नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांना खुले पत्र
टीप - पत्र थोडे मोठे झाले आहे. तरी कृपया आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून संपूर्ण वाचावे. जेणेकरून आपल्याला यावर काम करण्यास सोपे जाईल.
मा.आ. संदीप क्षीरसागर साहेब,
सर्वप्रथम आपण बीड विधानसभा मतदारसंघातून लागोपाठ दुसऱ्यांदा निवडून आलात यासाठी आपले अभिनंदन आणि पुढील पाच वर्षाच्या कारकिर्दीसाठी खूप-खूप हार्दिक शुभेच्छा!
आमदार साहेब, आपल्याला शंभर टक्क्यांनी पास होण्याची दुबार संधी मिळाली आहे. या खुल्या पत्राद्वारे आपल्या सेवेत काही कामे जी बीड शहरवासियांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्याची यादी आपल्यासमोर मांडत आहे. यात नमूद केलेल्या कामांना आपण आमदारकीच्या दुसऱ्या टर्म मधील पहिल्या एकाच वर्षात पूर्ण करावे अशी विनंती आणि अपेक्षा करतो. आपल्याकडून जी कामे प्रथम प्राधान्याने होणे अपेक्षित आहे, त्यात प्रामुख्याने -
१) खासबाग-मोमीनपुरा हा मोठा भाग जोडणारा बिंदुसरा नदीवरील नियोजित पूल निर्माण करणे.
२) मोमीनपुरा येथील महेदवीया दायरा कब्रस्तान च्या संरक्षक भिंती बांधणे.
३) शहेनशहावली दर्गा रोडला नाल्यावरील पूल बांधणे.
४) बशीरगंज भागातील डीसीसी बँक ते बलभीम चौक आणि बलभीम चौक ते माळीवेस चौक या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे.
५) राजुरी वेस ते कबाड गल्ली रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे.
६) बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवन ते नर्सरी रोड ला जोडणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे.
७) संपूर्ण बीड शहराला चार दिवसाआड नियमितपणे पाणीपुरवठा करणे.
८) मुहम्मदिया कॉलनी आणि त्यातील अनेक उपनगर, मोमीनपुरा, इस्लामपुरा, बालेपीर, बांगरनाला, आमराई, चाऊस कॉलनी या भागातील रस्ते आणि नाल्या बांधणे.
९) उर्दू घराचे निर्माण करणे.
१०) मुस्लिम मुलींचे वस्तीगृह निर्माण करणे.
११) ऐतिहासिक कारंजा टावर ते जुनी भाजी मंडई मार्गे बुंदलपुरा रस्ता व नाल्या बांधणे
ही कामे आपल्याला मिळालेल्या दुसऱ्यांदाच्या आमदारकी मध्ये पहिल्या वर्षातच पूर्ण होणे आपल्याकडून बीड शहरातील एक नागरिक म्हणून अपेक्षा करतो आहे.
आमदार साहेब, वर उल्लेख केलेली सर्व आवश्यक कामे ही आता उद्भवलेली नसून जेव्हा पहिल्यांदाच आपण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आला होता, तेव्हापासून ते आपल्या पहिल्या आमदारकीची ०५ वर्षे संपूनही ती तशीच पेंडिंग पडून आहेत. याचे आम्हा बीड शहरवासियांना मोठ्या प्रमाणात शल्य वाटते. जोपर्यंत ही सर्व कामे पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे शल्य वाटतच राहणार आहे.
आमदार साहेब, आपल्या पहिल्या आमदारकीची सुरुवातीची दोन वर्षे ही कोरोना काळात गेली. कोरोना काळ संपला तेव्हा आपण ज्या महाविकास आघाडीचे आमदार होता त्या महाविकास आघाडीची सत्ता गेली. नंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. या सर्व बाबी जनतेला माहित आहेत. परंतु सत्ता जरी नसली तरी आपण लोकप्रतिनिधी आहात आपल्या मागे लाखो मतदारांनी आपल्याला दिलेल्या मतांची ताकद आहे. ती ताकद दाखवून सत्ताधाऱ्यांकडून बीड विधानसभा मतदार संघासाठी कधी सामोपचाराने, कधी आक्रमक होऊन तर कधी भांडून जनतेसाठी आवश्यक असलेली कामे करून घ्यावीत अशी आपल्याकडून जनतेला अपेक्षा आहे. आपल्या सोबतीला बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे आहेतच. यामुळे सत्ताधाऱ्यांत नसलात तरी दोघांनी मिळून जनतेसाठी आवश्यक ती कार्ये युद्ध पातळीवर करावीत अशी एक लोकप्रतीनिधी म्हणून आपल्याकडून जनतेला अपेक्षा आहे आणि ती रास्तच आहे.
आमदार साहेब, आपण बिंदूसरा नदीवरील पुलासाठी आपला पक्ष सत्तेत असताना बरीच धावपळ केल्याचे माहित आहे. परंतु धावपळीनंतर फलनिष्पत्ती होणे सुद्धा आवश्यक आहे. ती गेल्या पाच वर्षात झालेली नाही.
बीड शहरातीलच मोमीनपुरा बायपास रोड लगत असलेल्या महेदवीया दायरा कब्रस्तान च्या संरक्षक भिंतीची दुरावस्था सुद्धा गेल्या दोन वर्षात आपल्याकडून दूर होऊ शकली नाही. विशेष म्हणजे आपण या कब्रस्तानचा दौरा करून संरक्षक भिंती बांधून देण्याचे आश्वासन २३ जानेवारी २०२३ ला दिले होते.
ऐतिहासिक शहेनशाहवली दर्गा रस्त्यावर दर्गा पासून काही मीटर अंतरावर असलेल्या नाल्यावरील पुलाचा प्रश्नही भिजत घोंगड्यासारखा गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे.
बशीरगंज भागातील डीसीसी बँक ते बलभीम चौक आणि बलभीम चौक ते माळीवेस चौक हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्डे व धूळ युक्त झाला आहे. यामुळे या दोन्ही रस्त्यांवर असलेले दुकानदार, दुकानात काम करणारे कामगार अगदी जेरीस आले आहेत. खड्ड्यांमुळे वाहन चालक तर दुकान चालविणारे आणि दुकानात काम करणारे कामगार हे सतत उडणाऱ्या धुळीमुळे त्रस्त झाले आहेत. यामुळे अनेकांना श्वसन विकाराच्या समस्या सुद्धा जडल्या आहेत. म्हणून हा रस्ता युद्ध पातळीवर कॉंक्रिटीकरण करून बनविणे आवश्यक आहे.
आमदार साहेब, गेल्या ५ वर्षांपासून आपल्या सोबत एखाद्या सावली सारखे आपले सारथ्य करणारे माजी आमदार सय्यद सलीम यांच्या घरासमोरून जाणाऱ्या राजुरी वेस ते कबाड गल्ली या रस्त्याची दुरावस्था सुद्धा अत्यंत वाईट झालेली आहे. हा रस्ता ही फुटा फुटावर खड्डे तसेच उडणाऱ्या धुळीचे माहेरघर झाला आहे. आता याच रस्त्यावर अद्यावत बांधण्यात आलेले बीड शहर पोलीस ठाणेही स्थलांतरीत करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे सय्यद सलीम यांच्यासारखा सारथी असूनही ते गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आपल्याकडून हा रस्ता चांगला करून घेऊ शकले नाहीत. याचेही मोठे वैषम्य वाटते.
आमदार साहेब, गेल्या जवळपास २५ ते ३० वर्षांपासून बार्शी रोडवर असलेल्या आपल्याच राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रवादी भवन पासून ते लक्ष्मण नगर मार्गे नर्सरी रोड कडे जाणारा हा रस्ता नेमका कुणाच्या पापामुळे की दुर्लक्षपणामुळे खितपत पडला आहे? याचाही काही ताळमेळ लागत नाही. या रस्त्यावर सहारा कॉलनी, अक्सा कॉलनी, शहेनशहा नगर सारख्या उच्चभ्रू वसाहती तसेच बीड नगर परिषदे कडून उजाड करून टाकण्यात आलेले लक्ष्मण नगर सारख्या वसाहती आहेत. विशेष म्हणजे या रस्त्याबद्दल आतापर्यंत अनेक नेत्यांनी अनेकदा आश्वासने सुद्धा दिलेली आहेत. तरीसुद्धा हा रस्ता तयार करण्यात येत नाही. याशिवाय मोमीनपुरा, इस्लामपुरा, बालेपीर, बांगरनाला, आमराई, चाऊस कॉलनी या भागातील ही अनेक रस्ते व नाल्या बांधणे आवश्यक आहे. बीड शहराची ओळख असलेले ऐतिहासिक कारंजा टावर पासून जुने भाजी मंडई मार्गे बुंदलपुरा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून कितपत पडला आहे हा रस्ता व नाल्या बांधणे ही आवश्यक आहे.
आमदार साहेब, वर उल्लेख केलेल्या सर्व वसाहती या बीड शहरातीलच चाणक्यपुरी, भाग्यनगर, आनंदनगर, ज़मज़म कॉलनी सारखे चांगले रस्ते व नाल्यांनी चकचकीत व्हावे. तेव्हा ही सारी कामे आपल्याला मिळालेल्या दुसऱ्या आमदारकीच्या पहिल्याच वर्षात पूर्ण करावीत. जेणेकरून उरलेल्या चार वर्षात पुन्हा दुसरी कामे करून बीड शहराला एक विकसित शहर म्हणून ओळख मिळवून द्यावी.
आमदार साहेब, गेल्या अनेक वर्षांपासून उर्दू घराचा मुद्दा सुद्धा अडगळीत टाकण्यात आलेला आहे. हा विषय सुद्धा हाती घेऊन उर्दू घरचे लवकरात लवकर निर्माण करावे तसेच मुस्लिम मुलींचे वस्तीगृह सुद्धा अनेक वर्षांपासून मागणी असूनही अजून तयार करण्यात आलेले नाही. या वस्तीगृहासाठी जुना बाजार भागात असलेल्या जुन्या तहसीलची जागा अत्यंत सुरक्षित आहे. चारही बाजूने दाटवस्ती असल्याने येथे मुलींची सुरक्षा चांगली राहील. तेव्हा त्या जागी मुस्लिम मुलींचे वस्तीगृह बांधण्यासाठी सुद्धा आपण कार्य करावे.
आमदार साहेब, बीड शहराला पाणीपुरवठा करणारे पाली येथील बिंदुसरा धरण तसेच माजलगाव मधील जायकवाडी धरण तुडुंब भरलेले आहे. तरीसुद्धा बीड शहरवासीयांना कुठे आठ, कुठे पंधरा तर कुठे वीस-पंचवीस दिवसाआड पाणी सोडले जाते. असे का? नागरिकांनी प्रश्न केला तर उत्तर दिले जाते की, इट येथील फिल्टर प्लांट मध्ये बिघाड झाला किंवा तिथे वारंवार लाईट जात असल्याने पाणीपुरवठ्यास उशीर होत आहे. तेव्हा आपण ईट येथील फिल्टर प्लांटमध्ये जी काही नादुरुस्त यंत्रसामग्री असेल किंवा हातघाईला आलेली असेल ती बदलून तिथे विद्युत पुरवठा दरदिवशी २४ तास सुरळीत करण्यासाठी आवश्यक ते उपाय करावे. यासाठी आपल्या सोबत असलेले माजी आमदार सय्यद सलीम यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळेल. कारण त्यांनीच माजलगाव बॅक वॉटर चे पाणी बीड शहरापर्यंत आणून पाणीदार आमदार म्हणून ख्याती मिळविलेली आहे. त्यांना याबद्दलची इत्यंभूत माहिती आहे. त्यांच्यासोबत मिळून आपण संपूर्ण बीड शहराला यापुढे किमान चार दिवसाआड तरी नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक यंत्रणा लावावी. यावेळी निवडणूक काळात गेल्या वेळेस सारखेच माजी आमदार सय्यद सलीम आणि आपण जनतेला भरपूर आश्वासने दिलेली आहेत. ती पुर्ण करण्याची संधी जनतेने आपल्याला लाखाच्यावर मतदान करून उपलब्ध करून दिली आहे. तेव्हा जनतेच्या अपेक्षेवर खरे उतरल्यास २०२९ च्या निवडणुकीत सुद्धा हीच जनता आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून देईल.
आमदार साहेब, बीड शहरातील एक जबाबदार नागरिक म्हणून वर उल्लेख केलेली कामे आपल्याला दाखविणे माझे नैतिक कर्तव्य होते, ते मी पार पाडले आहे. आता यावर कार्य करून आपण आपले कर्तव्य पार पाडावे ही अपेक्षा. चूक-भूल द्यावी घ्यावी.
==================================
*आमच्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
*- एस.एम.युसूफ़*(मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा