेचा मार्ग प्रशस्त केला. मुस्लिम हे देशासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे भासवून स्वतः संरक्षणकर्त्याची भूमिका घेत सत्तार्जन केले. जगभरातील साम्राज्यवाद्यांची सत्ता अर्जित करण्याची हीच पद्धत असते.

एखाद्या समूहाविरुद्ध भीती निर्माण करणे व त्याच्याविरुद्ध लढणाऱ्या संरक्षणकर्त्याचा आव आणून सत्ता प्राप्त करणे. त्यासाठी प्रचंड प्रमाणात प्रपोगंडा निर्माण करायचा की ज्याच्या गोंधळात लोक विसरून गेले पाहिजे की, वास्तविकपीडित कोण आणि कोण दहशतवादी? किंबहुना ते दहशतवाद्यालाच मसीहा समजू लागतात. यासाठी संपूर्ण मीडिया काबिज केला जातो.

आता शेवटचा प्रश्न असा की, इस्लाम ईश्वरीय धर्म असताना, सफलतेची जीवनपध्दत, पुरोगामी आणि प्रगतिवादी जीवनशैली असताना देखील भारतीय मुस्लिम मागासलेले का? हे मागासलेपण यांसाठी नाही की, ते इस्लामचे अनुयायी आहेत. किंबहुना यासाठी आहे की, ते इस्लामपासून दूर गेले आहेत. मुस्लिमचा अर्थ आज्ञापालक, ईश्वरीय जीवनपद्धतीचा पूर्णपणे पालन करणारा! आपल्या इच्छा आणि आकांक्षा ईश्वराप्रति पूर्णपणे समर्पित करणारा! अल्लाहच्या प्रेमाखातीर सदाचार अवलंबणारा व दुराचारांपासून परावृत्त होणारा! कुरआनला ईश्वरी मार्गदर्शन आणि प्रेषितांना मार्गदर्शक मानणारा आणि त्यानुसार आचरण करणारा !

'मुस्लिम' हे एखाद्या समूह विशेषचे नाव नसून निरपेक्ष सदाचाराचे नाव आहे. या जीवनपद्धतीचा अंगीकार करून कोणी मागासलेला राहूच शकत नाही. मागासलेपण इस्लामच्या विरोधार्थी शब्द आहे. ही क्रांतिकारी जीवनव्यवस्था जीवनाला एक महान उद्देश देते आणि व्यक्तीला त्याच्या चरित्र, क्षमता, नीती आणि प्रतिभांना शिखरावर नेण्याचा मार्ग प्रशस्त करते.

मित्रांनो, अशारितीने मी आपल्या समोर एक अत्यंत सहज, सुंदर आणि चैतन्यमय अशी जीवनपद्धत अर्थात द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अशी जीवनशैली जी निर्दोष आणि शाश्वत आहे. याचे निष्पक्ष आणि निरपेक्ष चिंतनाने आपण माझ्या विचारांशी सहमत व्हाल.

अल्लाह आम्हा सर्वाना सद्बुद्धी आणि सत्याची ओळख प्रदान करो, आमच्या देशात शांती, प्रेम आणि सद्भावना नांदो, तसेच आमच्या माध्यमातून सहजीवनाचा आदर्श जगाला मिळावा, हीच अल्लाह जवळ प्रार्थना !!

*संदर्भ ग्रंथ : इस्लाम - द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग*
==================================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत